आंब्याच्या किफायतशीर लागवडीसाठी जमीन आणि तळजमीन या दोन्हीही प्राकृतिक बाबीचे महत्त्व, रासायनिक गुणधर्म पेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास सर्वसाधारण सर्वच जिल्ह्यात आंबा चांगला येऊ शकतो. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आंबा उत्पादन जास्त आणि कमी खर्चात शक्य आहे.
मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची लागवड होत आहे. त्यात त्याची सुरूवात 1990 च्या दशकात सुरू झाली असून आता साधारणत: आठ ते 10 हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंबा आहे. मराठवाड्याचा केशर हा इतर राज्यातील केशरपेक्षा चांगल्या प्रतीचा असतो तसेच फळमाशी व इतर कीड रोगास कमी बळी पडतो. मराठवाड्यामध्ये परदेशी आंबा लागवडीच्या धरतीवर काही शेतकर्यांनी अतिघन लागवड व इतर आधुनिक बाबीचा वापर करून केशर आंबा लागवड सुरू केली आहे.
हवामान : या फळास उष्णहवामान चांगले मानवते. विशेषत: ऑक्टोबरपर्यंत चांगला पावसाळा व नंतर मध्यम कोरडे हवामान या पिकास योग्य समजले जाते परंतु दमट हवामानात समुद्र किनार्याजवळ सुद्धा याची चांगली वाढ होते. भारतात अगदी काश्मिर सोडून जवळपास सर्वत्र आंबा चांगला येतो. थंडीचा कडाका व अति ऊन सुरूवातीच्या काळात कलमांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हवामानपरत्त्वे या झाडास दक्षिण भारतात लवकर (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) मोहोर येतो. महाराष्ट्रातील तर जसे जसे उत्तरेकडे जाऊ, तसतसा मोहर उशिरा येतो व दिल्लीकडे तर फेब्रुवारी ते मार्च मध्ये मोहोर येतो. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास सर्वसाधारण सर्वच जिल्ह्यात आंबा चांगला येऊ शकतो.
जमीन : आंब्याच्या किफायतशीर लागवडीसाठी जमीन आणि तळजमीन या दोन्हीही प्राकृतिक बाबीचे महत्त्व, रासायनिक गुणधर्म पेक्षाही जास्त आहे.
लागवड : आंबा लागवडीसाठी योेग्य जमिनीची निवड केल्यानंतर जमिनीच्या पोताप्रमाणे आठ बाय नऊ किंवा 10 बाय 10 मीटर अंतरावर एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे एप्रिल ते मे मध्ये खोदावेत. खड्ड्याच्या तळाची 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेला पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम लिंडेन पावडर टाकावी. राहिलेल्या खड्ड्यात दोन ते तीन टोपले चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम लिंडेन पावडर यांच्या मिश्रणाने खड्ड्यावर थोडी शीग येईल इतका तो भरून घ्यावा. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळावा मात्र हलकी असेल तर 60 टक्क्यापर्यंत गाळ मिसळावा.

घनलागवड पद्धत : आंबा लागवडीसाठी 10 बाय 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही पाच बाय पाच मीटर किंवा पाच बाय सहा मीटर अंतरावर करणे जास्त फायद्याचे आहे; असे दिसून आले आहे. या अंतरावर झाडातील अंतर 10 ते 12 वर्षापर्यंत मिळून येत नाही. म्हणजे तो पर्यंत आपणांस या बागेतून चारपट उत्पन्न मिळते. कारण 10 बाय 10 मीटर अंतरावर आंबा लागवड केल्यास हेक्टरी 100 झाडे बसतात. पाच बाय पाच मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडांची संख्या ठेवणे शक्य होते. या पद्धतीमध्ये झाडांचा घेर व उंची मर्यादित ठेवता येते. त्यासाठी छाटणी आणि वाढ निरोधकांचा वापर करता येतो. इजिप्त आणि दक्षिण अफ्रिकेत तर तीन बाय एक मीटर इतक्या कमी अंतरावर लागवड यशस्वी झाली आहे. तेथे हेक्टरी 3333 झाडांची संख्या असते.
घनलागवडीचे फायदे : ठराविक क्षेत्रातून अधिक उत्पादन. झाडे लहान असल्यामुळे फळांची विरळणी, फवारणी, छाटणी इत्यादी गोष्टी करणे सोपे होते. आंबा फळांची काढणी खूडी व झेला न वापरता हाताने करणे शक्य होते. फळांची गुणवत्ता व प्रत सुधारण्याचे वेगवेगळे उपाय करणे सहज शक्य होते.
लागवडीची आधुनिक इनसिटू पद्धत : इनसिटू पद्धत म्हणजे जागेवर कोयी लावून त्यानंतर योग्य वेळी कलमीकरण करणे होय. या पद्धतीचा अवलंब केल्यास बराच फायदा दिसून आलेला आहे. जागेवरच कोय लागवडीमुळे रोपाचे सोटमूळ कोणत्याही अडथळ्याविना जमिनीत सरळ खोल जाते. कलमांचे मूळे मात्र पिशवीत केलेली असल्यामुळे त्यांची पिशवीत गोल वाटोळी चूंबळ बनते. त्यामुळे खड्ड्यात लागवड केल्यानंतर ती जमिनीत खोलवर जाऊ शकत नाही परिणामी ती पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. हलक्या, मूरमाड जमिनीत हा प्रश्न आणखीनच गंभीर होतो. इनसिटू पद्धतीने लागवड केली असल्यास झाडांची वाढ जोमदारपणे होते. अशा झाडांना रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी प्रमाणात जाणवतो. एका रोपास बाजूच्या दोन ते तीन रोपाचा जोड दिलेला असल्याने कलमात तीन ते चार रोपांची एकदाच ताकद मिळून कलम अति शिघ्रतेने वाढते.
यासाठी आंबा कोयी ताज्या असणे महत्त्वाचे आहे, कारण 15 दिवसानंतर त्याची उगवणक्षमता कमी होते खूळखूळा झालेल्या कोयी तर अजिबात उगवत नाहीत. आपल्याकडे पावसाळा साधारणत: 20 ते 25 जूनपर्यंत नक्कीच सुरू होतो. तेव्हा एक जून दरम्यान, गावठी आंब्याच्या पाच ते सात दिवसाच्या ताज्या कोई जमा कराव्यात. या कोयी एकाच झाडावरील आंब्याच्या असल्यास अतिउत्तम अशा जमा केलेल्या कोई परत चांगल्या धुवून घ्याव्यात कारण त्यावर थोडासुद्धा गोडवा राहता कामा नये. नंतर त्या कोयी प्रतिलिटर पाण्यात दोन ग्रॅम बाविस्टीन हे बुरशीनाशकात मिसळून त्यात पाच मिनीटे बुडवून घ्याव्यात आणि पातळ थर करून सावलीत सुकवून ठेवाव्यात पाच जूनला आणि मिरचीच्या रोपास जसे वाफे करतो तसे एक बाय तीन मीटरचे वाफे करावेत त्यात तळाशी अर्धा कुजलेला पालापाचोळा आणि मातीचे मिश्रण पसरावे आणि त्यावर राहिलेले अर्धे मिश्रण कोयी दोन सें.मी. झाकल्या जातील इतके टाकावे, अशी लागवड केल्यास कोयीस वाफ्यात नेहमी वापसा राहील असे झारीने पाणी देत राहावे. हे करत असताना शेतात आधिच तयार केलेली खड्डे लागवडीसाठी तयार ठेवावे 20 ते 22 जूनपर्यंत एक किंवा दोन चांगले पाऊस होऊन खड्डे चांगले ओले होवून खड्ड्यातील माती दबलेली असेल अशा वेळे तेथे खड्डा पडल्यास आजूबाजूची माती टाकून जमिनीच्या पातळीत आणावा 20 ते 21 जूनला म्हणजेच 15 ते 16 दिवसांत वाफ्यात लावलेल्या कोयी लागवडीस योग्य झाल्या असे समजून या कोयीची ओल असलेल्या भरून तयार झालेल्या प्रत्येक खड्ड्यात पाच या प्रमाणे लागवड करावी. लागवड करताना लागवडीच्या ठिकाणी ओंजळभर शेणखत मातीत मिसळून त्यावर चौकोनात चार ठिकाणी तीन- तीन इंचावर चार कोयी लावून त्यांच्या मध्यभागी एक कोय लावावी ओल कमी असल्यास त्यावर दोन तांबे पाणी टाकावे. अशा प्रकारे लागवड केलेल्या कोयी चार ते पाच दिवसांत तरारून उगवतात काही ठिकाणी तीन ते चार तर काही ठिकाणी पाच अशी त्यांची संपूर्ण शेतात उगवण झालेली दिसते नंतर या रोपाची चांगली निगा राखल्यास ही रोपे ऑक्टोबरपर्यंत तिसर्या पेर्यावर (कांड्यावर) येतात त्यावेळी चांगल्या माळ्याकडून त्यावर कलमीकरण करून घ्यावे मात्र 20 ते 21 जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर खड्ड्यास पाणी देण्याची व्यवस्था असावी. ऑक्टोबरपर्यंत काही कारणाने रोपे कलमीकरण्यायोग्य नसली तरी ही रोपे फेब्रुवारीपर्यंत मात्र हमखास कलमीकरणास योग्य होतात. त्यावर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कलमीकरण करता येते. त्यातही 99 टक्क्यांपर्यंत यश मिळते. कलम करताना शक्यतोवर मधील रोपावर किंवा कोणत्याही एका योग्य रोपावर कलमीकरण केल्यानंतर त्याच हंगामात किंवा पुढील हंगामात बाजूची रोपे या कलमास जोडता येतात अशा कलमास बाजूच्या तीन ते चार रोपाच्या मुळाची ताकद मिळते त्यामुळे कलमांची वाढ झपाट्याने होवून चौथ्या वर्षीय अशा झाडास प्रत्येकी 20 ते 25 पर्यंत फळे घेता येतात. कोयी लागवडीचे वेळापत्रक आपल्या भागातील पावसाचा अंदाज पाहून चार ते पाच दिवस मागे पुढे करता येतात. या अभिनव पद्धतीचा प्रत्यक्षात फार मोठ्या प्रमाणावर अवलंब करून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव परिसरात गट पद्धतीने एक हजार एकरवर आंबा लागवड सुरू आहे. या शेतकर्यांनी गेल्या दोन वर्षापासून 500 एकरावर लागवड केली आहे. ती पूर्णता याच पद्धतीने केली त्यात 99 टक्के यश मिळाले आहे. कलमास बाजूची तीन ते चार जोडलेली रोपे आणि त्यामुळे कलमांची होणारी जोमदार वाढ आता सध्या पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे मौजे लोहगड, जि. अकोला येथील माजी मंत्री सखारामजी पवार यांच्या शेतात 20 एकर मध्ये ही पद्धती 100 टक्के यशस्वी झालेली आहे. सुरूवातीपासून ठिबक सिंचनाची सोय असल्यास सरळ खड्ड्यात कोयी लावूनसुद्धा लागवड करता येते.
कलम लावून लागवड : जागेवर कोयी लावून जशी लागवड येते तशीच 10 ते 12 महिने वयाच्या हव्या त्या जातीची पण खात्रीची कलमे लावूनसुद्धा आंबा लागवड करता येते अशा वेळी कलमे लावताना कलमाभोवती तीन कोया लावाव्यात आणि पुढे योग्य वेळी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा फेब्रुवारीत त्या कलमास जोड द्यावा, असे केल्यास कलमास अनेक मुळांची ताकद मिळते.
कलमांची निगा : प्रत्येक खड्ड्यावर पाऊसमान पाहून सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या पंधरवड्यात पाऊस संपताच कुठल्याही काडीकचर्याचे किंवा उसाच्या पाचटाचे वीतभर उंचीचे रोपाभोवती आच्छादन करावे व त्यावर थोडी माती टाकावी. आच्छादन करताना त्यात थोडी लिंडेन पावडर टाकणे गरजेचे आहे. कलमे केल्यानंतर किंवा तयार कलमे लावल्यानंतर गावठी रोपावर येणारी फुट वेळोवेळी काढून टाकणे महत्त्वाचे असते. पावसाचा अंदाज पाहून पावसाळ्यात व जरूरीप्रमाणे वर्षभर कलमास पाणी द्यावे. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने चहाचा एक चमचाभर युरीया दिल्यास वाढ चांगली होते कलमांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करावे कलमांना आधार द्यावा. कलमांच्या दोन्ही बाजूस दोन काड्या लावून त्यावर दोन आडव्या सैलशा बांधून घ्याव्यात. उन्हाळ्यात कलमांना सावली करावी, कलमी फांद्यावरील मोहर वेळोवेळी काढावा. आळ्यातील तण वेळोवेळी काढीत जावे. दुसर्या वर्षी पाऊस पडताच शिफारशीप्रमाणे शेणखत रासायनिक खत देऊन तीन ते चार वर्षापर्यंत झाडांची चांगली वाढ होऊ द्यावी. जमिनीपासून सुमारे तीन फुट उंचीपर्यंतच्या कलमांवरील बाजूच्या फांद्या काढून टाकाव्यात वेळोवेळी नवीन फुटीवर येणार्या रोग व किडीपासून संरक्षण करावे.
आंब्याच्या मोहोरावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आंब्याच्या मोहोरावर प्रामुख्याने तुडतुडे किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोहोराचे अतोनात नुकसान होत असते. म्हणूनच या तुडतुडे किडीचा आणि भुरी रोगाचा बंदोबस्त करून मोहोराचे संरक्षण करणे महत्त्वाचे असते.

मोहोरावरील तुडतुडे : तुडतुडे ही सर्वात महत्त्वाची कीड असून, या किडीचा उपद्रव महाराष्ट्रात सर्वच भागात जास्त प्रमाणावर होत असतो. तुडतुडे आकाराने लहान असून, तपकिरी काळसर रंगाचे असतात. पाचरीच्या आकाराचे हे किडे त्यांच्या तिरकस चालीवरून सहज ओळखू येतात. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असेल तर झाडाजवळ गेल्यावर या किडीचा उडताना तडतड आवाज सहजपणे ऐकू येतो. या किडीची बाल्यावस्था तसेच पूर्ण वाढ झालेले तुडतुडे मोहोरातील रस शोषून घेतात. परिणामी किडग्रस्त फुलांपासून फलधारणा होत नाही. प्रादुर्भावग्रस्त मोहोर सुकून जातो. लहान फळे गळून पडतात. याखेरीज हे कीटक मधासारखा चिकट द्रव पदार्थ शरीरातून बाहेर टाकतात. हा पदार्थ मोहोरावर पानांवर तसेच झाडाखालील जागेवर पडताना दिसतो. चिकट पदार्थांमुळे काळसर बुरशीची वाढ होते. किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड काळे पडल्यासारखे दिसते. तसेच या काळसर बुरशीच्या आच्छादनामुळे पानाच्या अन्न निर्मितीच्या कामात अडथळा निर्माण होतो. या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला तर जवळपास 70 ते 80 टक्क्यापर्यंत आंबा उत्पादनात घड येते.
मोहोरावरील भुरी : आंब्याच्या मोहोरावर येणारा ‘भुरी’ हा एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग असून, आंब्याला जेव्हा मोहोर येतो त्याचवेळी तो येतो. या रोगामुळे मोहोराचा देठ, फुले आणि लहान फळे गळून पडतात आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. आंब्याला मोहोर येण्याच्या वेळी थंड हवामान असल्यास या रोगाची वाढ मोठ्या प्रमाणावर होते.
आंब्याच्या मोहोरावस्थेत तुडतुडे आणि भुरी हे कीड किंवा रोग मोठ्या प्रमाणावर नियमितपणे येणारे असल्याने तथापि ते येऊन नुकसान होण्यापेक्षा सदर कीड व रोग येवू नये याकरीता वेळीच काळजी घेवून त्यांच्या नियंत्रणाकरीता उपाययोजना करून मोहोराचे संरक्षण जर केले तर निश्चितच आंब्याच्या उत्पादनात भर पडण्यास मदतच होते. साधारणपणे आंब्याला डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात मोहोर येण्यास सुरूवात होऊन मोहोर फुटण्याची क्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत चालू राहते. वास्तविक मोहोर फुटण्यापूर्वीच म्हणजेच सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापासूनच किटकनाशक फवारणीची सुरूवात करणे गरजेचे असते.
पहिली फवारणी : सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात संपूर्ण झाडावर करावी. त्यासाठी सायपरमेथ्रिन 25 टक्के 10 लिटर पाण्यात तीन मिली, किंवा फेनवेलरेट 20 टक्के 10 लिटर पाण्यात पाच मिली, किंवा डिकॅमेथ्रिन 2.8 टक्के दहा लिटर पाण्यात नऊ मिली. कोवळ्या फुटीवर तुडतुडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यावेळी खोडावर, फांद्यावर व पानांवर फवारणी करावी.
दुसरी फवारणी : मोहोर निघण्यापूर्वी खोडावर, फांद्यावर आणि शेंड्यावर करावी. यासाठी एन्डोसल्फॉन 35 टक्के दहा लिटर पाण्यात 15 मिली किंवा कार्बारिल 50 टक्के दहा लिटर पाण्यात 20 ग्रॅम. जर फवारणी मोहोर फुटताच केली तर त्यामध्ये 20 ग्रॅम पाण्यात मिसणारे गंधक किंवा 10 ग्रॅम कार्बोन्डॅझिम मिसळावे. यामुळे भुरी रोगाचे नियंत्रण होईल.
तिसरी फवारणी : दुसर्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्याने मोहोर फुटताना ही फवारणी करावी. यासाठी फेन्थोएट 50 टक्के दहा लिटर पाण्यात 10 मिली, फोझॅलोन 35 टक्के दहा लिटर पाण्यात 15 मिली किां क्विनालफॉस 25 टक्के दहा लिटर पाण्यात 20 मिली. या किटकनाशकाच्या द्रावणात 20 ग्रॅम पाण्यात मिसणारे गंधक किंवा दहा ग्रॅम कार्बोन्डॅझीम मिसळावे.
चौथी फवारणी : तिसर्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्याने ही फवारणी करावी. यासाठी मेथिल डिमेटॉन 25 टक्के दहा लिटर पाण्यात 12 मिली, मोनोक्रोटोफॉस 36 टक्के दहा लिटर पाण्यात 11 मिली किंवा डायमेथोएट 30 टक्के 10 लिटर पाण्यात 10 मिली. या द्रावणामध्ये 20 ग्रॅम पाण्यात मिसणारे गंधक किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डॅझीम मिसळावे.
पाचवी फवारणी : चौथ्या फवारणी नंतर सुमारे दोन आठवड्यानंतर जरूर पडल्यास ही फवारणी करावी. यासाठी वरील पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. मात्र त्याद्रावणात 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डॅझीम मिसळावे.
वरीलप्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकाची अदलून-बदलून 15 ते 20 दिवसाच्या अंतराने फवारणीची अंमलबजावणी केल्यास आंब्याच्या मोहोराचे संरक्षण करता येऊ शकते.
डॉ. बी. एम. कापसे प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, हिमायत बाग, औरंगाबाद. (मोबा. 9422293419)