झेंडूची फुले प्रामुख्याने हार तयार करण्यासाठी व सजावटीकरिता वापरली जातात. इतर फुलांच्या तुलनेत दर कमी असल्याने वेगवेगळ्या समारंभासाठी झेंडूची फुले खरेदी करण्याकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. झेंडूची लागवड केल्यामुळे जमिनीतील सुत्रकृमिंचा उपद्रव फार मोठ्या प्रमाणात कमी होतो. झेंडू फुलांचे उत्पादन हे भाजीपाला व फाळबागेमध्ये आंतरपीक म्हणून घेणे फायदेशीर आहे. बाजारामध्ये आकर्षक आकाराच्या व रंगाच्या संकरित जातींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. प्रामुख्याने पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, अकोला व नागपूर या जिल्हामध्ये झेंडूची लागवड जास्त प्रमाणावर केली जाते.
जमीन : झेंडूचे उत्पादन हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये उत्कृष्टपणे येऊ शकते. तथापि जमीन चांगला निचरा होणारी पाहिजे. जमिनीचा सामू ६ ते ६.५ पर्यंत असावा. हलकी ते मध्यम प्रकारची जमीन झेंडूस पोषक ठरते. भारी व सकस जमिनीत झाडांची वाढ चांगली होते. परंतु उत्पादन कमी मिळते. झेंडू या पिकास भरपूर सूर्यप्रकाशाची आवशकता असते.
हवामान : झेंडू हे पिक प्रामुख्याने थंड हवामानामध्ये उत्तम येते. या हंगामात फुलांचा दर्जा चांगला मिळतो. कडक उन,जास्त थंडी व पाऊस फुलांच्या प्रतीवर, उत्पादनावर अनिस्ट परिणाम करते.
झेंडूच्या जाती : झेंडू फुलांमध्ये अनेक प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. प्रामुख्याने आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, फ्रेंच हायब्रीड झेंडू इ. प्रकार आढळून येतात.
आफ्रिकन झेंडू : या प्रकारातील रोपे उंच वाढतात. फुले टपोरी, पिवळी व नारंगी रंगाची असतात. या प्रकारामध्ये आफ्रिकन यलो, यलो सुप्रीम, हवाई स्पेन गोल्ड, अर्ली ऑरेंज व अलास्का इ. प्रमुख जाती आहेत.
फ्रेंच झेंडू : या प्रकारातील झेंडूची रोपे कमी उंचीची असतात. व झुडूपासारखी वाढतात. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून विविध रंगामध्ये फुले असतात. या प्रकारामध्ये बटनबॉल, सुसाणा, लेमन ड्रोप्स, बटर स्कॉच, सोफिया, यलो बॉय इ. जाती आढळतात.
फ्रेंच हायब्रीड झेंडू : या प्रकारातील रोपे मध्यम उंचीची व भरपूर फुले येणारी असतात. या प्रकारातील जिप्सी, रेड हेड इ. जाती आहेत.
संकरीत व सुधारित जाती : मखमली : हि जात कमी उंचीची असून आकाराने लहान व दुरंगी फुले असतात .हि जात बागेच्या कडेने व कुंडीत लावण्यासाठी चांगली आहे.
गेंदा : या जातीची फुले मध्यम आकाराची असून हारासाठी वापरली जातात. यामध्ये भगवा गेंदा व पिवळा गेंदा असे प्रकार आहेत.
डबल गेंदा : हि फुले प्रामुख्याने ‘कट प्लावर्स’ म्हणून वापरली जातात. फुले मोठ्या आकाराची व भगवा आणि पिवळ्या रंगाची असतात. या जातीचे उत्पादन कमी असते. या शिवाय एम. डी -१, पुसा बसंती, पुसा-नारंगी इ. संकरीत जाती अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत.
अभिवृद्धी : झेंडूचे रोपे बियापासून तयार केली जातात. २ x २ मीटर आकाराच्या गादी वाफ्यामध्ये कुजलेले चांगले शेणखत वापरून २ ते ३ सें. मी. अतंरावर झेंडूचे बी १ सें. मी. अतंरावर झेंडूचे बी १ सें. मी. खोलीवर टाकावे. शेणखत माती मिश्रणाने बी झाकून घ्यावे. वाप्यावर दररोज झारीने हलके पाणी द्यावे. प्रतिहेक्टरी ८०० ते १००० ग्राम बियाणे आवश्यक असते. संकरीत जातीचे बियाणे पासून उत्तम प्रतिची रोपे मिळण्यासाठी बियाणे प्लास्टिक मध्ये कोकोपीट वापरून तयार करावीत. संकरीत जातींचे बियाणे १ ग्राममध्ये अंदाजे ३०० बियाणे असतात.एकरी ९० ग्राम बियाणे लागते.
लागवड : लागवडीपूर्वी जमीन २ ते ३ वेळा नांगरणी करवून द्यावी. प्रति हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून टाकावे. गादीवाफ्यावर तयार केलेली रोपे ६० x ३० सें. मी. अंतरावर सरीच्या मध्यभागी किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावीत.
जमिनीची पूर्व तयारी झाल्यावर ६० सें. मी. रुंद, ३० सें. मी. उंच व सोयीप्रमाणे लांब असे गादी वाफे तयार करावेत.
खत व्यवस्थापन : झेंडूच्या फुलांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी आफ्रिकन व फ्रेंच जातीसाठी तसेच संकरित जातीसाठी ४० आर क्षेत्रासाठी (एक एकर) लागवडीपूर्वी २०० किलो सुफला १५:१५:१५ तसेच लागवडीनंतर ३० दिवसांनी (शेंडा खुड्ल्यानंतर) ५५ किलो युरिया वापरावे याप्रमाणे खत व्यवस्थापन करावे. खतांच्या मात्रा दिल्यानंतर रोपांना हलके पाणी द्यावे.
पाणी : झेंडूच्या रोपांना खरीप हंगामातील लागवडीस १० ते १५ दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यामध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यामध्ये ५-६ दिवसांनी पाणी द्यावे. फुलांचे उत्पादन चालू झाल्यानंतर फुलांची काढणी होईपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. दोन गादी वाफ्यामध्ये ४० सें. मी. अंतर ठेवावे. प्रत्येक गादी वाफ्यावर लागवड केलेल्या दोन रांगेमध्ये ठिबक नळी ठेवावी. ठिबक सिंचानामधून रोपांना पाणी व रोपांच्या वाढीच्या अव्स्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर करावा.
आंतरमशागत : रोपांची लागवड झाल्यानंतर २ आठवड्यानी कुरपणी करावी. रोपांची लागवड केलेला वरंबा फोडून रोपे मध्यभागी द्यावे. तीन आठवड्यानी झेंडूच्या रोपांचा शेंडा खुडावा, जेणेकरून जादा फुटवे मिळून उत्पादन जास्त मिळते.
पिक संरक्षण : झेंडूच्या पिकावर मर व करपा हे रोग तसेच पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळी इ. कीड आढळून येते. या रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी डायथेन एम–४५ मोनोक्रोटोफॉस, रोगर, इंडोसल्फोन या कीटकनाशकाची/बुरशीनाशक यांच्या फवारण्या देतात.
फुलांची काढणी व उत्पादन : झेंडूच्या रोपांची लागवड केल्यानंतर ६० ते ६५ दिवसांनी फुले काढणीस चालू होतात. पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून फुलांची काढणी करावी. फुलांची काढणी करावी. फुलांची काढणी शक्यतो सायंकाळी करावी. काढलेली फुले करंड्यामध्ये घालून बाजारपेठेत पाठवितात. व्यवस्थापन चांगले असल्यास प्रति एकरी झेंडू फुलांचे उत्पादन १० ते १२ मे. टन संकरित जातीच्या फुलांचे उत्पादन मिळते. सरळ जातींच्या फुलांचे उत्पादन एकरी ७ ते ८ मे. टन पर्यंत सहज मिळते.
निलिमा जैराम गोबाडे पी. एच. डी. उद्यान विद्या विभाग, म.कृ.वि.परभणी