ऊस लागवड केल्यानंतर पूर्ण उगवणीसाठी सहा ते आठ आठवले कालावधी लागतो. सुरूवातीच्या काळात वाढ हळू होते. ऊसाच्या दोन सर्यांमध्ये मोकळ्या जागेत आंतरपीक घेतल्याने तणांचे प्रमाण कमी होते. सुरू ऊसामध्ये भुईमूग, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतर पिके फायद्याची ठरतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोतही सुधारतो. उसामध्ये आंतरपीक घेतल्याने नक्कीच फायदा होतो. प्रामुख्याने उसाचे निव्वळ उत्पन्नात वाढ होतो. उसाचे बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी झालेला खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून निघूतो.
सुरू ऊस-कांदा : सुरू ऊस सहा ते आठ आठवड्यांचा झाल्यानंतर म्हणजेच त्याचे कोंब जमिनीवर उगवून आल्यानंतर कांदा या पिकाच्या रोपांची वरंब्याच्या दोन्ही बाजूला लागण करावी. या आंतरपिक पद्धतीमध्ये कांद्याला उसाबरोबरच पाणी आणि खते मिळतात. त्यामुळे त्याला वेगळे पाणी आणि खत देण्याची गरज भासत नाही. कांद्याची मुळे ही जमिनीत खूप खोलवर जात नाही. तीफक्त पाच ते दहा सें. मी. एवढ्याच खोलीवर जातात. त्यामुळे तेवढ्याच जमिनीतून ती अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्याचा ऊस या मुख्य पिकावर कोणताही परिणाम होत नाही. विशेषत: सुरूवातीच्या काळात ऊसाची वाढ खूप मंद गतीने होत तर त्याच काळात कांद्याची वाढ जलद गतीने होते त्यामुळे कांदा काढणीसाठी साडेतीन ते चार महिन्यात तयार होतो.
आंतरपिक म्हणून लागवड केलेल्या कांद्याची उत्पादकता सरासरी 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी मिळते कारण या कांद्याची लागवड आपण रोपाची पुनर्लागन करून केलेली असते असे हे आंतरपिक ऊस या मुख्य पिकाबरोबर पाणी, प्रकाश, अन्नद्रव्ये यांबाबतीत कुठेही स्पर्धा करत नाही. व शेतकर्याला दुहेरी उत्पन्न मिळवून देते.

सुरू उस-भुईमूग : ही आंतरपिक पद्धती जमिनीशी सुपिकता वाढवण्यासाठी तसेच अतिरिक्त उत्पन्न व नफा मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सुरू ऊसाचे कोंब जमिनीवर आल्यावर भुईमूग या पिकाची लागवड टोकण पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूला करावी. कांद्याप्रमाणेच भुईमूग या पिकाला वेगळी अन्नद्रव्ये तसेच पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. सुरूवातीलाच खताबरोबर जमिनीमध्ये अन्नद्रव्ये मिसळलेली असतात तसेच ऊस पिकाच्या गरजेनुसार पिकाला पाणी दिले तरी चालते. भुईमूग हे पीक जमिनीत नत्र स्थिरिकरण करणारे पीक आहे. या पिकाच्या मुळांच्या गाठित रायझोबियम नावाचे जीवाणू हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरिकरण सहजीवी पद्धतीने करतात. भुईमूग या पिकाने जमिनीत स्थिर केलेले नत्र नंतर सुरू ऊस या पिकाला उपलब्ध होते. याचा मोठा फायदा उसाला होतो. ऊसाच्या वाढीवर भुईमूग हे आंतरपिकावर कोणताही परिणाम करत नाही. या पद्धतीमधून भुईमूगाचे हेक्टरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पन्न मिळवता येते.
सुरू ऊस-मेथी/कोथिंबीर : ही आंतरपिक पद्धती शक्यतो शहरांच्या जवळपास असणार्या ऊस क्षेत्रामध्ये घेतली जाते. उन्हाळामध्ये मेथी/कोथिंबीर या भाज्यांना बाजारात खूप मागणी असते. त्यामुळे शेतकरी नगदी पैसा मिळवण्यासाठी सुरू ऊसात मेथी/कोथींबीर या भाज्यांची लागवड करावी. ऊस उगवून आल्यानंतर दोन्ही वरंब्याच्या बाजूने मेथी/ कोथिंबीर यांची लावगड करावी. या आंतरपिक पद्धतीमुळे शेतकर्यांना कमी कालावधीत नगदी पैसा पिकावर कोणताही परिणाम होत नाही.
सुरू ऊस-काकडी/कलिंगड : ही आंतरपिक पद्धती उन्हाळ्यामध्ये काकडी/कलिंगड या वेलवर्गीय फळपिकांना असलेली मागणी लक्षात घेवून केली जाते. या आंतरपिक पद्धतीत जेव्हा सुरू ऊसाचे पीक सहा ते आठ आठवड्याचे होते म्हणजेच ऊसाचे कोंब उगवून जमिनीवर येतात त्यावेळी प्रत्येक वरंब्याच्या एका कडेला साधारणपणे दोन फुट अंतरावर एक बी याप्रमाणे टोकण पद्धतीने लावतात. काकडी/कलिंगड हे वेलवर्गीय फळपिक असल्यामुळे हे जमिनीवर समांतर पद्धतीने वाढते. या वेलाची वाढ वरंब्यावर केली जाते तसेच या वेलाची फळे वरंब्यावर तसेच सरीमध्ये जेथे ऊस कोंबामध्ये अंतर आहे अशा ठिकाणी वाढवली जातात. या आंतरपिकाला कोणत्याही प्रकारे वेगळी अन्नद्रव्ये तसेच पाणी देण्याची आवश्यकता नसते तसेच या पिकांमुळे ऊस या पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही तसेच त्याच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही.
आंतरपिक पद्धतीमुळे शेतकर्यास काकडीचे 75 ते 100 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते तसेच कलिंगडापासून 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. ही आंतरपिके तीन ते साडेतीन महिन्यांत येणारी असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात या आंतरपिकांना बाजारात खूप मागणी असते व तसेच ही आंतरपिके शेतकर्यांना अधिक नफा मिळवून देतात.
– प्रा. किरण पं. वायसे छत्रपती शाहू कृषी महाविद्यालय, आष्टी, जि. बीड.













Users Today : 12
Users Last 30 days : 765
Users This Month : 90
Users This Year : 802
Total Users : 236251