कृषी क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून, राज्यातील महसूल विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून आता शेतीचा सुधारित स्वरूपातील सातबारा येत्या गांधी जयंतीला खातेदारांना घरपोच देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्याच्या महसूल विभागाने घेतला आहे.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. महसूल विभागाने संगणीकृत सातबारा, ई-पीक पाहणी, ऑनलाईन फेरफर, जमिनीच्या मोजनीकामी जलदता असे अनेक आधुनिक उपक्रम नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून शेतकर्यांना समजेल असा सहज व सोपा सुधारित सातबारा नवीन स्वरूपात तयार करण्यात आला आहे. या संगणीकृत सातबार्याची पहिली प्रत खातेदाराला घरपोच व मोफत दिली जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागातील कोतवाल, तलाठी यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या उपक्रमाची घोषणा करताना थोरात म्हणाले, खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. शेतकर्यांना आवश्यक सेवा सहज आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असून, याचाच भाग म्हणून आम्ही खाते उतारा सहज आणि सोप्या स्वरुपात सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. थेट खातेदार शेतकर्यांच्या हातात नवीन स्वरुपातील सातबारा देवून आम्ही सातबारा उतारा लोकाभिमूख करणार आहोत. पुढील काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे महसूल यंत्रणेला स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी अवर्जुन सांगितले.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा