पपईच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी खत व पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व अधिक आहे. महाराष्ट्रात कोणत्याही महिन्यात पपईची लागवड केली जाते. किमान 18 ते 19 महिने चालणारे हे पीक असल्याने याला एक-दोन वेळा खत किंवा पाणी देवून चालत नाही. खत आणि पाणी व्यवस्थापन वेळेवर आणि योग्य प्रमाणात होणे फार महत्त्वाचे असते.
पपई हे जलद वाढणारे, जास्त उत्पादन देणारे, याचबोरबर जमिनीतून जास्त अन्नद्रव्ये घेणारे फळझाड आहे. त्यामुळे पपईच्या झाडांना वर्षभर खतांची आवश्यकता भासते. झाडाच्या वाढीच्या काळात भरखतांबरोबर वरखतांचे हप्ते द्यावेत. वरखतांच्या मात्रा दिल्यानंतर झाडांची वाढ, उत्पादनात वाढ दिसून येते.
विविध शिफारशी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी शिफारस केल्याप्रमाणे लागवड झाल्यापासून एक महिन्याने 200 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद व 200 ग्रॅम पालाश प्रत्येक झाडाला दोन महिन्यांच्या अंतराने पहिल्या, तिसर्या, पाचव्या आणि सातव्या महिन्यात सदर खतांच्या मात्रा समप्रमाणात द्याव्यात. त्यामुळे फळांची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्चल बंगलोर यांनी पपई झाडाला 240 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश प्रत्येक वर्षी देण्याची शिफारस केलेली आहे.
तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर यांनी पपई झाडाला खतांच्या मात्रा प्रत्येक महिन्यात समप्रमाणात विभागून दिल्यास फळांचे उत्पादन व फळांची प्रत वाढण्यास मदत होते अशी शिफारस केलेली आहे.

सुक्ष्म अन्नद्रव्ये : जस्त आणि बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास लागवडीपासून चौथ्या आणि आठव्या महिन्यात झिंक सल्फेट 0.5 टक्के व बोरीक अॅसिड 0.1 टक्के तीव्रतेची झाडांवर फवारणी करावी. सदरचे द्रावण तयार करण्यासाठी झिंक सल्फेट पाच किलोग्रॅम आणि बोरीक अॅसिड एक किलोग्रॅम 100 लिटर पाण्यात विरघळून तयार करावे. पुढच्या वर्षीच्या दुसर्या पिकांवर चार महिन्यांनी वरील फवारणी करावी.
अधिक उत्पादनासाठी : फळांचा एकसारखा आकार, वजन, प्रत व जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पपई झाडांना ठिबक पद्धतीद्वारे पाण्याबरोबर खतांच्या मात्रा विद्राव्या खतांद्वारे द्याव्यात. हेक्टरी नत्र 617.20 किलो, स्फुरद 617.20 किलो आणि पालाश 617.20 किलो द्यावे.
माती परिक्षण : दुसर्या पुढील हंगामातीत फळांच्या वाढीसाठी वरील खतांच्या मात्रा पुन्हा चालू ठेवाव्यात. खते देण्यापूर्वी जमिनीचे मातिपरिक्षण करून अहवाल उपलब्ध करावा म्हणजे खत देण्याच्या मात्रा निश्चित करता येतात.
पानांच्या देठाचे परिक्षण : झाडांमधील पानांमध्ये नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण समाधानकारक वाढीकरिता किती असावे हे निश्चित माहिती असण्याकरिता पक्व झालेल्या पानांच्या देठातील उती पृथ:करण्यासाठी वापरतात. देठामध्ये झाडांची समाधानकारक वाढ होण्यासाठी व उत्पादन मिळण्यासाठी नत्र 1.44 टक्के, स्फुरद 025 टक्के आणि पालाश 2.52 टक्के आणि 2.52 टक्के प्रमाण असणे आवश्यक आहे. देठातील उतीचे पृथ:करण प्रयोगशाळेत करून खतांच्या निश्ति मात्रा द्याव्यात.

खताचे नियोजन : पपईला गावखते, सेंद्रिय खते तसेच रासायनिक खते, केव्हा व किती प्रमाणात द्यावीत या विषयी शेतकर्यांंना माहिती असणे गरजेचे असते. तैवान पपई वाण हे संकरित वाण असून ते खताला उत्तम प्रतिसाद देते. तेव्हा खत वापराला पपई व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे स्थान शेतकर्यांनी देणे जरूर व आवश्यक आहे. पपई हे शेतकर्याच्या शेतात एकदा लावल्यानंतर किमान 18 ते 19 महिने राहते. ते किमान आठ ते दहा महिने फळे देत असतात. त्या दृष्टीने या वाणाला एक ते दोन वेळा खत देऊन भागत नाही. खत मात्रा सतत देत राहणे आवश्यक आहे. तरच इच्छित अगर विक्रमी उत्पादन मिळणे शक्य आहे.
सेंद्रिय खताचा वापर : जमिनीच्या निवडीनुसार सेंद्रिय खतमात्रा वापरणे जरूरीचे आहे. कारण मध्यम जमिनीत पपई पीक करण्याची पाळी आली तर आपणाला जास्तीतजास्त शेणखत, गावखत व सेंद्रिय खत देणे जरूरीचे आहे. उपलब्ध जमिनीनुसार खताची मात्रा केव्हा आणि किती द्यायची हे ठरवावे लागते.
गावखत व गाळाचा खत : मध्यम खोल साधारण जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी 20 गाड्या आणि त्यानंतर प्रत्येक तीन महिन्यानी 20 गाड्या असे तीन वेळा गावखत आणि गाळ द्यावा. भारी व खोल जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी 20 गाड्या आणि पुढे प्रत्येक तीन महिन्यांनी 20 गाड्या गावखत व गाळ अशी खते द्यावीत.
गावखत मिळाले नाही तर शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. हे खत उत्तम कुजलेले असावे. त्यात अजिबात न कुजणारे प्लॅस्टीक पिशव्या अगर अवशेष नसावेत. बर्याच भागात महानगरपालिकेकडील खत वापरतात. त्या बिड्याची पाने, काचा व प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर असते. अशा प्रकाराची खते अजिबात वापरू नयेत. नंतर देण्यात येणारी खते गाळ व खत एकमेकांत मिसळून झाडांच्या मुळाच्या कार्यक्षेत्रात पडतील अशा बेताने द्यावीत जर पाणी हे ठिबक संचाने देण्यात येत असेल तर भोदावर हे खत झाडापासून 25 सें.मी. परिघात सर्वत्र पसरावे.

शेणकाला रबडीचा वापर : या खताशिवाय शेणकाला रबडी वापरली. तर दर्जेदार व वजनदार फळे मिळतात. केवळ रबडीमुळे सुक्ष्मअन्नद्रव्ये देता येतात. रबडी दिल्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात उपयुक्त जिवाणू मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यांच्या कार्यामुळे नत्र, स्फुरद व पालाश अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात. यामुळे एकरी 40 ते 45 टन फळांचे उत्पादन मिळण्याची शक्यता असते. ही रबडी जास्त उपयुक्त ठरावी, याकरीता व सुक्ष्मअन्नद्रव्ये ही जमिनीत योग्य वेळी देता यावीत, यासाठी ही पद्धतशीर करणे जरूरीचे आहे. रबडी व तिचा वापर पपई करणार्या शेतकर्याने करणे अनिवार्य आहे.
रबडी तयार करण्याची पद्धत : रबडी तयार करण्यासाठी 100 लिटर पाण्याचा एक हौद किंव्हा बॅरलचा वापर करावा. त्यामध्ये 100 किलो शेण, 50 लिटर गोमूत्र, गुळ आणि बेसनपीठ 10 किलो 200 लिटर पाण्यात भिजत घालावे. ही रबडी चांगली एकजीव होण्यासाठी मिश्रण काठीने हलवून एकत्र करावे. आठ दिवस नियमित हे मित्रण दिवसातून एक वेळ चांगले हलवून एकत्र करावे. आठ दिवसानंतर वापरतेवेळी यामध्ये पुन्हा 400 लिटर पाणी घालावे.
हे मिश्रण दर झाडी एक लिटर दरमहा किमान सात वेळा दिल्यास परिणाम दिसून येतो. हे एक लिटर मिश्रण ठिबक असल्यास ठिबकखाली रेघ ओढून द्यावे. ठिबक नसेल तर रिंग पद्धतीने देऊन त्यावर माती टाकावी.
रबडीचे फायदे : रबडी मिश्रण दिल्याने पानावर काळोखी चढते. पाने पिवळी दिसत नाहीत. झाडाची वाढ समाधान कारक होते. फळाची संख्या वाढते. वजन वाढते, पोकळी कमी होऊन गराचा भाग वाढतो, असे अनुभव आहेत. मिश्रण देण्यापूर्वी रासायनिक खत दर झाडी दरमहा कशी द्यावीत, हे काही पुढे नमूद केले आहे. झाडाला खते ठिबक असतील तर ठिबकाखाली रेघ ओढून खते टाकावीत. अगर रिंग पद्धतनीने द्यावीत. नंतर रबडी मिश्रण द्यावे.
रासायनिक खते : पूर्व मशागतीच्या वेळी गावखत व तळ्यातील गाळटाकल्यानंतर लागवडीनंतर 10:26:26 प्रति झाड 250 ग्रॅम द्यावे. पहिल्या महिन्यात पुन्हा प्रति झाड 100 ग्रॅम द्यावे. दुसर्या महिन्यात 200 ग्रॅम डी.ए.पी. आणि 50 ग्रॅम एम.ओ.पी प्रतिझाड द्यावे. तिसर्या महिन्यात प्रतिझाड 250 ग्रॅम डि.ए.पी. द्यावे. पुढे पाचव्या महिन्यापर्यंत हीच मात्रा द्यावी. सहाव्या महिन्यात प्रतिझाड 250 ग्रॅम 19:19:19 तर सातव्या महिन्यात प्रतिझाड 250 ग्रॅम 19:19:19 आणि 190 ग्रॅम एम.ओ.पी. द्यावे. एकूण दोन वर्षाच्या काळात रासायनिक खताच्या माध्यमातून पपईच्या प्रतिझाडाला 350 ग्रॅम 10:26:26, 950 ग्रॅम डी.ए.पी., 500 ग्रॅम 19:19:19 व 150 ग्रॅम एम.ओ.पी. मिळते. यामुळे प्रत्येक झाडाला नत्र 60, स्फुरद 140 तर पालाश 90 ग्रॅम मिळतात.
भेसळ खते : लागवडीनंतर दीड महिन्यांनी, पहिला डोस प्रति झाडास 18:42:0 हे खत 50 ग्रॅम + झिंक सल्फेट 25 ग्रॅम + बोराकॉल 25 ग्रॅम एकत्र मिसळून झाडापासून नऊ इंच अंतरावर रिंग पद्धतीने टाकून बुजवावे. त्यानंतर दुसरा डोस अडीच ते तीन महिन्याच्या दरम्यान (फळकळीच्या वेळेत) शेणखत दोन पाटी + स्टेरामिल किंवा बायोफर्टीलायझर (जीवाणू खत) 125 ग्रॅम + 18:46:0 (डीएपी) 100 ग्रॅम + सुपर फॉस्फेट 100 + पोटॅश (एम.ओ.पी.) 100 ग्रॅम + बोरॉकॉल 50 ग्रॅम असा एकूण 500 ग्रॅम खताचा भेसल डोस झाडांच्या दोन्ही बाजूस निम्मे-निम्मे करून टाकावे व त्यानंतर मातीचा बोध तीन फुट रूंद व एक फुट उंची ठेवून (मातीचा थर बांधणी करावी) बांधणीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी डी. ए. पी. (18:46) 300 ग्रॅम+ पोटॅश 200 ग्रॅम अधिक सेंद्रिय खत (बायोफर्टीलायझर) 500 ग्रॅम एकत्र मिसळून झाडाच्या दोन्ही बाजूस ड्रीपर खाली अर्धे टाकावे. त्यानंतर प्रत्येकी दोन ते दोन महिन्याच्या अंतराने डी.ए.पी. (18:46) 300 ग्रॅम+पोटॅश 200 ग्रॅम मिसळून झाडाच्या दोन्ही बाजूस ड्रीपरखाली टाकावे. पाटाच्या पाण्याची पद्धत असेल तर वरील खते झाडाच्या दोन्ही बाजूस निम्मे-निम्मे टाकण्यापेक्षा झाडांपासून दीड फुटावरती चंद्र आकाराची रिंग करून टाकावी व त्यावर माती झाकून घ्यावी.
विद्राव्या खते : पपई रोपांची लागवड केल्यानंतर चार ते पाच दिवसांनी ह्युमीक ऑसिड एकरी एक लिटर ड्रीपमधून सोडावे किंवा आळवणी करावी. रोपांची लागण केल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी 19:19:19 एकरी दोन ते तीन किलो तीन ते चार दिवसाच्या अंतराने दोन वेळा सोडावे. पपई झाडाला फुल लागल्यानंतर 19:19:19 पाच किलो एकरी चार ते पाच दिवसाच्या अंतराने सोडावे. त्यासोबत मल्टीमोल अडीच लिटर एकरी सोडावे. फळ फुगवणीच्या वेळी 12:61:0 किंवा 13:40:13 एकरी चार ते पाच किलो पाच दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा सोडावे. फळ काढणी अगोदर 0:0:50 किंवा 13:0:45 चार ते पाच किलो चार ते पाच दिवसाच्या अंतराने चार ते पाच वेळा सोडावे.
टीप 1 : पपईला शक्यतो ड्रीपमधून विद्राव्या खतासोबत झिंक, फेरस, मॅग्नेशियम आणि बोरान ही सुक्ष्मअन्नद्रव्ये ड्रीपमधूनच सोडावीत.
टीप 2 : पपईला शक्यतो जास्तीचा भेसळ डोस झाल्यास व ड्रीपमधील विद्राव्या खतांचा अती वापर झाल्यास मुळे सडणे, पानगळ होणे व रोगास बळी पडणे हे प्रकार होतात. त्यामुळे काळजी घ्यावी.
हेही वाचा :
पपई बागेतील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना
पपई पीक संरक्षणाचा बोडके पॅटर्न
काय आहे ? पपई उत्पादनाचा बोडके पॅटर्न !
असे वापरा पपईचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान
सेंद्रिय संजीवनी : सुक्ष्म अन्नद्रव्ये आपण शेणकाला रबडीद्वारे सात महिने दिल्यानंतर सेंद्रिय खते व गाळ वापरावा या सर्वांचा एकत्रित परिणाम खूपच चांगला होतो. याशिवाय परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सेंद्रिय संजीवनी, नावाची एक द्रव्य तयार केले आहे. जेव्हा शेणकाला रबडी देणे शक्य नसेल तर ती सेंद्रिय संजीवनी एक तेे चार किलोे ताजे न वाळलेले शेण, त्यात 20 लिटर पाणी मिसळून वापरावे. हे मिश्रण रांजणात करावे. रांजण झाकून ठेवावा. मात्र रोज एक वेळ काठीने हे मिश्रण ढवळून एकजीव करावे. हे मिश्रण चार दिवस मुरू द्यावे. यात आंबण्याची क्रिया वाढते. त्यामुळे उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढते. या मिश्रणात पुन्हा 40 लिटर पाणी मिसळावे. हे मिश्रण दर झाडी एक लिटर या प्रमाणे द्यावे. मात्र ही मात्रा 15 दिवस अंतराने तीन वेळा द्यावी. ही मात्रा दरमहा देण्याची जरूरी नाही. अशी त्यांची शिफारस आहे.
शिवाजी बोडके ‘गरुड झेप’, वडवळ स्टॉप, मोहोळ-सोलापूर रोड (एनएच-65), मोहोळ, जि. सोलापूर (महाराष्ट्र) मोबा. 9881325555

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा