चंदन हा एक अतिशय उपयुक्त व धार्मिक महत्त्व असलेला वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव सॅन्टॉलम अल्बम आहे. हा वृक्ष सदापर्णी असून नैसर्गिकरित्या भारतात सर्वत्र आढळतो. चंदन वृक्ष अतिशय सुवासिक व मौल्यवान आहेत. चंदन वृक्ष समुद्रसपाटीपासून 1000 ते 1200 मीटर उंचीपर्यंत आढळतो. हा वृक्ष 42 ते 47 अंश सेल्सिअस अधिकतम तापमान सहन करू शकतो. परंतु हिवाळ्यात पडणारे दव अथवा धुके यास सहन होत नाही. नैसर्गिक जंगलामध्ये आढळणार्या जंगलात सरासरी 1000 ते 1600 मिमी पाऊस पडतो.
कर्नाटक, कुर्ग, कोईमतूर व महाराष्ट्रातील जंगलांत (विंध्य पर्वतापासून दक्षिणेकडे) चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. कर्नाटकात व तामिळनाडूत कमी पावसाच्या भागांत समुद्रसपाटीपासून सु. 1,200 मीटर उंचीपर्यंत विपुल आढळतो आणि लागवडीत आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व ओरिसा येथेही त्याचा प्रवेश झाला असून तो तेथेही त्याचा प्रवेश झाला असून तो तेथील निसर्गाशी समरस झाला आहे. मात्र त्याचे लाकूड कमी प्रतीचे असते. याशिवाय खासगी व सार्वजनिक उद्यानांतून तो लावला जातो.
चंदनाचे झाड चिवड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याच्या निचरा होणार्या, खडा डोंगर उतार, उत्तम गाळाची, काळी माती व नदी नाल्याच्या काठी या वृक्षाची वाढ उत्तम होते. चंदनाचे झाड काही अशी परोपजीवी असल्याने त्याची सुरूवातीची वाढ होण्याकरिता त्यास दुसर्या झाडांच्या मुळाची आवश्यकता असते. नैसर्गिक जंगलात चंदन वृक्षाची वाढ शिरस, धावडा, बाभूळ, गिरापुष्प, तेंदू, बोर, सिसू, कडुनिंब, करंज इत्यादी वृक्षाच्या समूहात होते. चंदन वृक्षाच्या वाढीस सुरूवातीस इतर वृक्षांच्या सावलीची गरज असते. मात्र नंतर हा वृक्ष प्रखर सूर्यप्रकाशात वाढू शकतो.
रोपनिर्मिती तंत्रज्ञान : चंदनवृक्षाला वर्षांतून सप्टेंबर ते ऑक्टोंबर व मार्च ते एप्रिल अशी दोन वेळा फुले येतात. दोन्ही हंगामातील बियाण्याची गुणवत्ता सारखीच असते. या वृक्षास एप्रिल ते मे महिन्यात व ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान नवीन पालवी फुटवे. सदाहरीत वृक्ष असल्याने पानगळीची निश्चित अशी वेळ नाही. ताज्या बियांची उगवण सुरूवातीच्या दोन ते तीन महिन्यापर्यंत होत नाही. यानंतर बिया पेरल्यास 4 ते 14 आठवड्यात उगवण होते. बियाण्याची उगवण 50 ते 60 टक्क्यापर्यंत असते. बियाणे 0.05 ते 0.10 टक्के जिब्रेलिक आम्लामध्ये 24 ते 36 तास भिजवून पेरल्यास सारख्या प्रमाणात उगवण होण्यास व उगवणक्षमता वाढवण्यास मदत होते.
रोपवाटिका : चंदनाची रोपवाटिका तयार करण्यासाठी चांगल्या पाण्याचा निचरा होणार्या जमिनीची निवड करावी. रोपवाटिकेत वाळू, माती व शेणखताचे मिश्रणाने गादी तयार करावे. गादी वाफ्यावर 10 टक्के थिमेट किंवा बाविस्टीन पावडरचे पाणी झारीने द्यावे. बियाण्यांची प्रक्रिया करून वाफ्यावर पेरावे. पेरणीनंतर 30 ते 65 दिवसात उगवणीस सुरूवात होते. रोपे चार पानांची झाल्यावर किंवा दोन ते तीन महिन्यांनी प्लॅस्टिक पिशवीत स्थलांतर करावे व पिशवीत रोपासोबत तुरीचे किंवा हातग्याचे एक ‘बी’ होस्ट प्लॅन्ट म्हणून पेरावे. रोपांचे स्थलांतर झाल्याबरोबर रोपे आठवडाभर सावलीत ठेवावी. 9 ते 12 महिन्यात रोपे लागवडीस तयार होतात.
जमीन व हवामान : या वृक्षाला लहान असताना सावली चालते, परंतु पुढे तो उघड्यावर चांगला वाढतो. तसेच कोवळेपणी तो तोडल्यावर राहिलेल्या खुंटापासून नवीन प्ररोहांची (धुमार्यांची) वाढ होते. परंतु जून झाडांची तशी वाढ होत नाही. बराच काळ पाण्याने दुर्भिक्ष्य असल्यास तो जगत नाही, तसेच कोवळेपणी प्रखर सूर्यतापाने त्याची साल वाळून सोलून जाते. लाकूडही वाढते आणि झाड नाश पावते, अशा वेळी जवळच्या झाडांची सावली त्याचे संरक्षण करते. वनातील अग्रीच्या (वणव्याच्या) भक्ष्यस्थानी ही झाडे सहज पडतात. तथापि पुढे बुंध्यापासून नवीन धुमारे फुटतात. साधारणत: 600 ते एक हजार 50 मीटर उंचीपर्यंत ही झाडे चांगली वाढतात. 60-160 सें.मी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात त्यांची विपुलता दिसते. उत्तम मध्यकाष्ठ (खोड किंवा फांद्या यांच्या आतील भागातील घन व बहुधा दर्ग रंगाचे लाकूड) 600-900 मीटर उच्चता व 885-135 सें.मी. पाऊस असलेल्या प्रदेशातील झाडात असते. थोडक्यात थंड हवा, मध्यम पर्जन्यमान, भरपूर सूर्यप्रकाश व बराच काळ कोरडी हवा त्यांच्या लागवडीस उत्तम असते. भोवताली घाणेरी, बांबू असलेल्या खुरट्या जंगलात किंवा शेतांच्या कडेने चंदनाची झाडे विशेषकरून वाढल्याचे आढळते. चंदनाला काळ्या व खोल जमिनीपेक्षा खडकाळ, लाल, लोहयुक्त, उथळ रेताड, निचर्याची व निकस जमीन जास्त चांगली मानवते, ओलसर व सकस जमिनीत वाढ अधिक चांगली झाली, तरी लाकडाचा दर्जा तेलाच्या दृष्टीने कमी प्रतीचा ठरतो.
लागवड व्यवस्थापन : चंदन वृक्षाचे रोपवन तयार करायच्या ठिकाणी झाडेझुडपे कापून जागा स्वच्छ करावी. नंतर तीन बाय तीन मिटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदून ते खड्डे माती व शेणखताच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. या खड्ड्यात चंदनाचे रोप लावण्याअगोदर प्रत्येक खड्ड्यात चार ते पाच तुरीचे बियाणे टाकून होस्ट प्लॅन्ट लावून घ्यावे व 15 दिवसानंतर प्लॅस्टिक पिशवीतील चंदनाची रोपे लावावी. चंदनाच्या लागवडीनंतर दर सहा महिन्यांनी चंदनाच्या झाडाभोवतालची माती खोदून भुसभुशीत करावी व त्यातील तण व काडी वेचून साफ करावे. होस्ट प्लॅन्ट चंदनपेक्षा जास्त वाढत असल्याने त्याची छाटणी करावी व रोपांचे चराई पासून संरक्षण करावे. पाण्याची व्यवस्था असल्यास पहिल्या चार ते पाच वर्षांपर्यंत उन्हाळ्यात मार्चपासून 15 दिवसापासून एकदा पाणी द्यावे.
चंदन वृक्षाची वनक्षेत्रात मूळ स्थळी लागवड यशस्वी आढळून आली आहे. अशी लागवड झुडूपामध्ये बिया पेरून करतात. याकरिता बांबूपासून तयार केलेले रोपणी औजार उपयोगात आणतात. हे औजार तयार करण्यासाठी योग्य लांबीचा बाबू घेऊन त्याची नळी तयार करतात. नळीच्या एका टोकाला काप देऊन ती टोकदार करण्यात येते. ज्या झुडूपात बिया पेरायच्या आहेत त्या झुडूपाच्या बुडाशी बांबूचा टोकदार भाग मातीत खुपसून नळी वाटे चार ते पाच बिया झुडूपात सोडतात. अशा लागवडीसाठी बीजप्रक्रिया केलेले बियाणे वापरावे व हे बियाणे रोपणीच्या अगोदर 0.2 टक्के अॅगेलॉल किंवा कार्बन्डेझिम द्रावणात एक ते दोन तास बुडवून पेरल्यास रोपांचे किडींपासून संरक्षण होते. बिया झुडूपात मूळ स्थळी रोपणी केल्याने अशा ठिकाणी होस्ट प्लॅन्टची गरज भासत नाही.
जंगलातील वातावरणात जरी चंदनाची मंद गतीने वाढ होत असली तरी चांगल्या जमिनीत योग्य ओलावा व मशागत पद्धत अवलंबल्यास झाडाची जलद वाढ होऊ शकते. चंदनामध्ये साधारणत: दहा वर्षे वयानंतर गाभ्यातील लाकूड तयार होण्यास सुरूवात होते. चंदन वृक्षाचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे ठरविण्यात आले आहे. साधारणत: 50 वर्षे वयाचे झाड 60 ते 70 फूट उंच व खोडाचा घेर 40 ते 50 सें.मी. आकाराचा होतो. या आकाराच्या एका झाडापासून 25 ते 30 किलो गाभ्यातील लाकूड तसेच 80 ते 120 किलो गाभ्याबाहेरील लाकूड मिळते.
चंदनाच्या गाभ्याचे लाकूड तयार होण्यास 20 ते 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्या अगोदर झाडे तोडल्यास लाकडात सुवासिकता येत नाही. चंदनाचे खोड अतिशय सुवासिक असून, त्यापासून तेल काढले जाते. तेलाचा उपयोग अत्तर, साबण, सौर्द्यप्रसाधने, औषधी इत्यादी तयार करण्यासाठी होतो. खोडापासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करता येतात. फिक्कट रंगाच्या गाभ्यातील लाकडात तीन ते सहा टक्के तेलाचे प्रमाण असते. चंदनाच्या एकाच जातीत गाभ्यातील लाकूड तयार होण्याची प्रक्रिया त्याचप्रमाणे लाकडात मिळणार्या सुवासिक तेलाचे प्रमाण जमीन व हवामानावर अवलंबून असते. जमिनीच्या पोतावर व हवामानावर हे बदल चंदनाच्या अनुवंशिकतेचे या सोबत होणार्या गुणधर्मामुळे असल्याचे सिद्ध झाले आहे. चंदनाच्या सालीपासून अर्सेनिल पामीटेट नावाचे रसायन काढण्यात येते. या रसायनात किटकनाशक गुणधर्म आढळून आलेले आहेत. बियामध्ये 40 ते 50 टक्के सॅन्टलबीक ग्लेसेराईड असलेले तेल आढळून आले आहे. हे तेल साबण तयार करण्यास उपयुक्त असल्याचे आढळून आलेले आहे.
रोग व कीड व्यवस्थापन : चंदनाच्या रोपांना रोपवाटिकेत फ्यूजारियम नावाच्या बुरशीमुळे रोग होतो. त्यामुळे रोपे उन्मळून मरून जातात व मुळे कुजतात. त्यासाठी पेरणीपूर्वी थायरम बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे. रोपवाटिकेत नाकतोडा, पाने खाणारी अळी आणि पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास डायमेथोएट दोन मिली प्रतिलिटर पाण्यातून किंवा फेनव्हलरेट 10 टक्के प्रवाही हे किटकनाशक अर्धा मिली प्रति लिटर पाण्यातून रोपांवर फवारावे.
चंदनाच्या झाडाच्या खोडास इजा झाल्यास हार्टरॉट नावाचा रोग होतो. त्यासाठी झाडाला इजा करू नये. त्याचबरोबर लागवड केलेल्या क्षेत्रात पाने खाणारी अळी, पाने गुंळाळणारी अळी, शेंडे पोखरणारी अळी आणि साल खाणारी अळी इत्यादी किडींचा उपद्रव होतो. त्यासाठी वरीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास करावी.
प्रा. अजय राणे वनशास्त्र विद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी