सध्या तापमानात होत असलेली वाढ, उन्हाचा वाढत चाललेला ताडाका आणि वेळी-अवेळी पडणारा पाऊस याचा मोठा परिणाम शेतीवर झाला आहे. विशेषतः फळबाग शेतीवर या हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या डाळिंब या फळपिकावरही याचा मोठा परिणाम झाला असून, डाळिंबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी बहाराचे योग्य व परफेक्ट व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे.
महत्त्वाची माहिती : डाळिंबाचा मृग बहर अडचणीत
डाळिंब हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यात साधारणतः 87,550 हेक्टरहून अधिक क्षेत्र डाळिंब फळपिकाखाली आहे. राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंब पिकाची उत्पादन घेतले जाते.
डाळिंब बागेतून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी बहाराचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. कोरडवाहू पट्ट्यात कमी पाणी, पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने दर्जेदार डाळिंबाचा मृग बहर धरला जातो. अनेक भागांत उपलब्ध पाण्यावर एप्रिल मे महिन्यात आगाप मृग बहर धरण्यासाठी शेतकरी नियोजन करतात. या दरम्यान, शेतकरी बागांची हलकी छाटणी करून त्या ताणांवर सोडतात. या बागा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फुलोरावस्थेत येतात.
बागेला तन देणे : डाळिंबाचा मृग बहर धरताना रोगग्रस्त भागामध्ये मृग बहार घेणे टाळावे. वर्षातून फक्त 1 बहार घ्यावा. बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी. नवीन बाग असल्यास दोन वर्षांनंतरच पहिला बहार धरावा. झाडांना ताण देण्यासाठी हलक्या जमिनीत 30-35 दिवस तर मध्यम ते भारी जमिनीत 40-45 दिवस पाणी बंद करावे.
फायद्याच्या टिप्स : डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
झाडांची पानगळ : डाळिंबाचा मृग बहर धरताना छाटणीपूर्वी झाडाची पानगळ होणे महत्त्वाची आहे. त्यासाठी डाळिंब बागेच्या छाटणीच्या तीन आठवडे अगोदर 30 मिलि इथ्रेल प्रति 10 लि. पाण्यात घेऊन पानगळ करावी. पूर्ण पानगळ झाल्यानंतरच छाटणी झाली की, मृग बहर परफेक्ट होतो.
झाडांची छाटणी : छाटणी करताना झाडाची पूर्णपणे पानगळ करून छाटणी करावी. छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात. छाटणीवेळी रोगट फांद्या काढून टाकाव्यात. बागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशा प्रकारे छाटणी करावी. फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर लगेच 1 टक्का बोर्डो मिश्रण फवारणी करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन : 4 वर्षे किंवा पूर्ण वाढ झालेल्या डाळिंब झाडांना 325 – 250 – 250 ग्रॅम नत्र – स्फुरद – पालाश पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा फळाची गाठ सेट झाल्यानंतर दोन ते तीन हप्त्यांत विभागून द्यावी.
मृग बहार धरतेवेळी 200 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे. फळे लिंबू आकाराची असताना 500 ग्रॅम 18 : 46 : 0 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा. फळे पेरू आकाराची असताना 200 ग्रॅम 19 : 19 : 19 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा.
तेलकट डाग (बॅक्टेरियल ब्लाईट) व्यवस्थापन : तेलकट डागाचा प्रादुर्भाव होण्यासाठी अनुकूल बाबी म्हणजे, तापमान 26 ते 31 अंश सेल्सिअस व आर्द्रता 36 ते 88 टक्के होणे, ढगाळ, उष्ण व आर्द्रतायुक्त हवामान असणे. तसेच वादळी पाऊस होणे. शिवाय रोगग्रस्त गुटी कलमांचा वापर होणे. बागेत अथवा बागेशेजारी बागेत तेलकट डागाचे अवशेष, कुजलेली फळे, पालापाचोळा इत्यादी कारणांनी तेलकट डागाचा प्रादुर्भाव होवू शकतो.
महत्त्वाचा लेख : डाळिंबासाठी संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार फायद्याचा
तेलकट डागाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर करड्या रंगाचे तेलकट डाग दिसतात. कालांतराने गर्द तपकिरी ते काळ्या रंगाचे होतात. फांदीवर काळपट अथवा काळे खोलगट चट्टे दिसतात. फळावर तपकिरी ते काळ्या रंगाचे वेडेवाकडे ठिपके. त्यावर एल (L) किंवा वाय (Y) तडे पडतात.
तेलकट डागाच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी चारसूत्री कार्यक्रमाची शिफारस आहे.
1. स्वच्छता मोहीम : छाटणी केलेल्या फांद्या, फळे, फुले, पाने जाळून टाकावीत. बागेत जमिनीवर 25 किलो ब्लिचिंग पावडर किंवा 4 टक्के कॉपरडस्ट 8 किलो प्रति एकरी धुरळणी करावी.
2. बहार नियोजन : रोगग्रस्त भागात शक्यतो मृग बहार घेणे टाळावे. उशिराचा हस्त किंवा लवकरचा आंबे बहार घ्यावा. त्यामुळे फळे पावसात सापडत नाहीत.
3. अन्नद्रव्य व्यवस्थापन : शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास झाडांमध्ये रोग व किडीविरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता निर्माण होते.
4. पीक संरक्षण : मागील हंगामातील फळे काढणी झाल्यानंतर लगेच बॅक्टिनाशक (2- ब्रोमो 2-नायट्रो प्रापेन 1,3 डायोल) 50 ग्रॅम प्रति 100 लि. पाणी याप्रमाणे फवारावे. बागेला तीन महिने 10 लि. पाण्यातून घेऊन पानगळ करावी. रोगट फांद्या, फळे, फुले, पाने जाळून नष्ट कराव्यात. छाटणी झाल्यानंतर लगेच बॅक्टिनाशक 25 ग्रॅम + कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लि. पाण्यात घेऊन फवारणी करावी.
लक्षवेधी : का आहे सोलापूर लाल डाळींब नंबर 1
झाडाच्या खोडाला निंबोळी तेल + बॅक्टिनाशक 5 ग्रॅम + कॅप्टन 50 ग्रॅम प्रति 10 लि. पाण्यात मिसळून लेप द्यावा. बागेत जमिनीवर 25 किलो ब्लिचिंग पावडर किंवा 4 टक्के कॉपरडस्ट 8 किलो प्रति एकरी धुरळणी करावी. नवीन पालवी फुटल्यानंतर बॅक्टिनाशक 25 ग्रॅम प्रति 100 लि. पाण्यात घेऊन फवारावे. त्यानंतर 10 दिवसांनी बोर्डोमिश्रण 0.5 टक्का फवारावे. पुन्हा 10 दिवसांनी कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लि. पाण्यात घेऊन फवारावे. ढगाळ, दमट व पावसाळी हवामानात वरील औषधांची 10 दिवसांच्या अंतराने फवारणी सुरू ठेवावी. निरोगी हवामानात 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
मर रोग व्यवस्थापन : मर रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी सूत्रकृमी, खोड किडा, शॉट होल बोअरर, फ्युजॅरियम, रायझोक्टोनिया आणि सिरॅटोसिस्टीस बुरशी हे कारणीभूत घटक आहेत. त्याचे वेळीच नियंत्रण केल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते.
मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेंड्याची पाने आणि फांद्या पिवळी पडून वाळतात, खोडातील गाभा काळा फडतो. खोडाच्या खालच्या बाजूला बुरशीची वाढ होते. अशी लक्षणे दिसून येतात.
मर रोगाच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारसीचा अवलंब करावा. डाळिंब झाडाची नवीन लागवड करताना हलकी मध्यम प्रतीची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमीन प्रखर सूर्यप्रकाशाने तापवून घ्यावी. रोगविरहित रोपे लागवडीसाठी वापरावी.
महत्त्वाचा लेख : डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत सेंद्रिय उपाय
खड्डे 1 x 1 x 1 मि. आकाराचे 4.5 x 3.0 मि. अंतरावर घ्यावेत. कार्बेन्डाझिम 0.2 टक्के द्रावण 5 लिटर प्रति खड्डा टाकावे. क्लोरोपायरीफॉस 50 मिलि प्रति खड्ड्यात टाकावे. कॅल्शियम हायपोक्लोराइड 100 ग्रॅम प्रति खड्डा टाकावे. खड्ड्यात शेणखत 20 किलो, गांडूळ खत 2 किलो, निंबोळी पेंड 3 किलो, ट्रायकोडर्मा प्लस 25 ग्रॅम, ऍझोटोबॅक्टर 15 ग्रॅम, पीएसबी 15 ग्रॅम टाकावे. आणि गरजेनुसार पाणी द्यावे.
मर रोगाने बाधित झालेल्या डाळींब बागेतील मर रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल 15 मिलि किंवा कार्बेन्डाझिम 20 ग्रॅम यापैकी कोणतेही एक आणि त्यात क्लोरोपायरीफॉस 25 मिलि प्रति 10 लि. द्रावण तयार करावे. द्रावण 5 लिटर या प्रमाणात खड्ड्यात किंवा झाडाच्या आळ्यात रिंग पद्धतीने ओतावे.
तसेच डाळींबाच्या संपूर्ण झाडावर हेक्झाकोनॅझोल 10 मिलि किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लि. फवारावे. वाळलेले आणि कोरडे झालेले झाड उपटून नष्ट करावे. छाटलेल्या भागांना 10 टक्के बोर्डोपेस्ट (1 कि. मोरचूद + कि. चुना + लि. पाणी) लावावी.
खोडकीड नियंत्रणासाठी 10 लि. पाण्यात गेरू 4 किलो + क्लोरोपायरीफॉस 50 मिलि + कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम घेऊन खोडास 2 फुटांपर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावे. इंजेक्शनद्वारा डायक्लोरोव्हास 10 मिलि किंवा फेनव्हलरेट 5 मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून छिद्रांमध्ये सोडून छिद्रे बंद करावीत.
सूत्रकृमी नियंत्रणासाठी फोरेट 20 किलो किंवा कार्बोफ्युरॉन 2 किलो/ हेक्टर फवारावे. तसेच डाळींब बागेत झेंडू लावावा. त्यामुळेही सूत्रकृमीचे नियंत्रण होते.
पानांवरील व फळांवरील ठिपक्यांचे व्यवस्थापन : डाळींब झाडाच्या पानांवरील व फळांवरील ठिपके या रोगाच्या वाढीस जास्त उष्णता व आर्द्रता असलेले हवामान अनुकूल ठरते. या रोगामुळे फळांवर व पानांवर गर्द काळ्या रंगाची ठिपके दिसतात.
डाळींब झाडाच्या पानांवरील व फळांवरील ठिपक्यांच्या नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण 1 टक्का फवारावे. कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा बेनोमिल 1 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल 1 मिलि प्रति लिटर या प्रमाणात फवारावे. तसेच मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.
करपा रोगाचे व्यवस्थापन : जास्त उष्णता व आर्द्रता असे हवामान या रोगाच्या वाढीस अनुकूल असते. या रोगाची लक्षणे म्हणजे पानावर गर्द काळ्या रंगाचे ठिपके कडेने पिवळ्या रंगाची किनार दिसते. पक्व आणि कच्च्या फळांवर गर्द काळ्या रंगाचे ठिपके दिसतात. पाने पिवळी होऊन गळून पडतात.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठीबोर्डोमिश्रण 1 टक्का फवारावे. कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझाल 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.
संदर्भ : डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, ता. बागलाण, जि. नाशिक (02555/235555)
महत्त्वाची माहिती : डाळिंबावरील कीड व्यवस्थापन
https://www.facebook.com/shetimitramagazine03