पपई पिकावर कोळी, मावा, तुडतुडा, पांढरी माशी, काळी अळी या किडीचा प्रादुर्भाव होतो. मुख्यत्वे विषाणूजन्य तसेच बुरशीजन्य रोग येतात. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच त्याचे उत्पादनही घटते. प्रतिबंधात्मक उपाय योजनांनी किडी व रोगांवर मात करून उत्पादन वाढवता येवू शकते.
1) पपया मोझॅक किंवा केवडा : हा विषाणूंमुळे होणारा रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपईच्या झाडावर नवीन येणारी पालवी पिवळसर दिसते. वाढीच्या काळात पानाच्या शिरा हिरव्या दिसून पाने हाताला चरचरीत लागतात. व त्यावर पिवळसर हिरवे चट्टे दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र असल्यास पानाचा आकार कमी होऊन पाने एखाद्या धाग्याप्रमाणे बारीक दिसतात. अशा रोगग्रस्त झाडांची फळे आकाराने लहान व वेडीवाकडी होतात. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते. काही वेळा विषाणू रोगाची तीव्रता जास्त असल्यास पिवळी पाने टोकाकडून वाळत जातात.पपईवरील विषाणूजन्य रोग झाडावर आल्यानंतर त्याचे नियंत्रण होत नाही.
नियंत्रण : पपईवर विषाणूजन्य रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपे तयार करण्यापासून काळजी घ्यावी. निंदणी, कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच 15 दिवसांच्या अंतराने दहा मिली डायमिथोएट किंवा ऑक्सिडिमेटॉन मिथाईल व 100 मिली निमअर्क प्रति दहा लिटर पाण्यातून फवारल्यास मावा किडीचे नियंत्रण होते. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी 0.5 टक्के याच प्रमाणात करावी.
आर्द्र व थंड हवामानात या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्यास रोपाची लागवड फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केल्यास रोपाच्या वाढीच्या काळात हवेत आर्द्रता कमी असते व तापमान जास्त असल्याने मावा किडीची वाढ होत नाही व त्यामुळे साहजिकच विषाणू रोगाचा प्रसार नियंत्रणात राहतो. पपई भोवती वेलवर्गीय पिके घेऊ नयेत. पपईच्या बागेत मावा किडीचा शिरकाव टाळण्यासाठी बागेभोवती उंच पीक लावून अडथळा निर्माण करावा. पपईची बाग लावण्यापूर्वी बागेभोवती तीन ते चार महिने अगोदर केळीच्या झाडांचे चार ते पाच ओळी लावल्यास मावा कीड बाहेरून पपईच्या बागेत येण्यास अडथळा निर्माण होतो. व त्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार कमी होतो.
2) रिंगस्पॉट व्हायरस (मोझॅक लीफकर्ल) : पपईवर येणारा हा विषाणूजन्य रोग असून हल्ली हा रोग फार प्रमाणात दिसून येतो. मावा व थ्रिप्समार्फत या रोगाचा प्रसार होतो. प्राथमिक लक्षणे म्हणजे पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. नंतर संपूर्ण पानांवर पिवळे ठिपके दिसतात. पानांच्या देठांची लांबी कमी होते. पानांचा आकार लहान होतो. पान वेडेवाकडे होते. झाडाची वाढ खुंटते. रोगाच्या तीव्रतेमुळे पाने गळून पडतात आणि शेंड्यावर फक्त एक लहानसा पानांचा गुच्छ राहतो. त्यामुळे झाडाला फळधारणा होत नाही. लहानमोठी फळे गळू लागतात. योग्य वेळी काळजी न घेतल्यास फार आर्थिक नुकसान होऊ शकते.
नियंत्रण : हा रोग टाळण्यासाठी पपईची रोपे 40 मेशच्या नायलॉन जाळीच्या आच्छादनाखाली वाढवावीत. त्यामुळे विषाणू रोगाचा वाहक जी मावा कीड आहे. त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. शेतात सुरूवातीला बाहेरच्या रांगेत असलेल्या झाडांवर रोग संसर्ग दिसून येतो. अशी झाडे दिसताच मुळांपासून उपटून काढून जाळून किंवा पुरून टाकावीत. अशाने रोगाचा पुढील प्रसर थांबतो. मावा किडीसाठी आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी. रोगाची लस दिलेली रोपे लावावी.
याच्या नियंत्रणासाठी झाडांवर मिथिल डेमेटॉन किंवा डायमेथोएट दोन मिली किंवा अॅसिफेट एक मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. व्हायरसजन्य झाडांच्या फळांपासून मिळणारे बियाणे लागवडीस वापरू नये.
3) खोडकूज किंवा बुंधासड : हा रोग बुरशीपासून होतो. झाडाचा बुंधा काळा पडून तो भाग मऊ होतो. पपईच्या झाडाच्या बुंध्याला जास्त पाणी लागल्याने बुंधा सडतो.
नियंत्रण : पाण्याचा चांगला निचरा होणार्या जमिनीतच पपईची लागवड करावी. खोडाला पाणी लागू नये म्हणून दुहेरी बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. बागेत जास्त वेळ पाणी साचू देऊ नये. आळ्यांमध्ये एक टक्का बोर्डोमिश्रण किंवा डायफोलेटॉन (दोन ग्रॅम प्रतिलिटर पाणी ) किंवा एलियट (एक ग्रॅम प्रतिलिटर पाणी) झाडाच्या बुंध्यालगत जमिनीत टाकावे.
4) बुरशीजन्य करपा : या रोगात प्रथम फळावर व झाडाच्या खोडावर फिकट पिवळ्या रंगाचा चट्टा दिसून येतो. तो भाग नंतर मऊ पडून त्याचा रंग तपकिरी होतो. त्यानंतर मध्यभागी काळा होऊन भोवती पिवळा रंग दिसतो. हा रोग प्रामुख्याने हिरव्या व न पिकलेल्या फळांवर आढळून येतो. हा बुरशीजन्य रोग आहे. ही बुरशी पानावर लहान लहान छिद्रे पाडते व पाने गाळतात. हिरव्या फळांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
नियंत्रण : करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 ग्रॅम अॅन्द्रॉकॉल 10 लिटर पाण्यात मिसळून दर 10 दिवसांनी फवारावे.
5) फळसड : हा बुरशीमुळे होणारा रोग असून, फळावर प्रथम तपकिरी काळपट ठिपके आढळून येतात. नंतर अशी फळे सडून गळून पडतात. शेतात रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.
नियंत्रण : पिकावर 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डॅझिम, 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
6) खोड कुज किंवा पायकुज : हा रोग पिथियम अफ्यानीडरमेंटम या बुरशीमुळे होतो. बुरशी जमिनीत सुप्तावस्थेत राहते. बुंध्याजवळ पाणी साचत असल्यास या रोगचा प्रादुर्भाव वाढतो. रोपावरही हा रोग पडतोे. त्यामुळे रोपे कोलमडून मरतात. या रोगाचा प्रादुर्भाव साधारणत: जुलै ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यात येतो. सुरूवातीला जमिनीलगत बुंध्याजवळ गर्द रंगाचे चट्टे दिसून येतात व नंतर तपकिरी काळपट होतात. बुंध्याची साल खरडवून पाहिली असता चट्टा व त्यांचे सभोवतालच्या परिसारातील बुंध सडलेला दिसतो. आतील पेशी कुजल्यामुळे बुंध्याला भाग रिकाम्या मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे दिसतो. अशा शेंड्याकडील पाने पिवळी पडून सुकतात व पानगळ होते. अशा प्रकारे पूर्ण झाडाचे नुकसान होते व मळ्यात खाडे पडतात.
नियंत्रण : रोपवटीकेच्या जागेवर सौर ऊर्जाच्या संस्कार करावा. रोपे मरू नये म्हणून प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम चोळावे. रोपे लावणीच्या वेळी 200 ग्रॅम शेणखतात चार ग्रॅम ट्रायकोडर्मा मित्र बुरशी मिसळावी. मळ्यात बुंध्याजवळ पाणी साचू देऊ नये. बुंध्याला भर द्यावी. क्लोरोथॉलोनील (कवच) किंवा मेटॅलॅक्झोन किंवा अलाईट दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त झाडाच्या बुडाशी ओतावे.
7) पानावरील ठिपके : हा रोग निरनिराळ्या बुरशीमुळे होतो. उदा. फायलोस्टक्टा, अॅस्कोफायटा फायकोस्फेरेला इत्यादी पानावरील ठिपके मध्यभागी पांढरे व कडेला पिवळे असतात. तसेच गोल किंवा अनियमीत दिसतात. ठिपक्यामुळे प्रकाश संश्लेपणाची क्रिया मंदावते.
नियंत्रण : रोगाची तीव्रता पडताळून दर महिन्यात 25 ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-45) दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
8) फळझड : हा रोग कोलेटोट्राकम ग्लोइओस्पोरिऑइडस या बुरशीमुळे होतो. मळ्यात रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. फळावर सुरूवातील तपकिरी काळपट ठिपके पडतात. नंतर अशी फळ सडून गळून पडतात.
नियंत्रण : पानावर व विशेषत: फळावर मॅन्कोझेब (डायथेन एम-45) 25 ग्रॅम किंवा दहा कार्बेन्डाझीम बावीस्टीन दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आवश्यकतेनुसार औषधाची पुन्हा आलटून पालटून फवारणी करावी.
9) रिंग स्पॉट : हा रोग विषाणूमुळे होतो व तो पपईवर हमखास आढळतो. हा रोग मावा या किडीमुळे पसरतो. यामुळे पानावर तसेच फळांवर असंख्य दोन ते तीन मिमी गोलाकार आकाराचे तेलकट डाग आढळून येतात व ज्यामध्ये पिवळी गोल वलये आढळतात. पाने आकसतात व वेडीवाकडी होतात. फळे लहान राहतात. बेचव लागतात, पाने कोकडतात, झाडाची वाढ खुंटते व फळाचे सालीवर असंख्य तेलकट डाग दिसून येतात.
नियंत्रण : रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता सुरवातीलाच रोगग्रस्त दिसणारी एक ते दोन टक्के झाड पूर्णपणे नष्ट करावीत. तसेच कॉल्शियम नायट्रेड तीन किलो व बोरॉन एक किलो ठिबकमधून द्यावे.
10) चुरडा-मुरडा किंवा थ्रिप्स (लिफ कलर्) : हा विषाणूमुळे होणारा रोग असून पांढर्या माशीमुळे पसरतो. पानांच्या कडा वरच्या बाजूने आतमध्ये वळतात व पानाचा आकार लहान होऊन पाने वेडीवाकडी दिसतात. पानावर हिरवे व पिवळे चट्टे आलटून पालटून दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फळे लहान राहतात व बेचव लागतात.
नियंत्रण : 15 ग्रॅम टाटामाणीक + 15 ग्रॅम अॅन्द्रॉकॉल + 15 ग्रॅम अॅग्रोमिनमॅक्स या प्रमाणे फवारणी करावी.
14) पानावरील करपा : पानाच्या दोन्ही बाजूस बुरशी चढते. फळावर ठिपके दिसतात.
नियंत्रण : याच्या नियंत्रणासाठी झाडावर डायथेन झेड 78 हे 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
15) मोझॅक : हा विषाणूजन्य रोग असून मावा, पांढरी माशीद्वारे त्याचा प्रसार होतो. पाने पिवळी पडतात व आकाराने छोटी होतात. शेंड्यावर पानांचा गुच्छ राहतो. फळधारणा होत नाही.
नियंत्रण : 15 ग्रॅम टाटामाणीक + 15 ग्रॅम अॅन्द्रॉकॉल + 15 ग्रॅम अॅग्रोमिनमॅक्स या प्रमाणे फवारणी करावी.
16) भुरी : हा रोग पावसाळ्यात व दमट आर्द्रता हवामानात आढळून येतो. या रोगात पानांच्या खालच्या व वरच्या भागात पांढरट बुरशी येते व पाने गळून पडतात. तसेच फुलेही गळतात.
नियंत्रण : पाण्यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून दर 15 दिवसांनी फवारणी करावी. किंवा दोन ग्रॅम सल्फेक्स (सल्फर) एक लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. तसेच पाच मिली कॅराथेन दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा कॉन्टॉफ 15 मिली + पोटॉशियमबाय कार्बोनेट 30 ग्रॅम यांची 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शिवाजी बोडके ‘गरुड झेप’, वडवळ स्टॉप, मोहोळ-सोलापूर रोड (एनएच-65), मोहोळ, जि. सोलापूर (महाराष्ट्र), मोबा. 9881325555, 9422646425.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा