घराच्या अथवा बंगल्याच्या सभोवताल्या परसबागेची उपयुक्तता लक्षात घेऊन सध्याच्या काळामध्ये परसबागेला ‘सकस आहार बाग’ (न्युट्रीशनल गार्डन) करण्याची गरज निर्माण झाली आहे. परसबाग ही फक्त शहरवासीयांसाठीच उपयुक्त आहे, असे नाही. तर शहरवासीयांइतकाच फायदा ग्रामीण भागातील जनतेला मिळतो.
परसबागेतील भाजीपाला उत्पादनातून कुटुंबातील व्यक्तींना ताजा, सकस आणि विषमुक्त असा भाजीपाला वर्षभर मिळतो. घराच्या सभोवतालच्या जागेचा वापर योग्य रितीने होतो. परसबागेतील, ताज्या भाज्या यामुळे कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भाजी, फळे यावर होणाऱ्या खर्चाची बचत होते. घराच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. स्वकष्टाने वाढविलेले फळे, भाजीपाला खाताना मानसिक समाधान मिळते.
परसबागेसाठी अशी असावा जागा : परसबाग करताना जागेची निवड करणे महत्त्वाचे ठरते. परसबागेसाठी जागेचा आकार जसा असेल तसा स्वीकारावा परंतु शक्यतो ही जागा आकाराने चौकोनी असावी. या जागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा उपलब्ध असावी. अतिपाणउथळ किंवा पाण्याचा निचरा न होणारी जागा निवडू नये. जमीन सम पातळीत करून घ्यावी. जेणेकरून घरातील सांडपाणी सर्व ठिकाणी पसरविता येईल. बागेतील झाडांच्या संरक्षणासाठी परसबागेच्या सभोवताली मजबूत कुंपण करून घ्यावे.
हंगामानुसार करा भाज्यांची लागवड : सतत वर्षभर भाजीपाला पुरवठ्याच्या दृष्टीने परसबागेची आखणी करावी. साधारणत: पावसाळी म्हणजेच जून जूलै मध्ये भेंडी, गवार, भोपळा, दोडका, कारली, घेवडा इत्यादी भाज्यांची लागवड करावी. हिवाळ्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कोबी, नवलकोल, मुळा, पालेभाज्या, टोमॅटो इत्यादी भाज्या लावण्यात तर उन्हाळ्यात म्हणजेच डिसेंबर जानेवारी महिन्यात काकडी, मिरची, कलिंगड या भाज्यांची लागवड करावी.
परसबागेत एकाच प्रकारची भाजी कधीही लावू नये. कायम तीन चार प्रकारच्या भाज्या लावव्यात म्हणजे एक भाजी जरी रोगाने वाया गेली तरी दुसर्या भाजीपासून आपली गरज भागते. तसेच वेगवेगळ्या भाजीपासून शरीरास आवश्यक असणारे निरनिराळी जीवनसत्त्वे व खनिजे पुरवली जाऊ शकतात.
कुंपणाभोवती तसेच परसबागेत अधून मधून फळझाडे लावावीत मोठी व खोलमुळे जाणारी झाडे घराच्या अगदी जवळ लावू नयेत. तसेच काही कायम स्वरूपाची भाजी देणाऱ्या वनस्पती उदा. शेवगा, हादगा, अळु इत्यादी भाज्या परसबागेत लावू शकता. घरच्या स्वयंपाकाची रुची वाढविण्यासाठी व नित्याची गरज भागविण्यासाठी कढीपत्त्याचे एखादे झाड लावावे.
परसबागेतील व्यवस्थापन : परसबागेतील उत्पादन चांगले येण्यासाठी झाडांची काळजी घेणे ही तितकेच आवश्यक आहे. तणांच्या नियंत्रणासाठी निंदणी व खुरपणी करावी. सेंद्रिय खतांचा आणि रासायनिक खतांचा वापर करावा. परसबागेचे यश हे भरपूर पाणी पुरवण्यावर अवलंबून असते. त्याकरिता नियोजित पाणीपुरवण्याची व्यवस्था करावी.
भाज्या लावणीपासून 40 ते 60 दिवसात काढणीस तयार होतात. फळे आणि भाज्या काढणीस योग्य झाल्यास कुटुंबाच्या गरजेनुसार काढून रोज ताज्या, सकस भाज्या आणि फळे मिळू शकतात. ज्या भाज्या वापरता येऊ शकतात त्यांचा सॅलड म्हणून वापर करावा, म्हणजे शिजवल्यानंतर वाया जाणारी पोषणमूल्ये उपयोगी होतील. पर्यायाने मिळणारी फळे, भाजीपाला यापासून कौटुंबिक वातावरण आनंदी आणि आरोग्यदायी राहील यात शंकाच नाही.
अंजली आ. गुंजाळ विषय विशेतज्ज्ञ मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर
https://www.facebook.com/shetimitramagazine03/
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करुन रेटींग करा
👇