पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय म्हणजेच कामगंध सापळे यास इंग्रजीत ‘फेरोमोन ट्रॅप’ किंवा ‘फनेल ट्रॅप’
असेही म्हणतात. हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे. हा नरसाळयाच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असून, त्यास एक प्लॅस्टिकची पिशवी लावण्यात येते. वरची बाजू एका झाकणाने झाकली असते. त्यास आतील बाजूस ‘आमिष’ लावण्याची सोय असते. त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते. नर कीटक हा मादीच्या मिलनासाठी त्या वासाने या सापळ्याकडे आकर्षित होऊन ‘फनेल’मध्ये येतो आणि घसरून खाली पिशवित पडतो व काही दिवसांनी मरतो. त्यांचे मिलन होत नाही. अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. याद्वारे किडींच्या उत्पादनाचे नियंत्रण होते.
पिकावरील कीड नियंत्रणासाठी ट्रॅपचा वापर केल्याने किडींचे प्रभावी नियंत्रण तर होतेच शिवाय विषारी किटकनाशकाला हा एक जबरदस्त पर्याय ठरत असल्याने विषमुक्त अन्न पिकवून आपण सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करू शकतो. हाच खरा आहे ट्रॅप वापरण्याचा दुहेरी फायदा.

कामगंध सापळे वापरताना अशी घ्या काळजी : कीटकनिहाय सापळ्याची निवड करावी. सापळ्यात अडकलेले पतंग २-३ दिवसांनी काढून नष्ट करावेत. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकासाठी हेक्टरी ५ सापळे वापरावेत, परंतु किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे वापरावेत. सापळ्यामधील लिंग प्रलोभने १५ ते २० दिवसांनी बदलावीत. सापळा हा साधारणपणे पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून २ ते ३ फुटांवर राहील याची काळजी घ्यावी. सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा, ज्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील.
कामगंध सापळ्यांच्या वापराचे फायदे : किडीचे प्रौढ व मादी यांची शेतातील स्थिती ठरविण्यासाठी कामगंध सापळ्याचा मुख्यत: उपयोग होतो. फेरोमोन सापळ्यांच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्या वेळी कीड व्यवस्थापन पध्दत ठरविता येते. तसेच आवश्यक त्या कीटकनाशकांची निवड करून फवारणी करता येते. एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशकांच्या किंमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो. सापळ्यातील रसायनामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे परोपजीवी कीटक व मित्र कीटक सुरक्षित ठेवण्यास मदत होते. कीड व्यवस्थापनाची ही पद्धती वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे. सापळ्यांचा खर्च किटकनाशकंच्या खर्चापेक्षा कमी आहे. सापळ्यांच्या वापरामुळे मानव, पशु, पक्षी, प्राणी यांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो.

कीडनिहाय कोणती कामगंध प्रलोभने वापरावीत ?
हेलील्युर : हे फिरोमोन / ल्युर कापूस, कडधान्य, सुर्यफुल, सोयाबीन व वांगी या पिकावरील हेलीकॉवर्पा आर्मिजेरा (अमेरिकन बोंडअळी / घाटेअळी) या किडीसाठी वापरावे.
पेक्टीनोल्युर किंवा गोस्सिपल्युर (Gossyplure) : हे फिरोमोन / ल्युर कापूस या पिकावरील पेक्टीनोफोरा गोसिपायल्ला (शेंदरी बोंडअळी) या किडीसाठी वापरावे.
इरविटल्युर किंवा इरविनल्युर : हे फिरोमोन / ल्युर कापूस, भेंडी या पिकावरील इरीयास व्हायटेला इरीयास इन्सुलाना (ठिपक्याची बोंडअळी) या किडीसाठी वापरावे.
स्पोडोल्युर : हे फिरोमोन / ल्युर तंबाखू, कापूस, सोयाबिन व मिरची या पिकावरील स्पोडोप्टेरा लीटयूरा (पाने खाणारी अळी) या किडीसाठी वापरावे.
सिर्फाफ्यागाल्युर : हे फिरोमोन / ल्युर भात या पिकावरील सिफोफ्यागाल्युर इन्सरटूलस (धानावरील खोडकिडा) या किडीसाठी वापरावे.
पेक्टीनोफोराल्युर : हे फिरोमोन / ल्युर कोबी व फुलकोबी या पिकावरील प्लुटेल्ला झायलोस्टेला या किडीसाठी वापरावे.
मिथिल युजेनॉल : हे फिरोमोन / ल्युर फळपिकावरील ड्याकस डोर्यालीस (फळ माशी) या किडीसाठी वापरावे.
क्युल्युर : हे फिरोमोन / ल्युर भाजीपाला पिकावरील फळ माशी या किडीसाठी वापरावे.
असे तयार करा गंधसापळे : सर्वप्रथम विविध आकारांचे प्लॅस्टिकचे डबे अथवा कीडनाशकाचे रिकामे डबे घेऊन त्यास मधोमध आरपार छिद्र पाडावे. डब्याच्या झाकणाला तार जाईल एवढेच ते छिद्र असावे. झाकणाच्या छिद्रातून तार घालून त्यात कापसाचा बोळा लावावा. डब्यात २०० मि. लि. पाणी टाकून त्यात एक मि. लि. डायक्लोरव्हॉस कीटकनाशक टाकावे. कापसाचा बोळा व डायक्लोरव्हॉस मिश्रित पाण्यात अंतर असावे. कापसाच्या बोळ्याला मक्षीकारी किंवा मिथिल युजेनॉल हे गंध प्रलोभन लावावे . याकडे नर पतंग आकर्षित होतात व खालील कीडनाशकमिश्रित पाण्यात पडून मरतात.
एकरी आठ ते दहा सापळे लावावेत. प्रत्येक आठवड्यानंतर प्रलोभन व कीडनाशकमिश्रित पाणी बदलावे. यामध्ये कीडनाशक व प्रलोभनासाठीच खर्च येतो. एरवी हा सापळा खरेदी करण्यासाठी ३०० ते ३५० रुपये लागतात. डबे विकत आणून जरी घरी सापळे तयार केले तरी ३५ ते ४० सापळे तेवढ्याच खर्चात तयार करता येऊ शकतील. त्यांचा वापर एकरी दहा सापळे याप्रमाणे चार एकर क्षेत्रासाठी करता येईल.
प्रकाश सापळे : पावसाळ्यात प्रामुख्याने अनुकूल वातावरणात किडींचा उपद्रव व प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पीक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. प्रकाश सापळ्यांच्या मदतीने नर व मादी यांच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यास मदत होते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. प्रकाश सापळे वापरण्यात सोपे असतात. सोबतच लाभदायक कीटकासाठी हानिकारक नाहीत. सोबतच काही प्रकाश सापळे सौर उर्जेवर सुद्धा चाललात .
प्रकाश सापळ्याचे महत्व : प्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते. हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्यांचा वापर केल्यास पीक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते. प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे. प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल असतात. सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ असतात. प्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो.
प्रकाश सापळे पिकांमध्ये कसे लावावेत ? : प्रकाश सापळे पिकाच्या मध्यभागी (प्रति हेक्टरी १ प्रकाश सापळा) लावावेत. पिकांपासून हे सापळे १.५ फुट उंच लावावे. चांगल्या परिणामासाठी संध्याकाळी ७ ते ११ या दरम्यानच्या काळात चालू ठेवावे.
पिके त्यावरील किडींचे प्रकाश सापळ्यामुळे व्यवस्थापन
१) धान : खोडकिडा, पाने गुंडाळणारी, तुडतुडा, हुमणी.
२) कडधान्य : शेंग पोखरणारी अळी, नाकतोडा, कटवर्म.
३) मका : खोडकिडा.
४) सोयाबिन : उंटअळी व लष्करी अळी
५) भाजीपाला : फळ व शेंगा पोखरणारी अळी, डायमंड बॅक मॉथ, सेमीलुपर.
६) ऊस : पायरिला, हुमणी, तुडतुडा, खोड पोखरणारी अळी.
७) भुईमुग : केसाळ अळी, फुलकिडे.
८) आंबा : पतंग, मोल क्रिकेट.
पक्षी थांबे : हानिकारक किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यामध्ये पक्षांची महत्वाची भुमिका आहे. ९० % पक्षी मांसाहारी आहेत. सुमारे ३३ % नियंत्रण पक्षांमार्फत होऊ शकते. शेतामध्ये मध्यापेक्षा बांधावर आणि झाडाच्या जवळ किडींचे प्रमाण कमी असते. पक्षांपासून होणारा फायदा पाहता काही प्रसंगी पक्षांपासून होणारे नुकसान गौण ठरते.
१) कपाशी लागवड करताना बियासोबत मका व सुर्यफुलांचे दाने मिसळून लावावेत.
२) हरभरा किंवा कपाशी पिकांत सकाळी पक्षांना दिसेल अशा उंचीवर भात ठेवावा त्यामुळे पक्षी आकर्षित होतात.
३) टीव्ही अँटेनाप्रमाणे शेतात काही ठिकाणी लाकडी पक्षी थांबे उभा केल्यास पक्षांना बसण्यास जागा उपलब्ध होते.
४) पक्षांकरीता पाण्याची व घरटयांची सोय करावी, जेणेकरुन पक्षी कायमचे शेतात थांबतात.
चिकट सापळे : कोणत्याही पिकामध्ये रससोशक किडी जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे, ढालकिडे, नागबळी, पांढरी माशी इत्यादी पिकांच्या वाढीच्या अवस्थेत हल्ला करतात. त्यामुळे पिकांच्या वाढीचा वेग मंदावतो व यांनी केलेल्या घावातून बुरशीजन्य रोगांची लागन होते, तसेच या किडींमुळे विषाणुजन्य रोगांचाही प्रसार होतो. त्यामुळे त्यावर पिवळे चिकट सापळे प्रभावी ठरतात.
१) शक्यतो करुगेटेड शीट पासून बनवलेले सापळे वापरावेत.
२) विशीष्ट पिवळया किंवा निळया रंगामुळे किडयांना नवीन पालवी असल्याचा भास होतो व ते सापळयाकडे आकर्षित होतात, एकदा सापळयावर कीड बसली की ते चिकट द्रवामुळे चिकटते व मरते.
३) चिकट सापळयांची उंची पिकाच्या थोडी वर ठेवावी.
४) किडींचा प्रकार व संख्येचे निरीक्षण करण्यासाठी एकरी ६ सापळे लावावेत.
५) सापळयांच्या माध्यमातून किड नियंत्रण करायचे असल्यास एकरी १२ ते १८ सापळे वापरावेत. तर कीड नियंत्रणाबाहेर जात असेल तर सापळयांची संख्या वाढवत जावी.
६) जेव्हा सापळयांचा पृष्ठभाग किडींनी भरुन जाईल तेव्हा नवीन सापळ्यांचा वापर करावा.
आशुतोष सुरेंद्र चिंचोळकर, शेतकरी मित्र, यवतमाळ (मोबा. ९१४६९६६२२२)
शेतीमित्र मासिक आता.. प्रत्येकाच्या मोबाईलवर ! #शेतीविषयक आधुनिक माहिती मिळविण्यासाठी #shetimitramagazine चे फेसबुक पेज लाईक करा !