कांद्याला चांगली मागणी असली तरी सर्व हंगामासाठी वेगवेगळ्या बाजारपेठेसाठी व प्रक्रिया करण्यासाठी सर्वगुणसंपन्न अशी कांद्याची एकच जात उपयुक्त ठरू शकत नाही. हंगामानुसार व बाजारपेठेची वेगवेगळी मागणी यानुसार उपयुक्त कांदा जात निवडावी लागते.
एन. 53 : नाशिक येथील स्थानिक वाणातून ही जात विकसित केली आहे. खरीप हंगामासाठी ही जात उपयुक्त असून या जातीचे कांदे गोलाकार व चपटे असतात. रंग जांभळट लाल असतो. चव तिखट असते. कांद्याची काढणी लागवडी पासून 100 ते 110 दिवसात होते व हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन येते.
बसवंत 780 : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात विकसीत केली आहे. कांदे गोलाकार असून, शेंड्याकडे निमुळते होतात. रंग आकर्षक लाल असून, तो काढणी नंतर तीन ते चार टन उत्पादन येते. लागवड ऑगस्ट महिन्यात केल्यास उत्पादन वाढते. हा वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य आहे.
अॅग्रिफाऊड डार्क रेड : नाशिक येथील राष्ट्रीय बागवानी संस्थेने ही जात स्थानिक वाणातून विकसित केली आहे. कांदे आकाराने गोल व गर्द लाल रंगाचे असतात. 90 ते 100 दिवसात कांदे काढणीला येतात व हेक्टरी 20 ते 27 टन उत्पादन येते. हा वाण खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे.
एन. 2-4-1 : पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने ही जात निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीची शिफारस रब्बी हंगामासाठी केली आहे. कांदे गोलाकार मध्यम ते मोठे असतात. रंग विटकरी असून चव तिखट आहे. या जातीचे कांदे पाच ते सहा महिने चांगले टिकतात. लागवडीनंतर कांदे 120 दिवसांने काढणीला येतात व हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन येते. ही जात जांभळा करपा या रोगाला व फुलकिड्यांना सहनशील आहे.
फुले सफेद : ही जात रांगडा तसेच रब्बी हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. कांदे चमकदार रंगाचे मध्यम गोल असतात. साठवणुकीत दोन ते तीन महिने टिकतो. हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन येते.
फुले सुवर्णा : हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1997 साली विकसीत केली असून, तिन्ही हंगामात घेण्यास शिफारस केली आहे. कांदे पिवळ्या किंचीत विटकरी रंगाचे, गोलाकार, घट्ट, मध्यम तिखट निर्यातीस व साठवणीस योग्य, 110 दिवसात 23 ते 24 टन उत्पादन देते.
‘पंचगंगा’चे विविध वाण : पंचगंगा सिडस् ही औरंगाबाद येथील शास्त्रशुद्ध व दर्जेदार कांदा बियाणे उत्पादन करणारी भारतातील बहुदा पहिलीच कंपनी आहे. पंचगंगा सुपर, निफाड सिलेक्शन, बसवंत 780, फुले समर्थ, पंचगंगा पूना फुरसुंगी, एन-2-4-1 व एक्सपोर्ट स्पेशल या कंपनीने उत्पादीत केलेल्या कांद्याच्या जाती आहेत. याशिवाय कंपनीने संकरित वांगी गौरव, संकरित वांगी हिरामण, संकरित कारली कांचन, संकरित भेंडी कल्याणी, सुधारित भेंडी : अर्का अनामिका, हिमांगी (काकडी), मिरचीमध्ये फुले ज्योती, पी. सी. 1, पुसा ज्वाला, संकरीत मिरची बिजली तर बाजरीमध्ये पंचगंगा 510 व पंचगंगा 5510 या जाती उत्पादीत केल्या आहेत.
कांद्यातील रोग आणि किडी
मर किंवा रोपे कोलमडणे : रोप वाढत असताना या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन रोपे पिवळी पडतात, जमिनीलगतचा रोपांचा भाग मऊ पडून रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. याच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास दोन ग्रॅम थायरम किंवा बाविस्टीन किंवा ट्रायकोडर्मा व्हिरडी चार ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बिजप्रक्रिया करावी. तसेच डायथेन एम 45 किंवा कॅप्टान दोन ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
करपा रोग : या बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या कांद्याच्या पातीवर खोलगट पांढुरके चट्टे घडतात. चट्यांचा मध्यभाग जांभळट रंगाचा असतो. चट्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून वाकू लागतात व कांदा पोसत नाही. याच्या नियंत्रणासाठी मेटॉसिस्ट्रॅाक्स 15 मिली अधिक डायथेन एम 45, 30 ग्रॅम अधिक सॅन्डोव्हीट 6 मिली किंवा सिम्बूस 8 मिली बाविस्टीन 10 ग्रॅम अधिक सॅन्डोव्हीट 6 मिली 10 लीटर पाण्यात मिसळून 10 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून चार फवारण्या कराव्यात.
फुलकडे : पिवळसर तपकिरी रंगाचे फुलाकिडे आकाराने अत्यंत लहान असतात याची पिले आणि प्रौढ किटक रात्रीचे वेळी पाने खरडून रस शोषून घेतात त्यामुळे पानावर पांढुरके ठिपके दिसतात. याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 15 मिली किंवा एण्डोसल्फान 15 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 मिली 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कंद किंवा खोड कुरतडणारी अळी : या किडीच्या अळ्या राखाडी रंगाच्या असतात त्या कांद्याच्या जमिनीलगतचा भाग कुरतडतात. झाड पिवळे दिसू लागते. याच्या नियंत्रणासाठी थिमेट 10 जी किंवा कार्बेाफ्युरॅान 10 क्विंटल प्रती हेक्टरी जमिनीत मिसळून घालावे.
डॉ. लालासाहेब तांबडे केंद्र समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर. (मोबा. 9422648395)