मान्सूनची प्राणांतून प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अजून काही दिवस धिर धरावा लागणार आहे. कारण गुजराथच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचा धिंगाणा सुरू आहे. याचा परिणाम म्हणून मान्सूनची प्रगती थांबली आहे. गेल्या तीन दिवसापासून मान्सून एकाच ठिकाणी जैसे थे आहे.
ब्रेकिंग : यंदा खरीप पेरण्या लांबणार ?
दरम्यान, मान्सूनने सोमवारी कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती. पण कालपासून मान्सूनने प्रगती केली नाही. मान्सूनने तीन दिवसांपासून एकाच ठिकाणावर ठाण मांडून आहे. आजही मान्सून सिमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती.
यंदा मॉन्सून 8 जून रोजी केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः 7 जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला. आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. येत्या 18 ते 21 जूनच्या दरम्यान मान्सून दक्षिण द्विपकल्पाचा आणखी काही भागात व पूर्व भारताच्या लगतच्या भागात प्रगती करू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मोठी घोषणा : बोगस बियाणे विकणाऱ्यांला 10 वर्षांची शिक्षा ; नवा कायदा करणार : कृषीमंत्री
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. उद्या सायंकाळी गुजरातमधील जखाऊ बंदरावर हे चक्रीवादळ धडकणार आहे. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे गुजरात आणि शेजारच्या भागांमध्ये वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. मात्र मान्सूनची वाटचाल अडखळी आहे.
सध्या ईशान्य अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ किनारपट्टीकडे सरकत आहेत. चक्रीवादळ 3 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराच्या उत्तर नैऋत्यला 280 किलोमीटर आहे. तर देवभुमी द्वारकेच्या उत्तर नैऋत्यला 290 किलोमीटर आणि नालियाच्या उत्तर नैऋत्यला 300 किलोमीटर आणि पोरबंदपासून 350 किलोमीटर तसेच पाकिस्तानमधील कराचीपासून दक्षिण नैऋत्यला 340 किलोमीटर अंतरावर आहे.
लक्षवेधी पीक : अशी आहे अननस शेतीची व्यवस्थापन पद्धत
बिपरजॉय चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची जवळच्या जखाऊ बंदराजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ अतितीव्र झाले असून 125 ते 135 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे गुजरातच्या आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला. या जिल्ह्यातील 37 हजार 800 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कच्छ आणि सौराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडत आहे. मागील 24 तासांमध्ये खंबालिया येथे 120 मिलिमटर पावसाची नोंद झाली. उद्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.