केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘गुळा’चा समावेश झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सोळा विशेष घटक योजनेतील दोन अशा १८ जणांना या योजनेचा लाभ मिळविता येईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची गुऱ्हाळे अत्याधुनिक आहेत, किंवा ज्यांना नवीन गूळ उद्योग सुरू करायचा आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरून पहिल्यांदाच गुळासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात वैयक्तिक मदतीची ही योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उद्योग उभारणी किंवा विस्तारीकरणासाठीही अनुदान मिळणार असून, त्याबरोबर गुळाचे ब्रॅडिंग करण्यासाठी खर्चाच्या पन्नास टक्के रक्कमही गूळ उत्पादकांना मिळेल हे या योजनेचे मूख्य वैशिष्ट्य आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ तयार करणाऱ्या संस्था किंवा वैयक्तिक शेतकरीही या योजनेसाठी पात्र ठरू शकतील. यामुळे जिल्ह्यातील गुळाच्या बाबतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या उत्पादकांसाठी शासनाच्या वतीने अर्थसाह्याची नवी संधी उपलब्ध करण्यात आली आहे.केंद्राने आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत जिल्हा स्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीने एक जिल्हा एक उत्पादन याची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्याचे नेतृत्व करणारा उद्योग सुचविण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये गूळ उद्योगाचा समावेश करण्यात आला आहे. गूळ हे भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादन आहे. याचबरोबर संपूर्ण देशात कोल्हापुरी गूळ प्रसिद्ध आहे. उसाच्या क्षेत्रात जिल्हा आघाडीवर असल्याने जिल्ह्यात गूळ उद्योगाला मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन या योजनेसाठी गूळ उद्योगाची निवड करण्यात आली.
योजने विषयी : गूळ उद्योगात काम करणारे, करू इच्छिणारे वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, संस्था योजनेसाठी पात्र असतील. उत्पादनाच्या ब्रॅंडिंग व विक्रीसाठी साह्यता मिळणार, यासाठी खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान मिळणार. संस्थेच्या उद्योगाच्या बळकटीसाठी शासनामार्फत सहकार्य करणार. योजनेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करून देणार. योजनेसाठी जास्तीत जास्त दहा लाख किंवा प्रकल्पाच्या पस्तीस टक्के अनुदानाची सोय. गुळाबरोबरच काकवी व गुळाचे अन्य पदार्थ तयार करणारे उद्योजकही लाभ मिळवू शकतात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात योजनेचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहे.