चिकूची लागवड क्षेत्र वरचेवर वाढत आहे. मात्र याची उत्पादकता त्या मानाने वाढताना दिसत नाही. त्याच्या अनेक कारणापैकी त्याचे व्यवस्थापनातील चुका हे महत्त्वाचे कारण आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास चिकूचे यशस्वी उत्पादन आपण घेवू शकतो.
चिकू या पिकास उष्ण व दमट हवामान लागते. अति उष्ण, अति थंड आणि कोरड्या हवामानात फुले, फळे करपतात व गळतात. मराठवाड्यात सर्वत्र विशेषत: परभणी, नांदेड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यातील हवामान चिकू लागवडीस योग्य, आर्द्रतायुक्त हवामान मानवते. तापमान 11 ते 34 अंश सेल्सिअस 10 अंश पेक्षा कमी 39 अंश सेल्सिअस जास्त तापमान अयोग्य, पाऊस 1250 ते 2500 मिमी असते.
जमीन : मध्यम ते भारी, खोल उत्तम पाण्याच्या निचर्याची रेताड, खारवट, चिबड, जमीनसुद्धा चालते. फार हलकी, उथळ खडकाळ जमीन लागवडीसाठी निवडू नये. लवण, पाणथळ आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी टाळाव्यात. सामू सहा ते आठ असतो.
वाण : कालीपत्ती, पिलीपत्ती, क्रिकेटबॉट, छत्री, बारामती, को-1, को-2, डि. एस. एच.-1 डि. एस. एच.-2, पि. के. एम.-1, 2, 3, इत्यादी. तर कालीपत्ती आणि क्रिकेटबॉल हे आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचे वाण आहेत. याची अभिवृद्धी खिरणी खुंटावर भेट कलम करून करता येते.
लागवड : एक बाय एक बाय एक मीटर खड्डा 10 बाय 10 मीटर अंतरावर घ्यावा. कमी पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. चिकू सिंचनाखालील पीक असल्यामुळे वर्षभर लागवड करता येते. खड्ड्यात शेणखत अधिक दोन किलो सुपर फॉस्फेट अधिक 100 ग्रॅम लिंडेन/ अल्ड्रेक्स वाळवी व मुंग्याच्या नियंत्रणासाठी टाकावी. खड्ड्या पृष्ठभागापासून 15 ते 20 सें.मी. वर भरावा. कलम खड्ड्याच्या मधोमध लावावे. लावल्यावर बाजूची माती दाबावी. आधार द्यावा व पाणी द्यावे.
वळण आणि छाटणी : झाडाचा मुख्य बुंधा एक मीटर उंचीपर्यंत सरळ वाढवून त्यावर चार ते सहा फांद्या विविध दिशेला वाढवाव्यात. रोगट वाळलेल्या आणि नको असलेल्या फांद्या छाटून काढाव्यात. लागवडीनंतर आलेली अनावश्यक फूट काढून टाकावी. झाडांना आधार द्यावा.
निगा : चिकू रोप लावल्यानंतर लगेच फलधारणेस सुरूवात होते. परंतु रोपांच्या जोमदार वाढीसाठी तीन वर्षे, फळे, फुले काढून टाकावीत. चौथ्या वर्षापासून फळे घ्यावीत. कलमाचे उन्हापासून संरक्षण करावे, बुंध्याला बोडॉपेस्ट लावावी. आळ्यात आच्छादन करावे, पाणी द्यावे.
खते व्यवस्थापन : पहिल्या वर्षी 10 किलो शेणखत, नत्र 200 ग्रॅम, स्फुरद 100 ग्रॅम व पालाश 100 ग्रॅम द्यावे. दुसर्या वर्षी 20 किलो शेणखत, नत्र 400 ग्रॅम, स्फुरद 200 ग्रॅम व पालाश 200 ग्रॅम द्यावे. तिसर्या वर्षी 30 किलो शेणखत, नत्र 600 ग्रॅम, स्फुरद 300 ग्रॅम व पालाश 300 ग्रॅम द्यावे. चौथ्या वर्षी 40 किलो शेणखत, नत्र 800 ग्रॅम, स्फुरद 400 ग्रॅम व पालाश 400 ग्रॅम द्यावे. पाचव्या वर्षापासून पुढे 50 किलो शेणखत, नत्र 1000 ग्रॅम, स्फुरद 500 ग्रॅम व पालाश 500 ग्रॅम द्यावे.
खते देताना पहिला हप्ता अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद व पालाश जूनमध्ये द्यावा व उरलेल्या नत्राचा अर्धा हप्ता सप्टेंबर मध्ये द्यावा. ठाणे जिल्ह्यात चिकूला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते देतात. यात पाच वर्षाच्या झाडाला दहा घमेली शेणखत, पाच किलो एरंडी पेंड, तीन किलो एस. एस. पी. तर 15 वर्षाच्या झाडाला 40 घमेली शेणखत, 15 किलो एरंडी पेंड, आठ किलो एस. एस. सी. आठ किलो स्टेरामील अशा मुबलक सेंद्रिय खतांमुळे मोठ्या आकाराची व उत्तम प्रतीची फळे मिळतात. या व्यतिरिक्त माती परीक्षण अहवालानुसार सुक्ष्म अन्नद्रव्य खते दिल्यास त्यामुळेसुद्धा उत्पादनात भर पडते.
पाणी व्यवस्थापन : नियमित पाणी, झाडाचे वय, जमिनीचा मगदूर आणि हंगामाप्रमाणे द्यावे. हिवाळ्यात 10 ते 15 दिवसाच्या तर उन्हाळ्यात पाच ते सात दिवसाच्या अंतराने द्यावे. खोडाला पाणी लागू देऊ नये, बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. पावसाळ्यात आळे बुजवून जादा झालेले पाणी काढण्यासाठी चर खोदावी.
ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास जमिनीत नेहमी ओलावा राहतो. व झाडांना सतत नवीन फूट येऊन फळधारणा होत राहते, फळांचा आकार मोठा होतो असा काही बागायदारांना अनुभव आहे.
आंतरमशागत : खते देताना आळी 30 ते 45 सें.मी. खोल खोदून त्यातील माती मोकळी करावी. माती हलवून खते देऊन नियमित पाणी दिल्यास झाडांची वाढ जोमदार होते. आंतरपिके घेतल्यास दुसर्या खास मशागतीची गरज पडत नाही. बाग तण काढून स्वच्छ ठेवावी.
आंतरपिके : साधारणत: आठ ते दहा वर्षांनी झाडे एकमेकांना मिळतात. त्यामुळे पहिल्या पाच वर्षात भाजीपाला, भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन, हिरवळीची पिके, फुले, पपई, शेवगा, केळी इत्यादी पिके घेता येतात.
खोड पोखरणारी अळी : नियंत्रण ते छिद्रात रॉकेलचा बोळा बसवून पॅक करावे. साल खरडावी, किडग्रस्त फांद्या जाळून टाकाव्यात.
पाने पोखरणारी अळी : 20 ग्रॅम काबॉरील भुकटी (50 टक्के) 10 लिटर पाण्यात टाकून फवारावी, अळीने फांद्यावर तयार केलेली जाळी आतील अळीसह काढून नाश करावा.
मर आणि फळांची गळ : पावसाळ्यात बुरशीजन्य रोगाने थोड्याफार प्रमाणात फांद्या मरतात. नियंत्रणासाठी रोगट फांद्या मरतात. नियंत्रणासाठी रोगट फांद्या कापाव्यात. त्या जागी बोर्डोपेस्ट लावावे तसेच 10 टक्के बोर्डोमिश्रणाची फवारणी द्यावी. पावसाळ्यात फळांची गळ फायटोप्थोरा बुरशीमुळे होते. त्यासाठी एक टक्के बोर्डोमिश्रणाची फवारणी पाऊस पडण्याअगोदर व नंतर एक महिन्यांनी करावी त्यात सॅडोव्हीट टाकावे.
फळकूज व पानावरील ठिपके : रोगट फांद्या कापाव्यात. एक टक्के बोर्डोमिश्रणाच्या वरीलप्रमाणे दोन फवारण्या कराव्यात.
काढणी, प्रतवारी व उत्पादन : काढणीसाठी अतुल झेल्याचा वापर करावा. फळावर देठावून येणारा चीक पडून वाळू देऊ नये त्यामुळे प्रत खालावते.
प्रतवारी : मोठा आकार, मध्यम, लहान आकार या प्रमाणात करावी. मोठ्या आकाराच्या फळांना जास्त भाव मिळतो. चिकू लागवडीतील नफा फळांच्या संख्येवर अवलंबून नसून फळांचा दर्जा व आकार यावर अवलंबून असतो.
जुलै ते ऑगस्ट व डिसेंबर ते जानेवारी महिन्यात झाडावर भरपूर फळे येतात पण आकार लहान असतो, बाजारभाव कमी मिळतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी ते मार्च व महिन्यात फळांची संख्या कमी तर आकार मोठा असतो, बाजारात मागणी चांगली असते. खत आणि मशागतीच्या पद्धतीद्वारे हंगाम मागे ते पुढे करून फळांचा आकार मोठा करता आला तर शेतकर्यांना अधिक फायदा मिळू शकतो. प्रत्येक झाडापासून 1 ते 1.5 क्विंटल फळे मिळतात. हेक्टर 10 ते 15 टन उत्पादन मिळते.
बाजारपेठा व निर्यात : वर्षभर फळे येत असल्याने बाजारपेठेचा तेवढा प्रश्न नसतो. बाजारपेठा प्रामुख्याने वाशी मार्केट मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, अमृतसर, जयपूर, कलकत्ता इत्यादी.
निर्यात : युरोप, आखाती देश आणि आग्रेय आशियात फळांना मागणी आहे. चिकू हे अल्पायुशी फळ असल्यामुळे बाजारात जास्त आवक झाल्यास नुकसान जास्त होते. यासाठी त्यापासून रस, मुरंबा, सरबत, स्क्वॅश, सिरप, जॅम, चिकू फोडी हवाबंद करणे, चिकू बर्फी, भुकटी इत्यादी तयार करून तेही परदेशात निर्यात करणे सहज शक्य आहे.
प्रा. शिवाजी शिंदे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी