टोमॅटोची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात होत असल्याने बाजारात टोमॅटो जवळ-जवळ बाराही महिने उपलब्ध होतात. टोमॅटोतील पौष्टिकतेमुळे सर्व स्तरातील लोक त्याच्या आहारात उपयोग करतात. उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारी ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय खनिजे, चुना, लोहा इत्यादी पोषकद्रव्येही पुरेशा प्रमाणात आढळतात. टोमॅटो फळे कच्ची खाण्यासाठी, भाजी, आमटी, चटणी, सूप तसेच टोमॅटो केचप, सॉस इत्यादी टिकाऊ पदार्थ करता येतात.
हवामान व जमीन : टोमॅटो हे उष्ण हवामानात येणरे पीक आहे. हमखास पाण्याची सोय असलेल्या व तापमान 38 सेल्सिअस पेक्षा कमी असलेल्या ठिकाणी टोमॅटोची लागवड यशस्वी ठरते. पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत टोमॅटोचे पीक फारच चांगले येते. जमिनीचा सामू सहा ते सात असावा.
लागवड : लागवडीपूर्वी जमीन उभी-आडवी नांगरून घ्यावी. हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत पसरावे. कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. 90 सेमी अंतरावर सरी कराव्या. वरंबा रूंद करावा म्हणजे पाळी घेण्याचा कालावधी लांबवीता येतो. शिवाय हवा खेळती आंतरमशागतीची मुबलक सूर्यप्रकाश मिळतो शिवाय आंतरमशागतीची कामे औषध फवारणे, आधार देणे, खुरपणी करणे, फळे काढणी इत्यादी कामे सहज करता येतात. लागवड 30 सेमी अंतरावर करावी. लागवडीसाठी तीन ते चार आठवड्याची 12 ते 15 सेमी उंचीची निरोगी रोपे लागवड करावी. लागवड ओल्यातच व शक्यतो सायंकाळी करावी.
सुधारीत जाती : महाराष्ट्रात लागवडीच्या आणि बाजारपेठांच्या दृष्टीने उपयुक्त जाती.
पुसा अर्ली ड्वार्फ : लवकर फळे येणारी व झुडूप व जाड वाढणारी ही बुटकी जात तिन्ही हंगामात चांगल्या तर्हेने फळ देते. पहिली फळांची तोडणी लागवडीनंतर 75 ते 85 फळ देते. फळे मध्यम आकाराची गोल, संपूर्णत: लाल रंगाचे असते. उत्पादन हेक्टरी 395 क्विंटल मिळते.
पुसा रूबी : महाराष्ट्रात खरीप रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात भरपूर उत्पादन देते ही लवकर येणारी जात असून लागवडीनंतर 85 ते 90 दिवसांनी पहिली तोडणी मिळते. उत्पादन 325 क्विंटल पर्यंत मिळते. फळे मध्यम चपट्या आकाराची, गर्द लाल, फळांवर खाचण्या टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी उत्तम.
पुसा शीतल : हिवाळी हंगामात लागवडीस योग्य खरीप हंगामात सुद्धा लागवड करता येते. लागवडीपासून 60 ते 65 दिवसांत फळधारणा होते. झाडे बुटकी झुडूप वजा वाढणारी, फळे चपटी, गोल व लाल रंगाची उत्पादन हेक्टरी 350 क्विंटल पर्यंत मिळते.
रोमा : या जातीची झाडे ठेंगणी व झुडूप वजा वाढतात. फळे लांबट साल जाड असते. लांबच्या वाहतुकीसाठी चांगली हेक्टरी उत्पादन 300 क्विंटल पर्यंत मिळते.
मारग्लोब : फळ मध्यम व मोठ्या आकाराचे गोल तांबडे रसरशीत असते. स्थानिक बाजारपेठेसाठी ही जात चांगली उत्पादन हेक्टरी 350 क्विंटल पर्यंत मिळते.
अरका विकास : झाडे मध्यम उंचीची, फळे आकर्षक लाल रंगाची, मोठी लांबट गोल हेक्टरी 350 ते 400 क्विंटल उत्पादन मिळते.
धनश्री : या जातीची फळे मध्यम आकाराची एकसारखी गोल व चमकदार, फळे नारंगी लाल रंगाची असतात. फळाचे वजन सरासरी 60 ते 80 ग्रॅम असते. फळांची पहिली तोडणी लागवडीपासून 65 दिवसांनी सुरू होते. हेक्टरी सरासरी उत्पन्न 850 क्विंटल असावे.
भाग्यश्री : या जातीची फळे मध्यम व मोठी, देठाकडे फळ उभट असते. फळाचे सरासरी वजन 90 ते 100 ग्रॅॅम असून पिकलेली फळे गडद लाल रंगाची फळांतील पहिली तोडणी लागवडीपासून 60 दिवसांत सुरू होते. प्र. हेक्टरी सरासरी उत्पादन 650 ते 700 क्विंटल होते. केचप व सॉस इत्यादींसाठी ही फळे चांगली आहेत.
संकरीत जाती : वैशाली : खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. ही जात मर रोगास बळी पडत नाही. फळे आकाराने लंब गोल असून फळांचा रंग गर्द लाल असतो. उत्पादन हेक्टरी 80 ते 90 टन सरासरी येते.
रूपाली : या जातीच्या झाडांना भरपूर पाने असल्याने उन्हाळ्यात फळांना उन्हापासून संरक्षण होते. फळे आकाराने लंब गोल. 100 ग्रॅम वजनाची असतात. फळांचा गर घट्ट असून रंग गर्द लाल असतो. ही जात मर रोगास प्रतिकारक आहे. उन्हाळी आणि हिवाळी हंगामातील लागवडीस ही जात चांगली उत्पादन सरासरी हेक्टरी 80 ते 90 टण मिळते.
रश्मी : या जातीची फळे गोल आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळांचे सरासरी वजन 80 ग्रॅम असते. गर घट्ट असल्याने फळांवर प्रक्रिया करून टिकाऊ पदार्थ बनविण्यासाठी तसेच वाहतुकीस व साठवणूकीसाठी ही चांगली आहे. उत्पादन सरासरी 70 ते 80 टन मिळते.
रत्ना : या जातीची फळे आकाराने गोल असून फळाचे सरासरी वजन 70 ते 80 ग्रॅम असते. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 100 ते 120 टन मिळते.
नवीन : या जातीची फळे आकाराने लंब गोल असून फळांचे सरासरी वजन 80 ग्रॅम असते. फळांचा रंग आकर्षक लाल साल तळकत नाही. उन्हाळई लागवडीसाठी ही जात चांगली ही जात मर रोगास बळी पडत नाही. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 80 ते 90 टन येते. संकरीत जाती खाजगी बीज उत्पादक कंपन्यांनी विकसित केले आहेत. याशिवाय अभिनव (सिजेंन्टा), स्मिता (युनिकॉर्न), एन.एस.815-एफ-1 (नामधारी), यू.एस. 1080 (यू.एस. ॲग्री सीडस्), निधी (सेमिनीस), सदाबहार (महिको) या महत्त्वाच्या जाती आहेत.
खते आणि पाणी व्यवस्थापन : सरासरी हेक्टरी 40 टन उत्पादन देणारे टोमॅटोचे पीक जमिनीतून 93 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 126 किलो पालाश शोषून घेते. खताच्या मात्रा प्रामुख्याने जमिनीची प्रत लागवडीचा हंगाम जातीचा प्रकार यावर अवलंबून असतात. टोमॅटोच्या पिकाला 120 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या प्रमाणात द्यावी. याशिवाय शेणखत कमी असेल तर वरखताचा दुसरा हप्ता देताना दर हेक्टरी 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, पाच किलो झिंक सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट, एक किलो मँगनीज सल्फेट आणि एक किलो बोरॅक्स पावडर नत्रयुक्त खतात मिसळून द्यावे. रोपांच्या लागवडीनंतर तीन ते चार दिवसांनी हलके पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे खरीप हंगामात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळी हंगामात पाच ते सहा दिवसांच्या अंतराने रोपांना पाणी द्यावे. फुले येण्याच्या आणि फळांच्या वाढीच्या काळात पाण्याचा ताण पडू देवू नये. भारी काळ्या जमिनीत हलके पाणी द्यावे.
आंतरमशागत : टोमॅटोच्या लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी टोमॅटोच्या शेताची खुरपणी करावी. वाढत्या मजुरीमुळे खुरपणी आणि इतर कामे अधिक खर्चाची होतात. म्हणून रासायनिक तणनाशकाचा वापर करून खुरपणीचा खर्च कमी करता येईल. त्यासाठी रोपांच्या लागवडीपूर्वी बासालीन हे तणनाशक हेक्टरी दोन किलो या प्रमाणात 500 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या वाफ्यावर फवारावे आणि लगेच पाणी द्यावे व रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर 40 दिवसांनी खत सरीमध्ये घालून रोपांच्या समोरच्या वरंब्याना निम्मा भाग तोडून रोपांना मातीची भर द्यावी.
काढणी आणि उत्पादन : रोप लागवडीपासून 75 ते 90 दिवसांत फळांची पहिली काढणी सुरू होते. वाहतुकीचे साधन आणि बाजारपेठेचे अंतर लक्षात घेऊन टोमॅटोच्या फळांची काढणी करावी काढणी पुढीलप्रमाणे करावी.
हिरवी पक्व अवस्था : फळे लांबच्या बाजारपेठेत पाठवायची असल्यास ती पूर्ण वाढलेली पण हिरवी असतानाच काढावी.
गुलाबी अथवा पीकअवस्था : फळांचा रंग हिरवा बदलून त्यावर तांबूस छटा दिसू लागली की, टोमॅटोची काढणी करावी. अशी फळे जवळपासच्या बाजारपेठेत पाठविण्यास उत्तम असतात.
पक्व अवस्था : स्थानिक बाजारात विकण्यासाठी फळे झाडावरच लाल रंगाची झाल्यानंतर काढणी करावी.
पूर्ण पक्व अवस्था : या अवस्थेत फळ झाडावरच पूर्ण विकून लाल रंगाचे किंचीत मऊ असते. अशी फळे केचपट सॉस, सुप, चटणी वगैरे टिकाऊ पदार्थ करण्यासाठी उपयुक्त असतात.
उत्पादन : टोमॅटोचे सरासरी 25 ते 35 टन मिळते. उत्तम मशागत केल्यास 50 ते 60 टन पर्यंत उत्पादन मिळू शकते.
टोमॅटो रोपे तयार करणे : टोमॅटोची रोपी तयार करण्याकरीता गादी वाफे तयार करावे. वाफे करण्यापूर्वी जमिनीची मशागत करावी. मीटर रूंद, तीन ते पाच मीटर लांब आणि 15 ते 20 सेंटिमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. टोमॅटोच्या एक हेक्टर लागवडीसाठी 20 ते 25 गादीवाफे पुरेसे होतात. वाफ्यांचा पृष्ठभाग सपाट करून त्यावरील मोठी ढेकळे, काडी-कचरा आणि दगड वेचून घ्यावे. गादी वाफ्यावर चार ते पाच घमेले कुजलेले शेणखत 500 ग्रॅम सुफला आणि 50 ग्रॅम थिमेट टाकावे. सर्व मिश्रण वाफ्याच्या वरच्या थरात चांगले मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रूंदीशी समांतर सहा सेंटिमीटर अंतरावर रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे. सर्वसाधारणपणे एका वाफ्यात 10 ग्रॅम पी पेरावे. बी मातीने झाकून घ्यावे. बियांच्या पेरणीनंतर वाफ्याना झारीने पाणी द्यावे. रोपांना नियमित पाणी द्यावे. वाफ्यामध्ये आर्द्रतेत वाढ करण्यासाठी वाफ्यावर पाचट झाकावे किंवा 50 ते 75 टक्के शेडींगनेटचे पिंजरे लावावे. बियांची उगवण झाल्यानंतर आर्द्रतेकरीता वापरलेली पाचट दररोज 20 ते 25 टक्क्यांनी कमी करावी. या क्रियेमुळे रोपांना कणखरपणा येतो. वाफ्यात उगवलेले तण हळूवारपणे काढावे व वाफ्यांना नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
रोपे लहान असताना त्यांचे मर रोगामुळे नुकसान होते. मर रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पेरणी-पूर्वी बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियांना दर किलो बियांना तीन ते चार ग्रॅम थायरम चोळून नंतर पेरणी करावी. बी उगवून आल्यानंतर फुलकिडे व करपा रोगांपासून संरक्षण होण्यासाठी 10 लिटर पाण्यात 12 ते 12 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेन एम-45 मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. महाराष्टातील हवामानात टोमॅटो पीक जवळ-जवळ वर्षभर केव्हाही घेता येते. खरीप जून किंवा जुलैमध्ये बी पेरतात. तर हिवाळी हंगामासाठी सप्टेंबर डिसेंबर जानेवारीत बियांची पेरणी केली जाते.
हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बी पुरते. रोपे तीन ते चार आठवड्याची झाल्यानंतर साधारणत: 12 ते 15 सेंटिमीटर उंचीची झाली म्हणजे लागवड करावी.
टोमॅटोच्या झाडाला आधार देणे : टोमॅटो पिकाचे खोड आणि फांद्या कमकुवत असतात. मुख्य खोडांना आणि फांद्यांना आधार दिल्यास झाडांची आणि फांद्याची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळांची गुणवत्ता वाढते. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्याची संपर्क येत नाही. त्यामुळे सडण्याचे आणि रोगाचे प्रमाण फारच कमी होते. फळांची तोडणी औषध फवारणी, खुरपणी करणे, खते देणे, आणि भर देणे इत्यादी कामे सुलभतेने करता येतात. टोमॅटोच्या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो. पहिला प्रकार म्हणजे प्रत्येक झाडाजवळ 1.5 ते दोन मीटर लांबीच्या आणि 2.5 मीटर जाडीच्या काड्या रोवून झाड जसे जसे वाढत जाईल तसतसे ते काठीला बांधत जावे. आधारासाठी बांबू शेवटी सुबाभुळ, वेडीबाभूळ यांच्या काड्यांचा वापर करतात.
दुसर्या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठ्यांचा वापर करून ताटी केली जाते आणि अशा ताटीच्या आधारे झाडे वाढविली जातात. प्रत्येक झाडाला बांबू किंवा काठ्यांचा आधार देण्यापेक्षा ताटी पद्धतीमध्ये खर्चाची बचत होते. ताटी आणि तारा पुन्हा तीन ते चार वेळा पुन्हा वापरता येतात.
सरीच्या बाजूने प्रत्येक 10 फुट अंतरावर पहारीने दर घेऊन त्यात 1.5 ते दोन मीटर उंचीच्या आणि 2.5 सेमी जाडीच्या काठ्या घट्ट बसवतात. सरीच्या दोन्ही टोकाला जाड लाकडी डांब बांधाच्या दिशेने तिरपे रोवावेत. प्रत्येक डांबाच्या समोर जमिनीत जाड खुंटी रोवून डांब खुंट्याशी तारेच्या सहाय्याने ओढून घ्यावेत. त्यानंतर 16 गेजची तार सरीच्या एका टोकाकडून बांधत जावून आणि प्रत्येक काढीला वेढा द्यावा आणि ताण देवून दुसर्या टोकापर्यंत ओढून घ्यावी. अशा प्रकारे तारेचे एकावर एक दोन ते तीन पदर ओढावेत. पहिली तार जमिनीपासून 45 सेमी दुसरी 90 सेमी आणि तिसरी तार 120 सेमी मीटर अंतरावर बांधावी. ओपांच्या वाढणार्या फांद्या ताराच्या आधाराने पसरवून सुतळी किंवा नायलॉनच्या दोरीने बांधाव्यात. रोपे जसजशी वाढत जातील तसतसे फांद्या पसरवून दुसर्या आणि तिसर्या तारेपर्यंत सुतळीने बांधण्याचे काम नियमित चालू ठेवावे.
झाडांना आधार देत असतानाच वळण देण्याचे काम करावे. रोपे लागवडीनंतर झाडाचा शेंडा वाढत बगल फुटी मुळातून खुडून टाकाव्यात. आणि 30 सेमी उंचीवर दोन फांद्या राखून झाडांची वाढ करून घ्यावी.
उन्हाळी हंगामात फळांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी बगल फुटी मुळातून न खुडता त्या 12 ते 15 सेमीपर्यंत वाढू द्याव्यात आणि नंतर त्यांचा शेंडा खुडावा. यामुळे खोडाभोवती पाने राहतात आणि ही पाने फळांचे उन्हापासून संरक्षण करतात.
प्रा. संजय आमले, प्रा. सतीश धर्माळ शरद पवार कृषी तंत्र विद्यालय, जळगाव (जा), जि. बुलढाणा.