गाय आणि म्हशीमध्ये कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाद्वारे कली जाणारी गर्भधारणा आता शेळ्यांमध्येही करणे शक्य झाले असून, बिर हिसार (हारियाना) येथील केंद्रिय शेळी प्रजनन केंद्रावर काही दिवसांपासून शेळ्या-मेंढ्यामध्ये कृत्रिम रेतनाद्वारे केलेल्या गर्भधारणेचे प्रयोग सुरू असून ते आता यशस्वी झाला आहेत. या प्रयोगातून सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
अशा प्रकारच्या कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या प्रजातीच्या एका बोकडापासून कमीत कमी शंभर शेळ्यांची गर्भधारणा केली जाऊ शकते. त्याद्वारे चांगल्या जातीच्या शेळ्या किंवा बोकडांची पैदास करणे शक्य होवू शकते. आत्तापर्यंत या केंद्रावर कृत्रिम रेतन तंत्राचा वापर करून पैदास केलेल्या बोकड व शेळ्यांची प्रकृती अतिशय उत्तम असल्याचे दिसून आले आहे. याद्वारे पैदास झालेल्या बोकडांचे वजन चांगले असून शेळ्यांचे दूध देण्याचे प्रमाणही चांगले आहे. चांगल्या दूध देणार्या शेळ्या आणि चांगले वजनदार बोकड पैदास करण्यासाठी या कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग होणार आहे. विशेषत: चांगल्या प्रजातीच्या शेळ्या-बोकडांची पैदास यामुळे शक्य होणार असून, वजनदार बोकड्यांची पैदास केल्यामुळे मास उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना फायद्याचा ठरणार्या या शेळीपालन व्यावसायाला चांगलीच आर्थिक उभारी मिळणार आहे.
केंद्रिय शेळी प्रजनन फार्मचे निर्देशक डॉ. ए. के. मलोत्रा यांनी यासंदर्भात सांगितले की, एका वर्षापूर्वी केंद्रिय शेळी प्रजनना केंद्राच्या फार्मवर 50 शेळ्यांवर कृत्रिम रेतन तंत्राचा वापर करण्यात आला. त्यातून असे दिसून आले की, या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जन्मलेल्या शेळ्या व बोकडे आरोग्यदृष्ट्या बळकट असल्याचे दिसून आले. सामान्य शेळी दिवसाला 800 ग्रॅम दूध देते तर कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाने पैसाद झालेली शेळी दिवसाला दीड लिटर दूध देते. सामान्य शेळीच्या जन्मलेल्या पिलाचे वजन दीड किलोपर्यंत असते तर यातंत्रज्ञानाद्वारे पैदास झालेल्या शेळीच्या पिलाचे वजन तीन किलोपर्यंत भरते.
‘शेळी पालन’ हा ग्रामीण बेरोजगारांसाठी आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकर्यांना आर्थिक उन्नतीकडे नेणारा व्यवसाय असून, यामध्ये कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळविणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात शेळीपालन व्यवसायाला चांगले दिवस येतील अशी आशा आहे. शेळीचे दूध पचनास हलके व पौष्टिक असते. इतर दूधाच्या तुलनेत शेळीच्या दुधात चार टक्के जास्त प्रथिने असतात. देशातील 26 प्रकारच्या देशी प्रजातीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या आणि शेळ्या आणि बोकडाची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा :
शेळ्यांच्या उत्पादन वाढीसाठी… !
शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचे फायदे
कृत्रिम रेतन हे तंत्र वापरून सुधारित जातीच्या बोकडाच्या वीर्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर करता येतो. विशेषत: ज्या पशुपालकांना आपल्या जनावरांमध्ये संकरीकरणाद्वारे सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारित जातीचे नर पाळण्याची कुवत नसते, त्यांच्यासाठी कृत्रिम रेतन तंत्र हे एक वरदान आहे. एखादा बोकड नैसर्गिक संकरासाठी वापरल्यास त्याच्यापासून वर्षांला ४० ते ५० करडांची पैदास होत असेल, तर त्याच नरापासून वर्षांला तीन हजार वीर्यमात्रा उपलब्ध होतात. त्या वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतनाद्वारे फलिताचे प्रमाण जरी ३०-३५ टक्के मिळाले तरी त्यापासून अंदाजे एक हजार सुधारित संकरित करडांची पैदास होऊ शकते.
जेव्हा शेळ्यांचा माजाचा हंगाम नसतो त्या वेळेस नैसर्गिक संकरासाठी नर अनुत्सुक असतो आणि त्याच्या वीर्याची प्रतदेखील खालावलेली असते व त्यामुळे फलिताचे प्रमाणदेखील खालावते. अशा वेळेस गोठविलेले वीर्य व कृत्रिम रेतन उपयुक्त ठरते.
नैसर्गिक संकरासाठी एकाच नराचा अनेक माद्यांशी संपर्क येतो. यामधून नराकडून मादीला व मादीकडून नराला प्रजनन संस्थेच्या सांसर्गिक रोगांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कृत्रिम रेतनाद्वारे हे टाळता येते.
एकाच बोकडाचा सारखा संकर झाल्यामुळे खेडेगावामधील शेळ्यांचा दर्जा खालावत जात आहे व निपजणारी करडे उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने फारच निकृष्ट असल्याचेही जाणवते. याचे आणखी एक कारण म्हणजे कोणी पाळलेला बोकड असलाच तर तो निकृष्ट दर्जाचा असतो. कारण एखादा चांगला व जोमाने वाढणारा बोकड असला तर तो लवकर कत्तलीसाठी योग्य होतो व आर्थिक कारणास्तव अशा बोकडांची कत्तल होते. त्यामुळे पैदाशीसाठी उपलब्ध असलेला बोकड चांगल्या दर्जाचा नसतो. म्हणूनच कृत्रिम रेतनाद्वारे इनब्रीडिंग टाळण्यासाठी वीर्य उपलब्ध करणाऱ्या केंद्रांनी पुरेशा संख्येमध्ये एकमेकांशी नातेसंबंध नसलेले नर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या गावपातळीवर वळूंचे गोठविलेले वीर्य वापरून मोठय़ा प्रमाणावर गाईमध्ये कृत्रिम रेतन केले जात आहे. वळू व बोकडाच्या गोठविलेल्या वीर्यमात्रांची तुलना करता बोकडाच्या वीर्यमात्रांची किंमत वळूच्या वीर्यमात्रेपेक्षा थोडी जास्त पडते. याचे कारण म्हणजे वळूच्या एका वीर्य संकलनातून प्रति मात्रा १५ ते २० दशलक्ष शुक्रजंतू असलेल्या १०० ते १५० वीर्यमात्रा तयार होतात; परंतु शेळ्यांमधील कृत्रिम रेतनाकरिता एका वीर्यमात्रेमध्ये शुक्रजंतूंचे प्रमाण कमीत-कमी १८० दशलक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे बोकडाच्या एका वीर्य संकलनातून २५ ते ३० एवढय़ाच वीर्यमात्रा तयार होतात. तसेच बोकडाचे वीर्य गोठविणे थोडे क्लिष्ट आहे. शेळ्यांमधील जनुकीय सुधारणा आणि शेळ्यांची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शेळ्यांमधील कृत्रिम रेतन कार्य विस्तारित करण्याचा हेतू आहे. भारतामध्ये ओरिसा, तमिळनाडू, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांनी त्यांच्याकडील पशुवैद्यांना शेळ्यांमधील कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण दिलेले आहे. कृत्रिम रेतनाद्वारे शेळी सुधारण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होऊ शकेल. त्याचप्रमाणे दारिद्रय़रेषेखालील भूमिहीन गरीब स्त्रियांना व शेतमजुरांना लाभ मिळू शकणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा