शेतकऱ्यांना मुदतीमध्ये पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविण्यासाठी स्वतंत्र अॅप ( App) विकसित करण्यात आला असून, यामुळे आता शेतकर्यांना घरबसल्या आणि मुदतीमध्ये पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविता येणार आहे. हा अॅप ( App) विकसित करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
खरीप हंगामातील पिकांसाठी गेल्या वर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले तरी विमा कंपन्यांना त्यांच्या नियमानुसार दिलेल्या मुदतीत नुकसानीची माहिती दिली नाही तर विम्याच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागते. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाच्या नुकसानीची माहिती ही नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपन्यांना देणे बंधनकारक आहे. परंतु या नियोजित कालावधीत अनेक शेतकरी हे त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती देऊ शकत नव्हते. विमा कंपन्या नेमका याचाच फायदा घेऊन पात्र शेतकऱ्यांचेही विम्याचे प्रस्ताव नाकारत असत.

केवळ ७२ तासांच्या आत विमा कंपन्यांना पीक नुकसानीची माहिती देता न आल्याने पात्र असूनही विम्याच्या लाभापासून वंचित रहावे लागत असलेल्या शेतकऱ्यांना हा अॅप App दिलसादायक ठरणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी खास विकसित केलेल्या या अॅपला ‘क्रॉप इन्शुरन्स अॅप’ (Crop Insurance App) असे नाव दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पीक नुकसानीची माहिती घरबसल्या नोंदविता येणार आहे.
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती ही या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या विमा कंपन्यांना निश्चित मुदतीत देता येणार आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांना अगोदरच झालेल्या पीक नुकसानीचा फटका बसत असे आणि त्या नुकसानीची भरपाईही त्यांना केवळ तांत्रिक कारणाने मिळत नसे. यावर मार्ग काढण्यासाठी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा विमा मिळण्यासाठी केंद्र सरकारने हे खास अॅप विकसित केला असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा