शेती विकासाचा कळीचा मुद्दा

0
435

आधुनिक शेतीचा येवढा मोठा बोलबाला होत असतानाही आज ग्रामीण भागात पारंपारिक शेतीमध्येच शेतकरी अडकून पडले आहेत. याची अनेक कारणे आहेत. असे का ? हाच खरा भारतीय शेती विकासाचा कळीचा मुद्दा आहे.

काही भागात शेतीत रात्रंदिवस कष्ट करूनही चांगले उत्पादन घेता येत नाही. कारण काय तर पावसाचा धोका ! हा धोका कायमच असतो. कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ याला नेहमीच शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करून त्याचा शेतीसाठी उपयोग करायचा तर ही गोष्ट खर्चीक वाटते नव्हे आहेच ! ती सर्वसामान्य शेतकर्‍याला परवडणारी नसते. यांत्रिक औजारे वापरायाची तर एकतर जमिनीच्या वाटण्या होऊन विभागणी झालेली आहे; नाहीतर शेतीचे छोटे छोटे तुकडे वाट्याला आलेले आहेत. त्यात यांत्रिक औजारे वापरता येत नाहीत. असे बरेच प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहेत. हा प्रश्‍न डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सपाट मैदानावरील जमिनीत यांत्रिक साधनांचा उपयोग करता येईल परंतु ते क्षेत्र बागायत असावे लागते जिराईत शेतीत खर्चाचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे आज आपल्या शेतकर्‍यांसमोर असे अनेक प्रश्‍न उभे दिसतात.

अशाच प्रश्‍नातून आता आता पर्यायी शेतीचा मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. आज शहरी लोकांनी फार्महाऊसच्या नावाखाली जमिनी घेवून शेती क्षेत्राचा वेगळ्या कामासाठीच उपयोग करायला सुरूवात केली आहे. काही शेतकरी पैशाच्या अमिषाला बळी पडू लागले आहेत. यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. कारण खेडोपाडी पाश्‍चात्य संस्कृतीच्या शिरकाव होऊ लागला आहे. ही संस्कृतिक भिन्नता पुढील काळात घातक ठरणारी आहे. म्हणून शेतकर्‍यांनी आपली शेती वाचवली पाहिजे. त्यासाठी शासनाच्या काही योजनाही जाणून घेवून आपल्या शेतीमध्ये नवेनवे प्रयोग करण्याकडे लक्ष वेधावे. शेती करीत असताना पर्यावरणाचाही समतोल राखणे हेही शेतीच्या आणि शेतकर्‍यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आणि गरजेचे मुद्दा आहे. ग्रामिण युवकांना शहरांची वाट धरण्यापेक्षा शेतीमध्ये लक्ष द्यावे नाहीतर भविष्यात शेतीला धोका निर्माण होऊ शकतो. ज्या शेतीत चांगले उत्पादन घेता येत नाही अशा पडीक जमिनीत, माळरानात डोंगर उतारावर सागासारख्या वनपिकाची लागवड करावी, त्यासाठी व्यापारी तत्वाचा स्वीकार करावा.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]