डाळिंब हे पूर्णतः सदाहरित अथवा पूर्णतः पानझडी गटामध्ये मोडत नाही. डाळिंबाच्या झाडाला निर्सगतः वर्षभर फुले आणि फळे येत असतात. उत्तम दर्जाचे फळे आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य तो बहार धरणे महत्त्वाचे आहे. डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन काळजीपूर्वक करावे. आंबे बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण कमी असते. उत्पादन चांगले मिळते. संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार धरणे फायद्याचे ठरते.
महत्त्वाची माहिती : डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत सेंद्रिय उपाय
डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन करताना डाळिंब बागाईतदारांनी या बाबी विचारात करावा.
1) बाजारपेठेतील मागणी : डाळींबाच्या फळांना कोणत्या काळात आणि कोणत्या बाजारपेठेतून मागणी असते याचा प्रथम विचार करावा, म्हणजे त्यानुसार बहार धरणे सोईचे ठरेल.
2) हवामान : हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा हे तीन हंगाम आपल्याकडे आहेत. हिवाळ्यातील कडक थंडी उन्हाळ्यातील उच्च तापमान आणि पावसाळ्यातील अधिक आर्द्रता यांचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन बहाराची निवड करावी.
3) पाण्याची उपलब्धता : डाळींब हे काटक वर्गातील फळझाड असले तरी बहार काळात पाण्याची गरज असते. जास्त पाणी मात्र या फळास घातक ठरते. पाणी टंचाई आहे काय ? ती कधी आणि किती प्रमाणात आहे, याचा विचार करून बहाराची निवड करावी.
4) ज्या भागात तेलकट डाग रोगाचे प्रमाण जास्त आहे, अशा भागात शक्यतो मृगबहार / पावसाळी घेऊ नये.
5) डाळिंबाचा पहिला बहार दोन वर्षांनंतरच धरावा., वर्षांतून फक्त एकच बहार घ्यावा. आणि बहार घेतल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी.
फायद्याची गोष्ट : डाळिंबावरील कीड व्यवस्थापन
आंबे बहार : डाळिंबामध्ये प्रामुख्याने मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार असे तीन बहार घेतले जातात. आंबे बहारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात. फळांची काढणी जून-ऑगस्टमध्ये येते. या बहारात भरपूर फुले येतात, फळांचा रंग आणि प्रत अतिशय चांगली असते. आंबे बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण कमी अतिशय कमी असते. उत्पादन चांगले मिळते. संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार धरणे फायद्याचे ठरते. जास्त काळ सूर्यप्रकाश मिळाल्याने व कोरडे हवामान यामुळे फळांची प्रत सुधारते.
डाळींबाची फुले ही मागील हंगामातील पक्व काडीवर येतात. या काडीचे पोषण व्यवस्थित होणे गरजेचे असते. या फुटीवरील पाने अन्न तयार करून काडीत साठवितात. फुले येण्याचा जेव्हा हंगाम असतो त्याच काळात झाडावर नवीन पालवी येते. काड्यात, फांद्यात आणि खोडात ज्या प्रमाणात अन्नसाठा असतो त्यानुसार नवीन फुटीचे साधारण तीन प्रकार पडतात. एक पालवीसह फुले येणे, दुसरा नुसती फुले येणे आणि तिसरा नुसती पालवी येणे होय. म्हणजेच अन्नसाठा जर फारच कमी असेल तर येणारी नवीन फुट फक्त्त पालवीच असते. म्हणजेच फुले नसतात. असलीतरी ती फार कमी प्रमाणात असतात. अन्नसाठा मध्यम स्वरूपाचा असेल तर पालवी आणि फुले सारख्या प्रमाणात लागतात. आणि जेव्हा अन्नसाठा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा फुले भरपूर लागतात त्या मानाने पालवी कमी असते.
खोडात अन्न साठविण्याच्या प्रक्रियेस सी : एन रेशो असे म्हणतात. सी म्हणजे कर्बो हायड्रेटस आणि एन म्हणजे नायट्रोजन (नत्र) होय. खोडांमध्ये यांचे प्रमाण खालील गटात मोडते.
1) C : n – भरपूर कर्बोदके व अल्प नत्र
2) c : N – अल्प कर्बोदके व भरपूर नत्र
3) c : n – अल्प कर्बोदके व अल्प नत्र
4) C : N – भरपूर कर्बोदके व भरपूर नत्र
या गटापैकी पहिल्या गटातील स्थिती असल्यास कोणत्याही बहाराची भरपूर फुले निघतात. त्यामानाने पालवी कमी असते. झाडावर फळांची संख्या पुष्कळ असून फळे झुपक्यात लागतात एका झुपाक्यात 3 ते 4 फळे लागण्याचे प्रमाण अधिक असते. दुसर्या गटाची अवस्था असेल तर बहार धरताच लवकर पालवी येते, पालवी जोमदार वाढते, फुले उशिराने लागतात, फुलगळ अधिक होते. फळांची संख्या कमी असते तिसर्या गटाची अवस्था तर फारच हानिकारक ठरते. साठीव अन्न आणि नत्र यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे पालवी खुरटते, फळे कमी व लहान राहतात आणि एकूण झाडाची अवस्था खुरटलेली दिसते. चौथ्या गटातील अवस्था योग्य समजली जाते. या अवस्थेत भरपूर अन्नसाठा आणि त्यास समतोल असे नत्र असल्यामुळे फुले आणि पालवी भरपूर येते. फळधारणा चांगली होत असल्यामुळे फळांची संख्याही भरपूर येते.
ताण आणि पानगळ : डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती, पाणी तोडणे, पानगळ करून छाटणी करणे या बाबी महत्त्वाच्या असतात. विश्रांतीच्या काळात बाग, फळधारणेसाठी तयार केली जाते. नियमीत सिंचन, खत व्यवस्थापन व पीक संरक्षणासाठी योग्य उपाय योजल्यास बाग रोगमुक्त व निरोगी राहते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे डाळिंबाच्या झाडांना किती दिवस ताण द्यायचा ते ठरवावे.बहार धरताना साधारणतः जमीन जर हलकी असेल तर बहार धरण्याअगोदर 30 – 45 दिवस पाणी तोडावे. तसेच मध्यम ते भारी जमिनीत 40 – 50 दिवस पाणी बंद करावे. झाडांना ताण दिल्यानंतर छाटणीच्या तीन आठवडे इथ्रेलची फवारणी करून पानगळ करावी. डाळिंबाची 50 टक्क्यांपर्यंत जुने पाने गळणे व शेंड्याची वाढ पूर्ण थांबणे हे झाडाला नैसर्गिक ताण देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु या अवस्थेच्या पूर्वी जर पानगळ केली तर फुलांऐवजी शेंडे निघतात व सेटिंग लांबते, यासाठी नैसर्गिक पानगळ झाल्यानंतरच इथ्रेलची फवारणी घ्यावी. नैसर्गिक पानगळीनुसार 1 ते 2.5 मिली प्रति लिटर इथ्रेल व 5 ग्रॅम प्रति लिटर 00 : 52 : 3 घेऊन सायंकाळच्या वेळी फवारणी करावी. इथ्रेल ऐवजी इतर कोणतेही ससायनाने पानगळ करू नये. इथ्रेल फवारणी नंतर कमीत कमी 80 टक्के पानगळ होणे आवश्यक असते, त्यानंतरच बागेला पाणी चालू करावे.
छाटणी : डाळिंबात छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात. त्यामुळे पानगळ केल्यानंतर डाळिंबाची हलकीशी छाटणी करावी. छाटणी करताना रोगट, तेलकट डाग रोगाच्या फांद्या काढून टाकाव्यात. भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील आणि फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी. छाटणी करताना झाडाचा वरचा समतोल बिघडणार नाही याची काळजी घेऊनच छाटणी करावी. आंबे बहारात प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता असते. त्यासाठी झाडाच्या आतील भागात रिफिल व पेन्सिल काड्या ठेवून त्यावर फळे धरावीत. छाटणी केल्यानंतर लगेच 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन : माती परीक्षण करून डाळिंब झाडाच्या वयानुसार रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. डाळिंबाचा बहार धरताना प्रति झाड 20 किलो शेणखत, 2 किलो निंबोळी पेंड, 1 किलो गांडूळ खत, 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस, 15 ग्रॅम पीएसबी आणि 15 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर द्यावे.
डाळिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडांना 325-250-250 ग्रॅम नत्र – स्फुरद – पालाश पहिले पाणी देतेवेळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा गाठ सेट झाल्यावर दोन ते तीन हप्त्यांत विभागून द्यावी. तसेच बहार धरतेवेळी 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा द्यावी. फळे लिंबू आकाराची असताना 500 ग्रॅम 18-46 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा. फळे पेरू आकाराची असताना 200 ग्रॅम 19-19-19 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा. झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार 12-61-0, 19-19-19, 13-40-13, 13-0-45, 0-52-34 आणि0-0-50 या विद्राव्य खतांच्या ग्रेडचा वापर करावा.
फवारणी द्वारे ही अन्नद्रव्ये द्यावीत
1) 5 ग्रॅम प्रति लिटर कॅल्शिअम नायट्रेट 2 महिन्यातून एकदा गरजेनुसार फवारावे.
2) फुलकळी लागण्यापूर्वी 2 ग्राम चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट प्रती लिटर याप्रमाणे एक फवारणी घ्यावी.
3) फुलगळ होत असेल तर पाणी व्यवस्थापनावर लक्ष्य द्यावे. तसेच जमिनीमध्ये ओल असताना एनएए व बोरॉनचे 10 ते 12 दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या 2 फवारण्या घ्याव्यात व निम कोटेड निंबोळी पेंड ठिबक खाली टाकावी.
4) 50 टक्के फुलेआल्यानंतर 2 ग्राम चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी व यानंतर ५ ग्राम 12:61:00 प्रति याप्रमाणे दुसरी फवारणी घ्यावी.
5) फळ तोडण्यापूर्वी 10 दिवस अगोदर 5 ग्राम पोटेशिअम सोनाईट प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन : डाळिंब हे उष्ण कटीबंधातील फळपीक असून, फार कमी पाणी लागते. डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्ण बंद करावे. त्यानंतर ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास ठिबक सिंचनने द्यावे. डाळिंबाची बाग फुलोऱ्यात असताना बेताचे पाणी द्यावे. डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, मर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे हे लक्ष्यात येत नसेल तर बागेतील काही झाडांजवळ मका टोकावी. मका सुकलेली दिसल्यासच झाडांना पाणी द्यावे. मका हे पिक पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असल्याने जमिनीतील ओलाव्याचा पिकावर लगेच परिणाम दिसून येतो
फळांची काढणी : फुलोरा व फळे येण्याच्या काळात काटेकोर व्यवस्थापन केल्यास, चांगल्या प्रतीची फळे अधिक प्रमाणात मिळतात.कीड व बुरशीनाशकांचा वापर आवश्यकते प्रमाणे करावा. रसायनांचा अवास्तव वापर केल्यास, खर्च वाढतो तसेच किड व रोग या रसायनांना सरावतात. त्यामुळे आगामी काळात त्यांचे नियंत्रण अजूनच कठीण बनते.सक्रिय मुळ्यांच्या जवळ कायम ओलावा ठेवणे आणि विभागून दिलेल्या लहान खत मात्रा फळ पोसण्यात महत्वाची भूमिका बजावतात. शाश्वत डाळिंब उत्पादन घेण्यासाठी डाळिंब झाडाच्या वयाप्रमाणे फळांचे उत्पादन घ्यावे.पूर्ण वाढ झालेल्या झाडाला 60 ते 80 फळे घ्यावीत. डाळिंबाचे फळ पक्व झाले की टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात. फळांचा गोलाकारपणा किंचित कमी होऊन फळांना चपटा आकार येतो. साधारणतः फुलोऱ्यानंतर 150 ते 210 दिवसांनी आणि फळधारणेनंतर 120 ते 130 दिवसांनी डाळिंब काढणीस येतात. फळांना चांगला भाव भेटण्यासाठी फळांची प्रतीनुसार विभागणी करूनच फळे बाजारात विक्रीसाठी न्यावीत.
गणेश हनुमंत भोसले, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, लोकमंगल कृषि महाविद्यालय, वडाळा.