उन्हाळी कांद्याला अत्याल्प दर मिळत आहे. दरातील घसरण सुरुच असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव रोखण्यात आले.
फायद्याची माहिती : हरभरा पेरणीच्या ह्या आहेत पद्धती
संघटनेचे पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी कांद्याला प्रतिकिलो 30 रूपये दर मिळावा, अशी मागणी केली. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकार, तसेच नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, रवींद्र पगार, प्रवीण गायकवाड, गोकुळ भोरकडे, बाळासाहेब बनकर, ज्ञानेश्वर चांदवडे आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पोलीस यावेळी लक्ष ठेवून होते. अखेर प्रातिनिधिक आंदोलन झाल्यानंतर लिलाव पुन्हा पूर्ववत सुरू झाले.
मोठी बातमी : कापसाचा भाव घसरणार ?
यावेळी दिघोळे म्हणाले, राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला 20 रुपयांच्या वर येत असताना, यावर्षी शेतकऱ्यांच्या कांद्याला संपूर्ण वर्षभर कवडीमोल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा विक्रीतून दिवसागणिक कोट्यवधींचे नुकसान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 साली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट न होता आता खर्च दुप्पट झाला आहे. उत्पन्न निम्मे झाल्याने सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये मोठा फरक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी कांद्याला प्रतिकिलो 30 रूपये दर मिळावा, शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा., मागील काही महिन्यांपासून कमी दरात विकलेल्या कांद्याला राज्य सरकारने 10 रुपये प्रति किलो याप्रमाणे नुकसान भरपाई अनुदान द्यावे. आदी मागण्या करण्यात आल्या.

लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव रोखून केलेले आंदोलन हे प्रातिनिधिक आहे. येत्या दोन चार दिवसात कांद्याचे दर न सुधारल्यास संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून मंत्रालयासमोर कांदा ओतून आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.
खूशखबर : निम्या किमतीत ट्रॅक्टर : शासनाची योजना

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1