महाराष्ट्रात उसाखालोखाल केळीचे क्षेत्र वाढत आहे. थोडासा चांगला बाजारभाव व तीन वर्ष पिकाची मिळणारी उत्पादकता यामुळे केळी पिकाकडे पाहण्याचा शेतकर्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे; असे असले तरी बर्याचदा उसाच्या क्षेत्रात केळीचे उत्पादन घेताना जुन्या पद्धतीने केळीची लागवड केली तर उत्पादनामध्ये घट आल्याचे दिसून येते. नव्या तंत्राचा वापर केल्यास नक्कीच केळीचे उत्पादन वाढते.
जमिनीची निवड : जमिनीची सुपीकता हा घटक लक्षात घेतला तर चांगल्या निचर्याच्या काळ्या व भारी जमिनीतसुद्धा एकरी 35 ते 45 टनांपर्यंत केळीचे उत्पादन वाढवता येते. मात्र यासाठी केळीची लागवड करताना पहिले पीक निघाल्यानंतर माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षण अहवालानुसार सामू 7.5 ते आठ पर्यंत असावा. क्षारता एक डेसीसायमन प्रति मीटर पेक्षा कमी असावी. शिवाय 10 ते 15 टक्क्यापेक्षा कमी चुनखडीच्या जमिनीमध्ये केळीचे पीक घेता येते. केळी पिकास माती परीक्षण अहवालानुसार खतांचा वापर केल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
पाणी व्यवस्थापन : माती प्रमाणेच पाण्याची बाजूही महत्त्वाची आहे. केळी पिकाला फार क्षारयुक्त पाण्यामुळे या पिकाची वाढ खुंटते. पानाच्या कडा करपतात. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवड करण्यापूर्वी पाण्याचा नमुना तपासून घ्यावा. त्यानंतरच केळी लागवडीसाठी हे पाणी योग्य आहे की नाही हे लक्षात येईल. त्यानंतर केळी लागवडीचा निर्णय घेतला पाहिजे.
जमिनीची मशागत : लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी एकरी 35 ते 40 किलो ताग किंवा धैंचा जमिनीत पेरावा. दीड महिन्यात त्याची पूरेशी वाढ होते. त्यावेळी तो ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावा. त्यानंतर पंधरा दिवस जमीन तशीच ठेवून कल्टीवेटरच्या सहाय्याने सात फुट अंतरावर सर्या काढून घ्याव्यात.
केळी लागवडीची पूर्व तयारी : पाच फुट अंतरावर अर्धा फुट खड्डा घेवून प्रत्येक खड्ड्यात खालील मिश्रणाचा दीड किलो खत टाकावा. तत्पूर्वी एक टन कुजलेली मळी किंवा कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड पाचशे किलो, कोंबडी खत पाचशे किलो या सर्वांचे मिश्रणावर पाणी शिंडपडून आठ ते दहा दिवस झाकून ठेवावे. या मिश्रखतामध्ये पाच किलो अॅझिटोबॅक्टर व पाच किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू, पाच किलो पालाश उपलब्ध करणारे जीवाणू मिसळून प्रत्येकी खड्ड्यात टाकावेत. पाच फुट अंतरावर अर्धा फुट खड्डा घेवून दीड किलो खत प्रत्येक खड्ड्यात टाकावे. माती व खत चांगले मिसळून खड्डा केळी रोप लागवडीसाठी तयार ठेवावा. त्यानंतर ठिबक सिंचन संच जोडून उपनळ्या अंथरूण दोन ते तीन दिवस पाणी सुरू ठेवावे. साधारण दररोज तीन ते चार तास पाणी सोडावे. सर्वसाधारणपणे प्रत्येक खड्ड्यामागे पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश व 25 ग्रॅम अमोनियम सल्फेट ही रासायनिक खते एकत्र करून त्यामध्ये पाच ग्रॅम अमोनियम सल्फेट, पाच ग्रॅम झिंक सल्फेट, पाच ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट, दोन ग्रॅम बोरॅक्स हे मिश्रण एकत्र मिसळून टाकावे. रोपे लागवड करण्यापूर्वी रोपे स्थानिक वातावरणात पाच ते सहा दिवस ठेवून रोपांवर 1.5 ग्रॅम बाविस्टीन प्रति लिटर पाणी तसेच सुक्ष्म अन्नघटकयुक्त खतांची फवारणी करावी. त्यामध्ये ज्यामध्ये लोह 2.5 टक्के, मंगल एक टक्के, जस्त तीन टक्के, तांबे एक टक्के, मॅलिब्गनम 0.1 टक्के, बोरॉन 0.5 टक्के प्रमाण असावे. पाच मिली लिटर पाणी याप्रमाणे फवारणी द्यावी.
केळी रोपांची लावगड : केळी रोपांची लावगड करताना रोपांची बॅग ब्लेडच्या साहाय्याने कापून मुळाचा गठ्ठा न करता खड्ड्यामध्ये लावावा. हाताने माती दाबून हलके सांडपाणी द्यावे. यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर रोपे वातावरणाशी मिळतीजुळती झाल्यानंतर रासायनिक खते वेळापत्रकानुसार द्यावीत. रोपे लावून झाल्यानंतर 15 दिवसांनी प्रत्येकी 25 ग्रॅम अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅशचा डोस द्यावा. 25 व्या दिवशी प्रत्येकी पाच ग्रॅम 12:61:00 युरीया, 45 व्या दिवशी प्रत्येकी 25 ग्रॅम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅशचा डोस द्यावा. 85 व 100 दिवसांनी प्रत्येकी 50 ग्रॅम अमोनियम सल्फेट व डीएपी तर 25 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशचा डोस द्यावा. 135 दिवसानंतर प्रत्येकी रोपांना सहा ग्रॅम 00:00:50 या खतांचा दहा दिवसांच्या अंतराने काढणीपर्यंत डोस द्यावा.
हेही वाचा :
शिकूण घ्या ! आवळा लागवडीचे उत्पादन तंत्रज्ञान
पेरूच्या झाडाला भरगच्च फळे लागण्यासाठी असे करा खत व सुक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापन
अशी करा एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवडीची पूर्व तयारी !
काय आहे ? पपई उत्पादनाचा बोडके पॅटर्न !
लागवड केल्यानंतर दोन महिन्यांमध्ये केळीच्या रोपाच्या एका बाजूला दीड फुट व दुसर्या बाजूलाही दीड फुट या अंतराने पंधरा सेंटिमीटर उंचीचा गादीवाफा एकसारख्या प्रमाणात ओला राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे बागेत सुक्ष्म वातावरणाची निर्मिती होवून सातव्या महिन्यापासून घडनिर्मिती होण्यास सुरूवात होते. घड निर्मिती पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा फण्यानंतर शेवटच्या फणीतील एक केळ मोठे व इतर केळी लहान झाल्यानंतर त्यापुढील केळफुल तोडून टाकावे. याचवेळी केळीची फुगवण होण्यासाठी घडांवर 100 लिटर पाण्यात 500 ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट व एक किलो युरीया मिसळून घडांवर फवारणी करावी. त्यानंतर स्कर्टीग बॅगचा वापर घडांवर करावा.
स्कर्टीग बॅगचा वापर : स्कर्टीग बॅगचा वापर केल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तीव्र सूर्यप्रकाशाचा केळीच्या घडावर होणारा परिणाम टाळला जातो. एकसारख्या हिरवट चोपाडी रंग सर्व कळ्यांना प्राप्त होतो. धूळ, कारखान्यांची काजळी घडावर पडत नाही. रस शोषणार्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. या बॅग दोन ते तीन वेळा वापरता येवू शकतात.
विवेक मोहनराव भोईटे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती (मोबा : 9922415175)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा