कारली हे व्यापारीदृष्ट्या फायदेशीर ठरलेले महत्त्वाचे पीक आहे. आखाती आणि इतर देशात निर्यात होत असल्यामुळे कारल्याला चांगला बाजारभाव मिळतो. परंतु दर्जेदार आणि अधिक प्रमाणात उत्पादन मिळविण्याकरीता योग्य तंत्राचा उपयोग करणे फारच महत्त्वाचे आहे. आरोग्यदृष्ट्या कारल्याला बहुगुणी म्हणतात. कारल्यामध्ये प्रोटीन व कार्बोहायड्रेट शिवाय लोह, चुना, पोटॅशिअम, फॉस्फोरस ही खनिजे ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
सुधारीत जाती : हिरकणी : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केलेली आहे. या जातीच्या फळांचा रंग हिरवा असून, लांबी 15 ते 20 सें. मी. असते. फळांची जाडी देठापासून टोकापर्यंत एकसारखी असते. फळ दिसण्यास आकर्षक आहे. या जातींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे केवडा या रोगाचे प्रमाण कमी असते. या जातीचे हेक्टरी उत्पन्न 15 ते 18 टनापर्यंत मिळते.
फुले ग्रीन गोल्ड : ही जात नव्यानेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केलेली आहे. या जातीच्या फळांना रंग हिरवा आहे. फळाची लांबी 20 ते 25 सें.मी. असून देठाकडे फळ निमुळते असते. या जातीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे. ही जात इतर जातींच्या तुलनेत केवडा रोगास फारच कमी प्रमाणात बळी पडते. या जातीचे हेक्टरी 18 ते 20 टन उत्पन्न मिळते. अनुकूल वातावरणात या जातीमध्ये यापेक्षाही अधिक उत्पादन देण्याची क्षमता आहे.
कोकण तारा : या जातीची फळे रंगाने गर्द हिरवी आहेत. फळे मध्यम लांबीची असून आकाराने मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांना निमुळती अशी असतात. या जातीचे हेक्टरी 18 ते 20 टन उत्पन्न मिळते. कोकण कृषी विद्यापीठाने ही जात विकसीत केलेली आहे. या व्यतिरीक्त प्रिया, अरका हरित, को.व्हाईट लॉग व पुसा दो मोसमी या सुधारीत जाती आहे.
हवामान : कारली या पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. कारल्याच्या वेलींची वाढ व फळांच्या उत्पादनांसाठी सरासरी 24 अंश सेल्सीअस ते 27 अंश सेल्सीअस तापमान अत्यंत पोषक आहे. किमान तापमान 19 अंश सेल्सीअस कमाल तापमान 34 अंश सेल्सीअस या पिकाच्या वाढीस योग्य आहे. हवेत आर्द्रता जास्त असल्यास बुरशीजन्य रोगांचे प्रमाणही जास्त वाढते. उन्हाळी हंगामात हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असते त्यामुळे या पिकावरील बुरशीजन्य रोगांचे प्रमाणही फारच कमी असते.
जमीन : कारली हे पीक सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या जमिनीत येते. परंतु उत्तम निचर्याची आणि कसदार जमीन भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी योग्य आहे. तसेच सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे. या पिकास जमिनीशी, आम्लविम्लता सहा ते सात च्या दरम्यान उपयुक्त आहे.
लागवड : कारली पीक जमिनीवर घेतल्यास दोन ओळीतील अंतर 1.5 ते 2 मीटर ठेवावे व दोन वेलांमध्ये 0.6 ते 1 मीटर अंतर ठेवावे. ताटी पद्धतीसाठी दोन ओळीतील अंतर 1.5 मीटर व दोन वेलातील अंतर 1 मीटर ठेवावे. मंडप पद्धतीसाठी दोन ओळीतील अंतर दोन 2.5 मीटर ठेवावे व दोन वेलातील अंतर 1 मीटर ठेवावे. हे पीक जमिनीवर घेतल्यास हेक्टरी 3 ते 4 किलो बी पुरेसे आहे. ताटी पद्धतीसाठी हेक्टरी 2.5 ते 3.0 किलो बी लागते व मंडप पद्धतीसाठी हेक्टरी दोन ते 2.5 किलो बी लागवडीसाठी लागते.
ताटी व मंडप पद्धतीचे फायदे : ताटी किंवा मंडपावर पिकाचा कालावधी वाढतो. वेली 6 ते 7 महिने चांगल्या राहतात. तर जमिनीवर केवळ 3 ते 4 महिनेच राहतात. पाने व फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून सडत नाहीत. कीड आणि रोगांचे प्रमाण कमी राहते. फळे लोंबकळती राहिल्याने त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंगसारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, औषध फवारणी व तण काढणे ही कामे सुलभ होतात. वेली ताटी किंवा मंडपावर पोहचेपर्यंत दिड ते दोन महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे कारली पिकामध्ये पालेभाज्या मिश्रपीक म्हणून घेता येतात. पिकाचे उत्पन्न तीन ते चार पटीने वाढते. उत्तम प्रतिच्या फळांना बाजारभाव चांगला मिळतो.
सेंद्रिय खते : कारल्यासाठी हेक्टरी 20 टन शेणखत किंवा कंपोस्ट जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर पसरून द्यावे व जमीन कुळवून सर्या वरंबे किंवा अळी तयार करून घ्यावीत. शेणखत कमी असल्यास बी टोकण्याच्या ठिकाणी थोडे थोडे टाकून जमिनीत चांगले मिसळून द्यावे व त्यावर बी टोकून द्यावे.
रासायनिक खते : या पिकास हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश वापरावे. अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेेले अर्धे नत्र दोन हप्त्यात विभागून पहिला हप्ता लागवडीनंतर 30 दिवसांनी व दुसरा हप्ता 60 दिवसांनी द्यावा. खत दिल्यानंतर पिकास त्वरीत पाणी द्यावे. इतरवेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे.
आंतरमशागत : कारल्याची मुळे फारशी खोल जात नसल्यामुळे खोलवर मशागतीची जरूरी नाही. वरचेवर खुरपणी करून जमीन स्वच्छ ठेवावी. त्यामुळे कीड व रोगांचा उपद्रव कमी राहतो.
कीड आणि रोग
रस शोषणारी कीड : या किडींच्या नियंत्रणासाठी मिथाइल डिमेटॉन दहा मिली किंवा इमिडॅक्लोपीड चार मिली प्रती दहा लिटर पाणी फवारावे.
फळमाशी : या किडींच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन 20 मिली अधिक 100 ग्रॅम व दहा लिटर पाणी यांची फवारणी करावी.
केवडा व भुरी : या रोगाचे नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.30 टक्के अधिक पाण्यात विरघळणारे गंधक 0.30 टक्के अधिक चिकट द्रव्य 0.10 टक्के दहा दिवसाच्या अंतराने लावगडीनंतर एक महिन्यांनी फवारणी करावी.
काढणी व उत्पन्न : कारल्याची फळे कोवळी असतानाच काढावीत. हेक्टरी सरासरी उत्पादन 150 ते 200 क्विंटल मिळते.
नितीन सातपुते विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.