उष्ण व कोरड्या हवामानात आवळ्याची फळबाग चांगली येते. कडक हिवाळा या पिकास मानवतो. आवळा फळझाड अवर्षणप्रवण भागासाठी वरदान आहे. कारण ते 45 अंश सेल्सिअस उच्च तापमानात तसेच हिवाळ्यात थंडीत 10 अंश सेल्सिअसपर्यंत कमी तापमानात चांगले वाढते.
राज्यामध्ये आवळा पिकाखाली जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्र असून वार्षिक उत्पादन 95 हजार टनांच्या जवळपास आहे. ‘सी’ जीवनसत्त्वाचे आवळा हे भांडार आहे. आवळा हे फळ अतिशय पौष्टीक असून पित्त, अपचन, रक्त व त्वचेचे विकार, ज्वर, मधुमेह, पंडुरोग, केसाचे आरोग्य इत्यादींवर आवळा उपयोगी आहे. आवळ्यापासून 25 ते 30 प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. त्यामध्ये प्रामुख्याने मोरावळा, सुपारी, केसवर्धक तेल, लोणची, त्रिफळाचूर्ण, जॅम, सॉस, खजूर, च्यवनप्राश, गुलकंद यांचा समावेश होतो.

हवामान आणि जमीन : उष्ण व कोरड्या हवामानात हे पीक चांगले येते. कडक हिवाळा या पिकास मानवतो. आवळा फळझाड अवर्षणप्रवण भागासाठी वरदान आहे. कारण ते 45 अंश सेल्सिअस उच्च तापमानात तसेच हिवाळ्यात थंडीत 10 अंश सेल्सिअसपर्यंत कमी तापमानात चांगले वाढते. आवळ्यासाठी हलकी, मुरमाड, मध्यम, डोंगर उतारावरील जमिनीपासून सुपीक, गाळाची, भारी, कसदार व पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन योग्य आहे. आवळा क्षारयुक्त, खार्या चोपन जमिनीतही (7.5 ते 9 सामू असणार्या) चांगला येऊ शकतो. आवळ्याला कॅल्शियमयुक्त जमीन चांगली मानवते.
सुधारित जाती : बनारसी, कृष्णा, कांचन, चकैय्या, नरेंद्र – 6, नरेंद्र -7, नरेंद्र -9, नरेंद्र – 10, नीलम, फ्रांसिस, आनंद -1, आणि आनंद -2 इत्यादी नरेंद्र 7 जातीच्या आवळ्याची फळे आकाराने मोठी (45 ते 50 ग्रॅम वजनाची), लंब गोलाकार, फिकट पिवळ्या रंगाची असतात.
लागवड तंत्रज्ञान : आवळ्याची डोळे भरून (ठिगळ पध्दतीने), भेट कलमाद्वारे अभिवृध्दी करून जातीवंत आवळा कलमे तयार करावीत. कमी पाऊस पडणार्या प्रदेशात जागेवरच ‘बी’ पेरून रोपे वाढवून एक वर्षानंतर डोळे भरावेत. डोळा भरताना वापरण्यात येणारी कलम काडी मादी फुलाचे प्रमाण जास्त असणार्या फांदीवरील निवडावी. पावसाळ्यापूर्वी जमिनीची आखणी करून एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. हलक्या जमिनीत सहा बाय सहा मीटर, मध्यम जमिनीत सात बाय सात मीटर तर भारी जमिनीत आठ बाय आठ मीटर अंतरावर लागवड करावी. खड्डे खोदल्यानंतर 15 दिवसांनी, खड्डे माती अधिक 10-15 किलो शेणखत अधिक एक किलो सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम लिडेंन पावडर प्रति खड्डा प्रमाणे मिसळून भरून घ्यावेत.
आवळा लागवडीनंतर रोपांना बाबूंच्या काठीने आधार द्यावा. आवळ्याच्या झाडावर जमिनीपासून एक मीटर उंचीनंतर पाच ते सहा जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारही बाजूने ठेवाव्यात. खोडावर एक मीटर उंचीपर्यंत येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी व हंगाम संपल्यावर रोगट, कमजोर वाळलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात. आवळ्यामध्ये चवळी, उडीद, मूग, वाटाणा, हरभरा, टोमॅटो, भुईमूग, भेंडी, गवार, टरबूज, वांगी इत्यादी आंतरपिके घ्यावीत.
खत व पाणी व्यवस्थापन : एक ते तीन वर्ष वयाच्या झाडांना 15 ते 20 किलो आणि तीन वर्ष वयाच्या वरील झाडांना पाच वर्ष वयावरील झाडांना 40 ते 50 किलो शेणखत जून- जुलैमध्ये द्यावे. पाच वर्ष वयावरील झाडांना दोन हप्त्यात 1375 ग्रॅम युरिया, 1600 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट 400 ग्रॅम मुरेट ऑफ पोटॅश प्रत्येक झाडाला प्रती वर्षी जून- जुलै महिन्यात द्यावे. जानेवारी-फेबु्रवारीमध्ये खतांचा शिल्लक हप्ता दिल्यास फायदेशीर ठरतो. नवीन लागवड केलेल्या रोपांना सुरूवातीच्या तीन वर्षापर्यंतच्या काळात आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
डॉ. लालासाहेब तांबडे कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर. (मो. 9422648395)