कोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ 0.1 ते 0.2 हेक्टर इतके असावे व तलावाची खोली 1.5 ते 2.0 मीटर असावी. यापेक्षा मोठया आकाराचे क्षेत्रफळ असणा-या तलावाचा वापर सुध्दा कोळंबी संवर्धनासाठी होतो, परंतु अशाप्रकारच्या तलावामध्ये खाद्य योग्य रितीने सर्व तलावभर देता येत नाही, तसेच पाण्याचा दर्जासुध्दा नियंत्रीत करता येत नसल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण असते.
कोळंबी संवर्धन तलावामध्ये साधारणतः 8 ते 10 महिने पाणी उपलब्ध राहणे आवश्यक आहे. लहान मोठे तलाव, गावतळी, नैसर्गिक पाणी साठे, कृत्रीम जलाशय, तसेच शेतीमध्ये मुद्दाम बांधलेली तळी यांचा वापर कोळंबी संवर्धनासाठी करता येतो.
संगोपन तलाव
नैसर्गिक अथवा कोळंबी बीज निर्मिती केंद्रावरून उपलब्ध होणारे बीज हे अतिशय लहान आकाराचे (1.0 से.मी.) असते. अशा बीजास पोस्टलार्वी म्हणतात. ही लहान बीजे फारच नाजूक असतात व ते इतर जलकिटक किंवा प्राण्याच्या भक्षस्थानी असतात. त्यामुळे या बीजाचे संगोपन करून त्यांना 2-3 सेमी आकाराच्या शिशु झिंगा आकारापर्यंत वाढविणे आवश्यक असते व त्यानंतर त्यांना संवर्धन तलावामध्ये सोडावे. यासाठी लहान 50 ते 200 वर्गमिटर क्षेत्रफळाचे मातीचे तलाव, सिमेंटचे हौद किंवा प्लास्टीकच्या टाक्या यांचा उपयोग करता येतो. यापैकी सुविधा उपलब्ध नसल्यास लहान घरांच्या जाळीचे चैकोनी हौद (हापे) निर्माण करून अशा प्रकारचे हापे संवर्धन तलावाच्या एका कोप-यात उभारून त्यामध्ये बीजाचे संगोपण करता येते. त्यासाठी संगोपन तलावामध्ये साधारणतः 2000 ते 3000 बीज प्रती वर्गमिटर याप्रमाणात साठविली जावू शकते.
कोळंबी बीजांसाठी खाद्य
या दरम्यान या बीजांचे अडोसा म्हणून व चिटकून राहण्यासाठी झाडाच्या फांद्या, कौलाचे किंवा मडक्याचे तुकडे, सिमेंट किंवा प्लास्टीकच्या पाईपचे तुकडे, सायकल/स्कुटरच्या जुन्या निरूपयोगी टायर्सचे योग्य आकाराचे तुकडे अशा स्वरूपाच्या काही ना काही वस्तु संगोपण तलावाच्या / टाकीच्या तळाशी टाकाव्यात. या बीजांना खाद्य म्हणून गांडूळाचे किंवा शिंपल्यातील प्राण्याचे बारीक तुकडे, भाताचे तुस, भुईमुगाची पेंढ, सोयाबिनची भुकटी इ. प्रकारचे खाद्य बीजाच्या वजनाच्या 10 टक्के या प्रमाणात दररोज 3 ते 4 वेळा अन्न म्हणून द्यावे. संगोपन तलावाच्या व्यवस्थापनेनुसार 60 ते 90 टक्क्यापर्यंत लहान बीज जिवीत राहू शकते. अशा प्रकारे विकसीत झालेले बीज संगोपन तलावामध्ये सोडण्यास योग्य असते. प्रति हेक्टरी 40 ते 50 हजार बीजांचे संचयन एकेरी कोळंबी शेतीसाठी करावा. कोळंबी सोबत कार्प जातीचे मासे सोडावयाचे असल्यास अशा मिश्रशेतीमध्ये प्रति हेक्टरी 15 ते 25 हजार कोळंबी बीज (2.5 ते 4.0 सेमी आकाराचे) संचयन करावे.
तलावातील भक्षकांचे निर्मुलन
संवर्धन तलावाच्या प्रकारानुसार त्याची पूर्व तयारी करणे आवश्यक असते. पूर्वतयारी करते वेळेस बारमाही तलावातील पानवनस्पतीचे समुळ निर्मुलन करावे व मासेभक्षक मासे तसेच इतर प्राण्यांचे निर्मुलन करण्यासाठी तलावात ब्लिचींग पावडर 175 कि.ग्रॅ. व युरीया 100 कि.ग्रॅ. यांचे मिश्रण तलावातील पाण्यात सोडावे. ब्लिचींग पावडर तलावामध्ये टाकण्यापुर्वी 6-7 तास अगोदर युरिया पाण्यामध्ये सोडावा. यामुळे तलावातील मासेभक्षक मासे व प्राण्यांचा नायनाट होतो. तलावाच्या पाणी आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या मार्गावर जाळी बसवून घ्यावी.
तलावात अडोसे तयार करणे
कोळंबीची वाढ वेळोवेळी कवच टाकून होत असते. कवच कवच टाकल्यावर कोळंबीचे शरीर अत्यंत मऊ होत असते. अशावेळी इतर कोळंबी कवच टाकलेल्या कोळंबीचा फडशा पाडण्याचा धोका असतो. यामुळे अशा अवस्थेच्या वेळी त्यांना सुरक्षित राहण्यासाठी तलावात लपण्यासाठी काही जागा/आडोसा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे बिळासारख्या सुरक्षित जागी लपून राहण्याची सवयसुध्दा त्यांना असते. यासाठी संवर्धन तलावामध्ये कोळंबी बीजाचा संचय करण्यापूर्व कोळंबीला लटकण्यास अथवा बिलगुण राहण्यास झाडाच्या फांद्या, नायलाॅनच्या जाळया, सिमेंट पाईपचे तुकडे, जिप/ट्कचे खराब टायर्स इ. अडचणी निर्माण कराव्यात.
डॉ. रविंद्र एल. काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख मत्स्यतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम, मो. 7350205746
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा