विविध फळांमध्ये केळी, डाळिंब, अंजीर, करवंदे, जांभूळ, चिकू, सीताफळ, रामफळ, संत्री, मोसंबी, द्राक्षे, फणस, बोरे, अननस इत्यादी अनेक प्रकारची फळे समाविष्ट होतात. ज्याआहारात फळांचा समावेश अधिक त्या आहाराला संरक्षक आहार म्हणून संबोधले जाते. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासून आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून १२.१२ लाख मे. टन उत्पादन मिळते. महाराष्ट्रात कोकण व गुजरातमध्ये आंब्याचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्याचप्रमाणे तामिळनाडू, कर्नाटकांतही आंब्याचे उत्पादन होते.
आंब्याचे फायदे : आंब्यात व्हिटॉमिन ‘ए’, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात आंबा खाणे फायदेशीर ठरते. आंब्यामध्ये व्हिटॅमीन ‘बी–६’, खूप अधिक प्रमाणात असते. आंब्यात शर्करा असल्याने आंब्यापासून शरीरास ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्हाला अॅक्टीव्ह वाटते. उन्हाळ्यात आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणे अधिक फायदेशीर ठरेल. आंब्यात व्हिटॉमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात. आंब्यात फायबर्सही मुबलक असतात. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांनी आंबा खाल्ला तर त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. आंबा खाल्ल्याने कॅन्सरची भीती कमी होते व कोलेस्टरॉल कमी करण्यात उपयोगी होते. गरोदर स्त्रियांना आंब्यामधून भरपूर प्रमाणात आयर्न मिळते.
आंब्याच्या जाती (प्रकार) : आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्याचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक प्रांतात त्याची चव रंग रूप यात वेगळेपणा असतो. दक्षिण भारत, उत्तर भारत, पश्चिम भारत, प्रत्येक मातीमध्ये निसर्गाने त्याला चवीचे आणि आकाराचे वेगळे वरदान दिले आहे. आंब्याचा रंग हा मोहक पिवळा परंतु वेगवेगळ्या आंब्याच्या जाती प्रमाणे त्याच्या रंग छटा बदलतात. तोतापुरी, नीलम, दशहरी, पायरी, रायवळ, लंगडा, रूमानिया, हापूस, लालबाग, केसरीबाल्साल्ड आंबा, कलमी, राजापुरी, देवगड अश्या एकूण १३०० पेक्षा जास्त जाती आहेत. सर्वात लोकप्रिय आंब्याची जात आहे ती म्हणजे कोकण हापूस. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया होय.
प्रक्रियायुक्त उत्पादने : आंब्यापासूनजाम, जेली, आंब्याचा रस, स्वादिष्ट पेये तयार करण्यासाठी आंब्याचा उपयोग करतात. कैरीपासून लोणची, पन्हे तयार करून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आंब्याच्या रसाच्या वड्या, आंबापोळी, आम्रखंड अशी विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
आंब्याचे आमचूर
साहित्य : पक्व कैर्या, गंधक
कृती : पक्व कैर्या पाण्याने स्वच्छ धुवूण घ्याव्यात. तीक्ष्ण चाकुच्या सहाय्याने गराच्या फोडी कराव्यात. गरचा रंग बिघडू नये म्हणून गंधकाची धुरी देण्याची पद्धत आहे. या फोडी उन्हात किंवा वाळवणी यंत्रात सुकवतात व नंतर त्या ग्राइंडर माशिनेमध्ये घालून त्याची पावडर करतात व हि पावडर आमचूर म्हणून छोट्याछोट्या पिशव्यात भरून बाजारात विक्रीस पाठवतात.
कच्च्या आंब्याची चटणी
साहित्य : कच्चे आंबे, मीठ (२० ग्रॅम), व्हिनेगर (९० मिली), वेलची (३० ग्रॅम), दालचीनी (३० ग्रॅम), आले (१५ ग्रॅम), बारीक कांदा (६० ग्रॅम), लसूण (१५ ग्रॅम)
कृती : कच्च्या आंब्याची गोड चटणी करण्यासाठी कच्चे आंबे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. फळांच्या गराचे तुकडे करून किंवा किसून घ्यावा किंवा फळे शिजवून त्यांचा गर काढावा. एक किलो गरात किंवा किसात २० ग्रॅम मीठ, ९० मिली व्हिनेगर मिसळावे. मलमलच्या कापडात पुरचुंडीत ३० ग्रॅम वेलची, दालचीनी, १५ ग्रॅम आले, ६० ग्रॅम बारीक कांदा, १५ ग्रॅम लसूण घ्यावा. ही पुरचुंडी गर शिजवताना त्यात सोडवी. साधारण २० मिनिटाने ही मसाल्याची पुरचुंडी पिळून बाहेर काढून टाकून घ्यावी व मिश्रण जॅम सारखे घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रण गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून थंड व कोरड्या जागी साठवावे.
कच्च्या आंब्याचे पन्हे
साहित्य : २०० ग्रॅम कच्चा आंब्याचा गर, १५० ते १७५ ग्रॅम साखर, ३२५ ते ५५० मिली पाणी, १४० मिली ग्रॅम पोटॅशिअम मेटाबाय सल्फाईट.
कृती : पूर्ण वाढ झालेली परंतु कच्ची फळे चांगली स्वच्छ धुवून ती शिजवावीत. ती थंड झाल्यावर त्यांचा गर काढावा. कच्च्या आंब्यांचे पन्हे बनवताना १ किलो पन्हे बनवण्यासाठी २०० ग्रॅम कच्चा आंब्याचा गर, १५० ते १७५ ग्रॅम साखर व ३२५ ते ५५० मिली पाणी मिसळावेत. हे मिश्रण १ मिमी च्या चाळणीतून चाळून घ्यावे. हे पन्हे टिकण्यासाठी त्यात प्रती किलो पन्ह्यात १४० मिली ग्रॅम पोटॅशिअम मेटाबाय सल्फाईट हे परिरक्षक मिसळावे. हे पन्हे गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावे व बाटल्या क्राऊन कॉर्क मशीनने झाकण लावून बंद कराव्यात. या बाटल्यांचे कडक पाण्यात (८५ ते १०० अंश सें.) पाश्चिरीकरण करून त्या थंड झाल्यावर थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
मँगो सालसा
साहित्य : दोन आंबे सोलून बारीक फोडी करणे, एक टॉमेटोचे बारीक तुकडे करणे, एक कांदा– खूप बारीक चिरणे, १/२ हिरवी मिरची बारीक चिरून घेणे, एक टे स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ व मीरपूड.
कृती : एका बाउलमध्ये सर्व पदार्थ एकत्र करून त्यात मीठ व मीरपूड घालावी त्यामुळे चव वाढते.
मँगो वॉटरमेलन स्मूदी
साहित्य : दोन ते तीन कप कलिंगडाच्या फोडी, एका आंब्याच्या फोडी, एक ते दोन टे.स्पून साखर, अर्धा कप पाणी किंवा बर्फाचे तुकडे.
कृती : दोन्ही फळे व साखर ब्लेंड करून घ्यावीत. ग्लासमध्ये बर्फ किंवा थंड पाणी घ्यावे. त्यावर हा पल्प ओतून स्मूदी प्यायला घ्यावी.
मँगो लस्सी
साहित्य : दोन आंबे फोडी करून घ्याव्यात. दोन कप आंबट नसलेले दही, अर्धा कप साखर, एक कप बर्फाचे तुकडे.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंड करून घेणे आणि थंडगार प्यायला देणे.
कच्च्या आंब्यांचा स्क्वॅश
साहित्य : फळांचा गर २५ % – २५० ग्रॅम, साखर ४५ % – २७५ ते ३०० ग्रॅम, आम्लता १.२ % सायट्रिक आम्ला ४.५ ग्रॅम, पाणी ३० % – ३०० मिली
कृती : निवडक कच्ची फळे स्वच्छ धुवून शिजवून त्याचा गर काढून घ्यावा. या कच्च्या आमरसाच्या स्क्वॅश मध्ये ४५ % साखर आणि १.२ टक्के आम्लता असावी. हा स्क्वॅश तयार झाल्यावर १ मि. मी. च्या चाळणीतून गळून घ्यावा व त्यात ५१० मिलीग्राम पोटॅशिअम मेटाबाय सल्फाईट प्रती किलो स्क्वॅश मिसळावे. भरलेल्या बाटाल्यांचेच उकळत्या पाण्यात (१०० अंश सें.) ३० मिनिटे पाश्चारीकरण करावे. या बाटल्या बंद करून थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. स्क्वॅशचा स्वाद येण्यासाठी १:३ प्रमाणात पाणी मिसळावे.
आंब्याचा जॅम
साहित्य : पिकलेली फळे, आंबट फळांसाठी (१ किलो गरासाठी १ किलो साखर) व गोड फळांसाठी (प्रती किलो रसाला ३/४ किलो साखर), २ ते ३ ग्रॅम सायट्रिक अॅसिड.
कृती : आंब्याचा जॅम तयार करण्यासाठी पिकलेली व घट्ट चांगला रस व वास असलेली निरोगी फळे निवडावीत. ती पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करावीत. त्यानंतर या घट्ट फळांचा गर काढण्यासाठी फळांच्या फोडी करून त्यात थोडे पाणी घालून मऊ शिजवावे व नंतर गर काढावा. साखरेचा वापर करताना सर्वसाधारण आंबट फळांसाठी १ किलो गरासाठी १ किलो साखर व गोड फळांसाठी प्रती किलो रसाला ३/४ किलो साखर वापरावी. जॅमची आम्लता ०.५ ते ०.६ % ठेवण्यासाठी त्यात २ ते ३ ग्रॅम सायट्रिक अॅसिड प्रती गरासाठी वापरावे. आमरसात साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळावे व हे मिश्रण मध्यम घट्ट होईपर्यंत १०५ अंश सें. ला उकळून घ्यावे त्यामुळे जास्तीचे पाणी वाफ होऊन निघून जाते. जॅम पूर्ण तयार झाल्यावर त्याचे वजन जॅम तयार करण्यासाठी लागलेल्या साखरेच्या दीडपट होते. हे मिश्रण चमच्याने ओतताना त्याची धार न पडता तुकड्या तुकड्यात खाली पडते.
जॅम तयार झाल्यावर चाचणी : आपण या जॅमचा थेंब पाण्यात टाकल्यास त्याची गोळी पाण्यात लगेच विरघळत नाही किंवा जर या जॅमचा थेंब काचेच्या प्लेटवर किंवा सपाट भागावर टाकून प्लेट तिरकस केल्यास तो थेंब न ओघळता उताराच्या दिशेने झुकतो. जॅम तयार झाल्यावर त्याची चाचणी जर रिफ्लेक्टोमीटर या साधनाने केल्यास त्यात विद्राव्य घटकाचे प्रमाण ६८.५ % असणे आवश्यक असते. तयार जॅम निर्जंतुक केलेल्या कोरड्या बाटलीत भरून तो गरम असतानाच बाटल्या ५ मिनिट उलट्या करव्यात त्यामुळे झाकणेही निर्जंतुक होतात. नंतर या काचेच्या बाटल्या थंड होण्यासाठी कोरड्या जागी ठेवाव्यात.
शुभदा पलघडमल, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, सोनई (मोबा.९९७५९९७१७९ )
रोहित पलघडमल, यंग प्रोफेशनल- २ ICAR, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे(मोबा. ७३८७८३१००१)