राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड देत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने दडी दिली आहे. हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर आशा दुणावलेल्या शेतकऱ्याच्या शिवारावर निराशेचे ढग दाटले आहेत. येत्या चार दिवसात पाऊस नाही पडला तर खरीपातील अगात पुर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता, या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. मात्र पावसाने मारलेली दडी लांबत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे.

यंदा राज्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. त्याबरोबरच आगातामधील मुग, उडीदाचे क्षेत्रही बर्यापैकी आहे. गेल्यावर्षी मुग, उडीद पिकांना चांगला भाव मिळाल्यामुळे त्याचे लागवड क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे लांबलेल्या पावसाचा फटका सोयाबीन उत्पादकांबरोबरच मुग, उडीद उत्पादक शेतकर्यांनाही बसणार आहे. शिवाय राज्यात कांदा उत्पादक शेतकर्यांनी रोपासाठी टकलेले बी कडक उन्हामुळे जाग्यावर करपून जाण्याच्या मार्गावर आहे. दिवसभर कडक उन्ह आणि रात्री गारवा यामुळे, आहे त्या पिकावर मोठ्या प्रमाणात काळ्या माव्याचा प्रादुर्भाव झाला असून त्याच्या बरोबरीने रसशोषक किडींचाही प्रादुर्भाव वाढला आहे. सध्य स्थितीला खरीप पिकांना पावसाची अत्यंत गरज असताना पाऊस दडी मारून बसला आहे. रानातील सोयाबीन, मुग, उडीद, तूर या पिकाने माना टाकल्या असून, शेतकर्यांची चिंता वरचेवर वाढत चालली आहे. पावसाने अशीच हुलकावणी दिली तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिंता शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.

जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली, काही भागात नकोसे करून सोडले. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाने चक्क दडी मारली आहे. ऑगस्ट मध्यावर आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकर्यांची धाकधूक वाढत आहे.
दररोज आभाळ भरुन येते. पाऊस पडणार असे संकेतही मिळतात. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाहायला मिळते. खरीपाच्या पेरण्या काही भागात खोळबंळलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी दुबार पेरणींचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. पावसाने दिलेली उघडीप आणि कोरोनामुळे मंदावलेलं आर्थिक चक्र यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी पिकातील आंतरमशागतीची कामेही पूर्ण केली आहेत. आता सर्व पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पण नेमक्या पीकवाढीच्या अवस्थेतच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके सध्या चांगलीच बहरली आहेत. मात्र या पिकांना सध्या पावसाची अत्यंत गरज आहे.

यंदा अधिक भाव मिळण्याच्या आशेने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. जमिनीत असलेल्या ओलाव्याच्या आशेवर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, शेतात असलेलं पिक टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ठिबक सिंचनाद्वारे असलेले पीक वाचविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
गेल्या पंधरवड्यापासून पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्याने या पिकांवर संकट ओढावले आहे. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जून व जुलैत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, बहुतांश जिल्ह्यांनी पेरणीचे उद्दिष्ट गाठले आहे.
वेधशाळेकडून हवामानाचे वर्तविले जाणारे अंदाज सातत्याने चुकत आहेत. मुसळधार किंवा विक्रमी पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, ऐन श्रावणात उन्हाच्या झळ्या सहन कराव्या लागत आहेत. वेधशाळेच्या अंदाजानुसार शेतकरी पिकांचे नियोजन आखतात. मात्र यंदा वेधशाळेच्या अंदाजावर भरोसा ठेवल्यामुळे त्यांचे नियोजन कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा