कांदा काढणीपासून ते कांदा साठवणूकीत ठेवण्यापर्यंत पाच महत्त्वाच्या मुद्द्याचा समावेश होतो. 50 टक्के कांद्याच्या माना पडल्यानंतर कांदा काढणीस सुरवात करावी. कारण या काळात कांद्याच्या मानेची जाडी कमीत कमी असते. तसेच कांदा पक्व होऊन कांद्यामध्ये साठवणुकीसाठी आवश्यक असणारे बदल घडून येतात. काढणीनंतर शेतातमध्ये पातीसकट तीन ते पाच दिवस वाळवणे. कांदा वाळवताना कांद्याचा ढिग न करता पहिल्या ओळीतील कांदा दुसर्या ओळीतील कांद्याच्या पातीने झाकला जाईल. अशा पद्धतीने जमिनीवर एकसारखा पसरवून वाळवावा त्यामुळे या विशिष्ट कालावधित पातीमधील सुत्पावस्था वाढविणारे जीवनसत्व कांद्यामध्ये उतरते.
कांद्याची मान ठेवून पात कापणे : कांद्याच्या माना कापतांना कांद्याच्या पिळ देऊन तीन ते पाच सेमी मान ठेवाच कांद्याची मान कापावी, जेणेकरून कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद होते व त्या वाटे कांदा सडविणार्या सुक्ष्म जिवाणूंचा सिरकाव होत नाही. तसेच कांद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन वजनात घट येते व कांद्याला मोड येणे रोखले जाते.
कांदा तीन आठवड्याकरता सावलीत वाळविणे : या काळात कांद्यामध्ये साठलेली उष्णता बाहेरील सालीमधील पाणी पूर्णपणे आटून त्याचे पापुद्य्रात रूपांतर होते. पापुद्य्रामुळे कांद्याभोवती घट्ट आवरण तयार होते व श्वसनक्रिया मंदावते. त्यामुळे कांद्याला चार ते पाच महिने मोड फुटत नाही व वजनात घट होत नाही. अतिरिक्त उष्णता व पाणी निघून गेल्यामुळे असा कांदा सडत नाही. कांदा साठवणुकीपूर्वी कांद्याची प्रतवारी करणे : कांदा साठवणूकीपूर्वी कांद्याची प्रतवारी करणे अनिवार्य आहे. प्रतवारीमध्ये एकदम लहान कांदे, मोड फुटलेले कांदे, जोडकांदे व सडलेले कांदे बाजूला काढावेत व मध्यम आकाराचे एकसारखे कांदे साठवणूकीसाठी निवडावेत.
कांद्याचे मूल्यवर्धन : कांद्याचा वापर मसाला म्हणूनच मोठ्या प्रमाणात होतो. कांद्याचे भाव कमी जास्त होत असल्याने कांद्याचे मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. जर आपण आपल्या कडील कांद्यावर थोडी प्रक्रिया करून जर काही काळापर्यंत टिकविता आला तर आपणास चांगला फायदा होतो. कांदा चाळी बांधून काही काळापर्यंत कांद्याचे आयुष्य वाढविता येईल. कांद्यावर आधारित लघु उद्योग स्थापन करून चांगला फायदा मिळू शकतो कांद्यापासून कांद्याची पेस्ट, पावडर, चकल्या, तेल, ज्युस लोणचे इत्यादी पदार्थ तयार करता येतात.
कांद्याचे सुकलेले पदार्थ : महाराष्ट्रा आणि गुजरातमध्ये कांदा सुकविण्याचे मोठे प्रकल्प आहेत. परंतु जर आपण शास्त्रीय पद्धतीने कांदा सुकवून ठेवल्यास त्यास सुद्धा चांगली मागणी आहे. कांदा सुकविण्यासाठी कांदा पांढरा असल्यास अती उत्तम परंतु लाल कांदा सुकविल्यानंतर त्याचा रंग काही दिवसांची काळपट होतो म्हणून त्याची मागणी कमी होते.
कांदा सुकविण्याच्या बर्याच पद्धती आहेत. आपण घरगुती वापरासाठी कांद्याचे काप करून एप्रिल ते मे महिन्यात कडक उन्हात अथवा इतर कालावधीत सोलर ड्रायरचा उपयोग करून सुकविणे शक्य आहे.
कांदा सुकविण्याची पद्धत : चांगल्या कांद्याची निवड करणे, शेंड्याकडील भाग, मुळाकडील भाग काढून टाकणे, कांदे स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यावेत, दोन ते तीन, मिनिटे उकळलेल्या पाण्यात बुडवून ठेवावेत, कांदे थोडे थंड झाल्यावर वरील साल काढून टाकावे, कांद्याचे उभे आडवे धारदार स्टिलच्या सुरीने काप करणे, समान थराची जाळी ठेवून पसरवून ठेवावे.0.1 ग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट अधिक पाच ग्रॅम मीठ अधिक 0.1 ग्रॅम सिट्रीक आम्ल, (1लिटर हे सर्व पाण्यात घटक टाकून साधारण दहा किलो कांद्याच्या कापास पुरेल या हिशोबाने कापावर शिंपडावे.) ओलावा सहा ते सात टक्केपर्यंत कमी करण्यासाठी ड्रायरमध्ये किंवा 40 अंश अधिक दोन अंश से या तापमानावर 25 ते 30 तास किंवा 45 ते 46 अंश से तापमानावर 16 ते 18 तास वाळविण्यास वेळ लागतो. सुकविलेले काप पावडर करून अथवा तसेच 300 ते 400 गेनच्या प्लास्टीकच्या पिशवीत भरून हवाबंद करून ठेवावे. कांद्याकापाची साठवणुक क्षमता 12 ते 15 महिनेपर्यंत ठेवता येईल.
डॉ. लालासाहेब तांबडे केंद्र समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर. (मोबा. 9422648395)