घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. आपल्या घराभोवती, अंगणात, परसात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर, जागा असेल तिथे वृक्षलागवड करून, बाग फुलवून आपण पर्यावरण संवर्धनामध्ये आपले योगदान देऊ शकतो.
फळझाडांची कुंडीतील लागवड : मोठ्या कुंड्यांमधून (1मीटर व्यास) असलेल्या फायबरच्या कुंड्या (1 मीटर उंच) बाजारात मिळतात. ड्रेन होल असलेल्या विटांचे तुकडे टाकून माती, खत, वाळू, यांचे माध्यम भरावे. परसबागेत साधारण पेरू, चिकू, आंबा, लिंबू या फळपिकांची लागवड आपण करू शकतो. टेरेसवर या मोठ्या कुंड्यांतून ही लागवड अनेकांनी यशस्वी केली आहे. फक्त लागवड कुंड्यांमधून केली असल्यामुळे त्या फळझाडांची वाढ छाटणी करून नियंत्रित ठेवावी लागते. आपल्या आवडीचे फळपिकाचे रोप किंवा कलम रोपवाटीकेतून आणि रोपांची पिशवी ब्लेडने कापून मातीच्या हंडीसकट कुंडीत कलमाची लागवड करावी व लगेच पाणी द्यावे.
परसबागेत लावण्यात येणारी फुलझाडे : या बागेमध्ये लावण्यात येणारी फुलझाडे हि दोन प्रकारात मोडतात .एक
म्हणजे एका विशिष्ट ऋतूमध्ये येणारी फुलझाडे आणि दुसरे म्हणजे वर्षभर मिळणारी फुलझाडे.
विशिष्ट ऋतूमध्ये येणारी फुलझाडे :
उन्हाळ्यात येणारी फुलझाडे : गलांडा (गॅलार्डिया), झेंडू, चिनीगुलाब.
पावसाळ्यात येणारी फुलझाडे : झेंडू, अस्टर, गलांडा, चिनीगुलाब, कॉसमॉस, गोकर्ण, शेवंती, तगर, सूर्यफूल, निशिगंध.
हिवाळ्यात येणारी फुलझाडे : झेंडू, शेवंती, अस्टर, निशिगंध, ग्लॅडिओलॉस, पांढरी शेवंती.
वर्षभर वाढणारी फुलझाडे : गुलाब, मोगरा, जास्वंद, रातराणी, पारिजातक.
कुंडीमध्ये लावता येणारी शोभिवंत फुलझाडे : गुलाब, क्रोटॉन, ड्रेसिना, Areca palm, Ixora pentas, Spider plant.
वेलवर्गीय फुलझाडे : कागदीफुल, जाई, जुई, वेली गुलाब, मधुमालती, कृष्णकमळ, बेगोनिया, alamanda
कंद पासून येणारी फुलझाडे : निशिगंध, ग्लॅडिओलस, डेलिया, स्पायडर लिली.
बियापासून येणारी : अस्टर, गलांडा, झेंडू, पांढरी शेवंती.
भाजीपाला : सर्व प्रकारच्या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर, लाल व हिरवा माठ, अंबाडी, चवळी इ.
निरंतर भाज्यांचा प्लॉट मध्ये शेवग्याच्या शेंगा, केळी, पोपई, टॅपियोका, कढीपत्ता आणि अगाथी इ.
विविध वेलवर्गीय भाज्या लागवड : या वाफा पद्धतीत छान बहरतात. वेल हा मातीच्या पृष्ठभागात ६ ते १० इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. पण वाफा हा लांब असावा. कारण वेलाच्या मुळ्या जितक्या लांब पसरतील तितक्याच तो वेल बहरतो.वाफा पद्धतीत वाल आणि त्याचे विविध प्रकार, कारलं, डांगर, देवडांगर, गिलके, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी यांचीही लागवड करता येते.
औषधी : अक्कलकाढा, पुदिना, तुळस, गवती चहा, कोरफड, वावडिंग
खत व्यवस्थापन :
भाजीपाला : हिरव्या पालेभाज्यांना नत्र लागते म्हणून १२-१८ इंच व्यासाच्या गोल कुंड्यांमध्ये किंवा बांबू बास्केटमध्ये खुरपी करून चार-पाच छोटे चमचे यूरिया पसरवून टाका किंवा एक मग पाणी घेऊन त्यात या यूरियाचे द्रावण कुंडीत सोडा. सेंद्रिय पद्धतीने जर भाजीपाला उत्पादित करावयाचा असेल तर एक ओंजळ गांडूळखत व हाडांचा चुरा (बोनमील) घालावे. महिन्यातून परसबाग मध्ये एकदा हे खत द्यावे.
फळझाड : फळपिकांना वर्षातून किमान दोनदा खत देणे गरजेचे आहे. जून-जुलै व जानेवारी-फेब्रुवारी. 1 मीटर व्यासाच्या कुंडीत एक वर्षाच्या फळझाडास साधारण अर्धा किलो मिश्र अथवा संयुक्त खत द्यावे. (सुफला १५:१५:१५) व वर्षातून दोनदा एक घमेले गांडूळखत द्यावे.
फुलझाड : फुलझाडांनासुद्धा भाजीपाल्याप्रमाणे थोडा यूरिया, गांडूळखत द्यावे. संयुक्त खत वर्षातून एकदाच म्हणजे पावसाळ्यात द्यावे. आजकाल १०० टक्के पाण्यात विरघळणारी खते बाजारात उपलब्ध आहेत जी आपण फवारूनसुद्धा देऊ शकतो. ५ ग्रॅम प्रति लिटर १९:१९:१९ या संयुक्त प्रमाणात विरघळणाऱ्या खताची फवारणी संपूर्ण परसबागेतील पिकांवर आठवड्यातून एकदा करावी.
हेही वाचा :
कशी आहे ? गांडूळ खत निर्मितीची आधुनिक पद्धती
भाजीपाल्यासाठी महत्त्वाच्या 4 टिप्स्
गॅलर्डिया (गलांडा) लागवडीचे असे करा नियोजन !
पाणी व्यवस्थापन : पाणी देताना खूप संवेदनशीलपणे जपून द्यावे. उन्हाळ्यात दोनदा म्हणजे सकाळी व संध्याकाळी रोज पाणी द्यावे, तर हिवाळ्यात एकदाच पाणी द्यावे. पाणी झारीने अथवा परसबाग अंगणात असेल तर पाइपने द्यावे.
आंतरमशागत : दररोज परसबागेत फेरी मारून निरीक्षण करावे, तण काढून मातीत खुरपणी करावी, कीडग्रस्त, रोगट फांद्यांची छाटणी करावी. वेलवर्गीय भाजीपाल्याला मांडव घालून आधार द्यावा. कीटकनाशक, बुरशीनाशकाची आठवड्यातून एकदा फवारणी करावी.
घराच्या गच्चीवर परसबाग करण्यासाठी : दीड-दोन फूट खोलीच्या कुंडय़ा वापरता येतात. त्या चांगल्या भाजणीच्या व मातीच्या असाव्यात कारण त्यातून पाण्याचा उत्तम निचरा होतो व मुळांचा हवेशी संपर्क आल्याने झाडांची जोमाने वाढ होते. कुंडय़ा भरताना तळाशी छिद्र असल्याची खात्री करून प्रथम तळामध्ये विटांचे तुकड भरावेत. मग त्यावर पोयटा माती, कम्पोस्ट खत समप्रमाणात मिसळून कुंडी भरावी. पण कुंडीत एकच झाड लावावे. खोलीत अथवा व्हरांडय़ात टांगण्यासाठी तारेच्या कुंडय़ा वापराव्यात. अशा कुंडय़ांतून नॅस्टरशियम, पिटुनिया, व्हरबेनिया अशी झाडे लावून कुंडय़ा दिवाणखान्यात किंवा व्हरांडय़ात टांगून ठेवल्यास अतिशय सुंदर दिसतात.
शुभदा पलघडमल सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषि महाविद्यालय, सोनई.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा