भारतात महाराष्ट्र राज्य डाळिंब लागवडीमध्ये अग्रेसर राज्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उत्तम प्रकारच्या वाणांचा शेतकरी बांधवाने केलेला अवलंब, महाराष्ट्रातील समशितोष्ण हवामानामुळे डाळिंब झाडास वर्षातून केंव्हाही फुले येतात. अर्थात त्यामुळे मृग बहार (जून ते जुलै) हस्त बहार (सप्टेंबर ते ऑक्टोबर) आंबे बहार (जानेवारी ते फेब्रुवारी) यापैकी व्यापारी दृष्ट्या तसेच बाजारातील विविध फळांची उपलब्धता पाहून कोणताही बहार घेता येतो.
महाराष्ट्रात डाळिंबाना दिवसेंदिवस परदेशी बाजारपेठ वाढत आहे. डाळिंब उत्पादनात अनेक गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल व त्यातील एक प्रमुख भाग म्हणजे डाळिंबावरील प्रमुख उपद्रवकारक / नुकसानकारक किडींचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण होय कारण निर्यातक्षम उत्पादनांत किडींचे अवशेष अथवा किटकनाशकांचे अवशेष शिल्लक राहिल्यास फळे निर्यात करण्यात समस्या निर्माण होते. किटकनाशकांच्या कमीतकमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण केल्यास निर्यातक्षम फळ उत्पादन सुलभ होईल.
रस शोषणार्या किडी : मावा : बहार धरल्यानंतर नवीन पालवी फुटण्यास सुरूवात होते, त्या वेळी कोवळ्या शेंड्यावर व कोवळ्या फुलांवर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तो वाढल्यास शेंडे चिकट होऊन त्यावर तसेच पानांवर काळी बुरशी वाढते. मावा कोवळ्या फुटींतील, कळ्यांतील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. लहान कळ्या, फुले फळे गळून पडतात. पाने वेडेवाकडे होऊन चुरडामुरडा झाल्यासारखी दिसतात. शेंड्याची वाढसुद्धा थांबते. प्रजातीनुसार मावा किडीचा रंग हिरवा, पिवळा किंवा तपकिरी काळपट असतो.
फुलकिडे किंवा खरड्या (थ्रिप्स) : झाडावर पिवळे आणि काळे फुलकिडे आढळतात. आकार लहान असून लांबट निमुळते शरीर असते. या किडींना खरड्या असेही म्हणतात. या किडींचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी झाडावर उमलेले फूल तळहातावर झटकले, तर असंख्य किडे हातावर सहज दिसतात. फुलकिडे पाने, कोवळ्या फांद्या व फळांना खरवडून त्यातून स्त्रवणार्या रसावर किंवा पेशीद्रव्यावर जगतात. त्यामुळे पाने वाकडी दिसतात.
पांढरी माशी : पांढर्या माशीचे वास्तव्य मागील बाजूस असून समूहाने या किडीची पिले आणि प्रौढ माश्या राखाडी पांढर्या असतात. पिले पानांतील पेशीद्रव्य शोषतात, तर प्रौढ माशी कोवळ्या पानांतील पेशीद्रव्यावर उपजीविका करते. किडीची मादी माशी अतिसुक्ष्म असून पानांवर अंडी घालते.
खवले कीड : या किडीसुद्धा झाडांच्या पानातील कोवळ्या भागातील रस शोषतात. खवले कीड काळसर व तपकिरी रंगाची लंबगोलाकार फुगीर स्वरूपाची असते. ही कीड झाडावर विशेषत: शेंड्यावर फांद्यावर आणि काही वेळा फळांवर स्थिर होऊन पेशीद्रव्य काळ्या बुरशीची वाढ होते.
पिठ्या ढेकूण : पिठ्या ढेकूण मिलीबग किंवा पांढरा ढेकूण या नावानेही ओळखला जातो. उष्ण आणि कोरड्या हवामानात किडींचा प्रादुर्भाव होतो. मोठ्या फळांवर प्रादुर्भाव झाला, तर अशी फळे चिकट काळपट होतात व विक्रीयोग्य राहत नाही. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फळांची गळ होते. कळी अवस्थेतसुद्धा किडीचा प्रादुर्भाव होऊन कळ्या गळून पडतात.
कोळी (माईट्स) : हे कोळी लाल आणि पिवळ्या रंगाचे ठिपके असलेले असतात. लाल आणि पिवळ्या प्रजाती डाळिंबावर निदर्शनास येतात. ही कीड पानांच्या खालील बाजूवर, शिरेजवळ किंवा कडेला असंख्य अंडी घालते. पिले बाहेर पडण्याच्या वेळी अंडी लाल दिसतात. त्याची पिले आणि प्रौढ किडे पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. त्यानंतर पाने विटकरी दिसू लागतात. कालांतराने पूर्ण पाने गळून पडतात. कोळी किडीचा प्रादुर्भाव फळांवर सर्व अवस्थांमध्ये होतो. फळांच्या सालीवर भागावर रस शोषल्यामुळे फळांचा आकर्षकपणा कमी होऊन प्रत घसरते.
रस शोषणार्या किडीचे व्यवस्थापन : बागेत स्वच्छता ठेवावी. तणांचा बंदोबस्त करावा. झाडांच्या छाटणीचे नियोजन करताना झाडांवर फांद्याची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. फवारणी करते वेळी किटकनाशक किंवा बुरशीनाशकांचे द्रावण झाडाच्या संपूर्ण भागात पोचण्यात मदत होईल. पांढर्या माशीच्या नियंत्रणाकरिता बागेत पिवळे कार्डशीट्स त्यावर चिकट पदार्थ किंवा एरंडेल तेल लावून अंतरा अंतरावर अडकवावेत.
पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणाकरिता झाडाच्या खोडाजवळ जमिनीत किटकनाशकाची भुकटी मिसळावी. जेणेकरून झाडांच्या वरच्या भागावर चढणार्या क्रॉवलर्सचे नियंत्रण होईल. पिठ्या किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाच्या द्रावणात फिश ऑईल रोझीन सोप प्रतिलिटर 2.5 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, कोळी या किडींच्या नियंत्रणाकरिता व्हर्टिसिलीयम लेकॅनी सहा ग्रॅम प्रतिलिटर दूध पाच मिली प्रतिलिटर या प्रमाणात परोपजीवी बुरशीची फवारणी करावी. परोपजीवी कीटक बागेत सोडले, तर किटकनाशकांची फवारणी करू नये. त्याच्या द्रावणात नेहमी स्टिकरचा वापर करावा. किटकनाशकाची फवारणी आवश्यकता असेल तेव्हाच करावी. त्यासाठी खालील किटकनाशके 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावीत.
फळांवरील किडी : फळ पोखरणारी अळी (सुरसा) : ही कीड महाराष्ट्रात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात आढळून येते विशेषत: पावसाळ्यात (मृगबहारात) ही कीड जास्त प्रमाणात असते. या किडीच्या अळ्या फळे पोखरून खातात. त्यांची विष्ठा फळांच्या पृष्ठभागावर आलेली दिसते. फळांमध्ये इतर बुरशी व जीवाणूंचा शिरकाव होऊन फळे कुजतात. या किडीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या वेळेस सुरू होतो. म्हणून या किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने फुलोर्याच्या अवस्थेपासून सुरवात केल्यास नियंत्रण चांगले होते.
रस शोषणारा पतंग : हे निशाचर पतंग असून दिसायला आकर्षक असतात. या किडीचा जीवनक्रम डाळिंबपिकावर होत नाही. ओढे, नाले, नदीकिनारी जंगली वनस्पतीवर तो होतो. हे पतंग रात्री फळांवर हल्ला करतात, म्हणून त्यांचे नियंत्रण कठीण असते. रात्री आठ ते अकरा या वेळेत पतंग दिसतात. पक्व फळे शोधून त्यांना सुक्ष्म छिद्रे पाडून आतील रस शोषून त्यावर ते उपजीविका करतात. छिद्र पाडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होऊन त्या जागी फळ सडू लागते. अशी फळे गळून पडतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास 50 ते 60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. या पतंगाचा प्रादुर्भाव आंबे आणि मृग बहारात म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत अधिक असतो.
खोड, फांद्यावरील किडी (इंडरबेल), खोडकिडा (स्टेम बोरर) : विशेषकरून जुन्या तसेच दुर्लक्षित बागेत या किडीचे प्रमाण जास्त असते. साल खाणारी अळी खोड व फांद्याच्या बेचक्यात छिद्र पाडून त्यात राहते. अळीची विष्ठा तसेच चघळलेला लाकडाचा भुसा जाळीच्या स्वरूपात प्रादुर्भाव झालेल्या भागावर लटकलेला दिसतो. पूर्ण वाढलेली काळपट अशी चार सें.मी. लांब असते. खोडकिड्याची अळी मात्र पांढरी, जाड व डोक्याकडील भाग रूंद असतो. ती खोड व फांद्याच्या आतील भाग पोखरून खाते. या किडीची तीव्रता जास्त असल्यास प्रथम फांद्या वाळतात व नंतर संपूर्ण झाड वाळते. खोडकिडीमुळे झाडसुद्धा मरू शकते.
खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे (शॉर्ट होल बोरर) : या किडीचे भुंगेरे काळपट असून, आकाराने अत्यंत लहान म्हणजे दोन ते तीन मिलीमीटर लांब असतात. किडीच्या अंडी, अळी कोष व भुंगेरा या अवस्था खोडातच आढळून येतात. भुंगेरे खोडाला सुक्ष्म छिद्रे पाडून आतील भाग पोखरतात. अळीसुद्धा आतील भाग पोखरते. असे झाड पिवळे पडून वाळण्यास सुरवात होते. प्रादुर्भाव झालेल्या जागी लहान छिद्रामधून भुसा बाहेर आलेला असतो. ही कीड जमिनीलगतच्या मुळांवर, खोडांवर तसेच फांद्यावर दिसून येते.
मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड) : ही सूत्रकृमी अतिसुक्ष्म असून, मादी चंपूच्या आकाराची असते. ती डाळिंबाच्या लहान मुळांच्या अंतभार्गात राहून मुळांतील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे गाठी निर्माण होतात. शिवाय, सूत्रकृमीने इजा केल्याने अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते व परिणामी झाडे वाळतात.
डॉ. अशोक वाळुंज, डॉ. विनय सुपे, उद्यान विद्यावेत्ता, कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर. (मोबा. 9404213076)