पिकांना आवश्यक असणाऱ्या 16 ते 18 अन्नद्रव्यांच्या पुरवठा करताना जमिनीची भौतिक स्थिती योग्य असली पाहिजे. जमिनीचा सामू (pH), क्षारता (EC), सेंद्रीय कर्ब (C) आणि चुनखडी (CaCO3) प्रमाण योग्य असेल तर पिकाची चांगली वाढ होऊ शकते. मात्र, जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यास पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यामध्ये अडचणी येतात. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्राचे व्यवस्थापन
1) चुनखडीयुक्त जमिनी अल्कलीधर्मी असल्यामुळे नत्राचे रूपांतर होण्याच्या गतीवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीतील नायट्रोसोमोनस, नायट्रोबॅक्टरसारखे जिवाणू नत्राचे अमोनिया स्वरूपामध्ये रूपांतर करतात. नायट्रेट स्वरूपातील नत्र पिके शोषून घेतात. म्हणून ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
2) नायट्रिफिकेशन ही क्रिया जमिनीचा सामू 7 ते 8 च्या दरम्यान असल्यास जास्त गतीने होते. जमिनीचा सामू जर 5 ते 7.5 च्या दरम्यान असेल तर अमोनियमयुक्त नत्र खताचा वापर फायदेशीर ठरतो. परंतु जमिनीमध्ये कार्बोनेटचे प्रमाण अधिक असल्याने अमोनियम खताचा परिणाम दिसून येत नाही. उलटपक्षी नत्राचा ऱ्हास होऊन नुकसान होते.
नक्की वाचा : काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ?
3) जमिनीतील कॅल्शियम कार्बोनेटसोबत अमोनियमची प्रक्रिया होऊन अमोनियम कार्बोनेट तयार होते. यातील अमोनियम कार्बोनेटचे रूपांतर अमोनिया वायू, पाणी आणि कर्बवायूमध्ये होते आणि नत्राचा ऱ्हास होतो. त्यामुळे अमोनियम सल्फेट, अमोनियम फॉस्फेटसारख्या खताचा वापर चुनखडीयुक्त जमिनीत करू नये. त्याऐवजी अमोनियम नायट्रेट, अमोनियम क्लोराइडयुक्त खतांचा वापर करावा. अर्थात क्लोराइडचे जमिनीतील प्रमाण तपासून या खताचा वापर हितावह ठरतो.
4) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहाची कमतरता असते. त्यामुळे मुळांच्या वाढीमध्ये लेगहिमोग्लोबिन पदार्थ कमी तयार होतात. या लेगहिमोग्लोबिनमुळेच हवेतील नत्र मुळावरील गाठीमध्ये साठविले जाते.
5) नत्र खतांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. नत्र खतांचे रूपांतर अमोनिया वायूमध्ये होऊन ऱ्हास टाळण्यासाठी खते जमिनीच्या पृष्ठभागावर न राहता ताबडतोब मातीत मिसळली जावीत. त्यासाठी जमिनीत योग्य ओलावा असणे अथवा खते दिल्यावर जमिनीस पाणी देणे महत्त्वाचे ठरते. तसेच अमोनियाद्वारे होणारा नत्राचा ऱ्हास टाळण्यासाठी युरिया हा म्युरेट ऑफ पोटॅश, कॅल्शियम क्लोराइड किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट खतासोबत मिसळून द्यावा.
महत्त्वाची माहिती : पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य
6) तसेच दाणेदार युरिया, गंधकाचे आवरण असलेला युरिया व निमावरण असलेल्या युरियाच्या वापराने नत्र खताची उपयोगिता वाढविता येते.
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाचे व्यवस्थापन
1) जमिनीतील स्फुरद किंवा खताद्वारे दिलेल्या स्फुरदाची उपलब्धता जमिनीचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असताना अधिक असते. चुनखडीयुक्त जमिनीचा सामू 7.5 पेक्षा जास्त असल्याने पिकांना पुरेसा स्फुरद उपलब्ध होत नाही.
2) स्फुरदाचे रूपांतर अत्यंत कमी विद्राव्य अशा फॉस्फेट, मॅग्नेशियम फॉस्फेट या संयुगामध्ये होते. यालाच स्फुरदाचे स्थिरीकरण म्हणतात.
3) फॉस्फेट संयुग पोयट्याच्या कणांवर किंवा चुन्याच्या कणांवर बसते आणि त्याचा डाय कॅल्शियम फॉस्फेट, ऑक्टॅकॅल्शियम फॉस्फेट संयुगाच्या रूपाने साका तयार होतो. ज्या प्रमाणात जमिनीचा सामू वाढत जातो, त्या प्रमाणात संयुगे होण्याची क्रिया वाढते.
हे नक्की वाचा : पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर
4) स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही. त्यासाठी स्फुरद खतांची मात्रा वाढविणे आणि जमिनीस स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा पुरवठा करणे हा पर्याय उरतो. सतत किंवा नेहमी चुनखडी जमिनीत सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेटसारख्या खतातून स्फुरद देणे योग्य नाही. कारण त्यांची विद्राव्य क्षमता ही अत्यंत कमी असते.
5) उलटपक्षी त्यांचे स्थिरीकरणच जास्त होते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद खते दाणेदार स्वरूपात, तसेच सेंद्रिय खतासोबत दिल्याने स्फुरदयुक्त खतांची उपयोगिता वाढते. या पद्धतीमुळे खतांचा जमिनीतील कणांशी कमी संपर्क व संयोग होतो आणि अविद्राव्यता कमी होते.
6) पिकांच्या मुळांशी वाढ वेगाने होत असताना स्फुरदयुक्त खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे. चुनखडीयुक्त जमिनीत घेतलेल्या संत्रा, मोसंबीसारख्या पिकांना दर वर्षी नियमितपणे स्फुरद खत देणे आवश्यक आहे.
फायद्याच्या टिप्स : सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1