बांबू हा जलद वाढणार्या गवताचा प्रकार आहे. गवताच्या पोएसी कुलातील ११५ प्रजातींमध्येच्या १,४५० पेक्षा अधिक जाती आहेत. कांडे असलेले, गोल, बहुधापोकळ, गुळगुळीत व काष्ठयुक्त खोड हे बांबूचे वैशिष्ट्य आहे. बांबूचा व्यास ३० सें. मी.पर्यंत वाढू शकतो, तर उंची ४० मी. पर्यंत वाढू शकते. बांबूचे उगमस्थान आशिया आहे, असे मानतात. जगातील उष्ण ते थंड तापमान असलेल्या प्रदेशांत त्याचा प्रसार झालेला दिसून येतो.
भारतात बांबूच्या १० जाती आढळतात. भारताच्या पश्चिम व दक्षिण भागांत तो नैसर्गिकरीत्या वाढलेला आढळतो. गंगेचे खोरे, हिमालयाचा काही भाग व इतर प्रदेशांत त्याची पद्धतशीर लागवड होते. हिमालयात समुद्रसपाटीपासून ३,१०० मी. उंचीपर्यंत तो आढळतो. आफ्रिकेच्या उष्ण भागात बांबूच्या कमी जाती आढळतात, तर दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वतात हिमरेषेपर्यंत तो दिसून येतो. महाराष्ट्रात बांबूच्या ‘ऑक्सिटेनँथेरास्टॉक्साय’ आणि ‘ऑक्सिटेनँथेरारिचेयी’ या दोन जाती प्रामुख्याने आढळतात.
बांबूही बहुवर्षायू वनस्पती असून, जमिनीतील कोंबापासून तिची वाढ होते. ते नेहमी बेटांच्या रूपात एकत्र वाढतात. त्यांच्या मुळा जाळेदाट असतात. त्यामुळे जमिनीची धूप थांबते. बांबूत कांड्यां असतात आणि दोन कांड्यांच्या प्रत्येक सांध्यापाशी भक्कम व जलाभेद्य पडदा असतो. खोडाला बहुधा फांद्या फुटत नाहीत. मात्र काही पूर्ण वाढीच्या पक्व बांबूंना आडव्या फांद्या येतात व त्यांना तलवारीच्या आकाराची पाने असतात. पानेसाधी, लांबट, अरुंद, टोकदार, गुळगुळीत, चमकदार आणि गडदहिरवी असतात. पानाला लहान देठ असतो. बांबूचा जमिनीकडचा भाग पानांनी वेढलेला असतो; मात्र ही पाने लगेच गळतात. फुले गवतांच्या फुलांसारखी बारीक असून, त्यांचे गुच्छ असतात. त्यांना आयुष्यात एकदाच फुले येतात आणि ती आल्यानंतर बांबू मरून जातात. बहुतेक बांबूंना क्वचितच दरवर्षी फुले येतात. काही बांबूंना ६५ वर्षांनी, तर काही मोजक्या बांबूंना १३० वर्षांनी फुले येतात. भारतात बांबूंना ३२ व ६० वर्षांनी फुले येतात आणि ती सर्वत्र एकाच वेळी येतात. अशी वनस्पती इतरत्र नेऊन लावली, तरी तिला त्याच वेळी फुले येतात. फळे शुष्क व कण स्वरूप असतात. बांबूच्या बिया भाता प्रमाणे शिजवून खातात. फळे व बिया दुर्मिळ असल्याने बांबूची लागवड मुनवे व कलमे लावून करतात.
जमीन व हवामान : बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. तरीही, पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड करणे शक्य आहे. बांबूच्या यशस्वी लागवडीसाठी सर्व साधारणपणे ९ ते ३६ अंश से. तापमान, सरासरी प्रतिवर्षी ७५० मि. मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. बांबूची मुळेही तंतुमय असल्याने ती जमिनीच्या वरच्या भरात वाढतात. त्यामुळे जमीन उथळ असली तरी चांगली निचरा होणारी भुसभुशीत असावी लागते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, चिबड अथवा पाणथळ जमिनीत बांबूची लागवड करू नये.
अभिवृद्धी : बांबूची अभिवृद्धी वेगवेगळ्या बियांपासून व कंदापासून करता येते.
अ) बियांपासून अभिवृद्धी : बियांपासून अभिवृद्धी करताना बांबूची रोपेही पुढील दोन प्रकारांनी तयार करतात. गादीवाफ्यात ‘बी’ पेरून बांबूची रोपे तयार करताना वाफ्याची रुंदी साधारणपणे १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर ३० सें. मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये बियाणे पेरावे. बियाण्याची पेरणी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. या पध्दतीने तयार केलेली रोपे जून-जुलै महिन्यांत लागवडीसाठी वापरता येतात बांबूच्या रोपांची निर्मिती बियाणे पॉलिथिन पिशवित सुद्धा लावून करता येते. यासाठी २५ सें. मी. × १२ सें. मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे १ : १ : १ मिश्रण करून पॉलिथिन पिशवित भरून प्रत्येक पिशवित ३ ते ४ बिया टोकून त्यात पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची चांगली वाढ होते व कमी बियाणे लागते. यामध्ये बियाणे लावलेल्या वाफ्यामध्ये चाळणी एका महिन्याच्या कालावधीने करणे आवश्यक असते.
ब) कंदाद्वारे अभिवृद्धी : यासाठी जुन्या बांबूच्या बेटातील कंद मुळयासह पावसाळ्याच्या सुरुवातीस काढून त्याची लागवड करतात. कंदाद्वारे केलेल्या बांबूच्या लागवडीमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण चांगले असते व वाहतुकीचा खर्च कमी येतो. लागवडीसाठी कंदाची निवड करताना कंदावर २ ते ३ डोळे असणे आवश्यक असते.
लागवड : बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबू तोडणीस अडचण होत नाही. सर्व साधारणपणे ५ × ५ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते. याप्रमाणे लागवड केल्यास एक हेक्टर अंतरावर ४०० बांबूची रोपे बसतात. बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत ५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें. मी. आकाराचे खड्डे खोदावेत. यामुळे उन्हाळ्यात माती तापून त्यामधील किडी, कृमी मरण्यास मदत होते. अशा या खोदलेल्या खड्ड्यात पावसाळ्यापूर्वी माती भरावी. माती भरताना त्यामध्ये एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम अमोनियम सल्फेट आणि २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. नंतर पुरेसा पाऊस होताच त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी. पॉलिथिन पिशव्यांमधील रोपांची लागवड करताना पिशवी फाडून, अलगद मातीच्या गोळ्यासह रोप खडुयात बसवून आजूबाजूची माती चौफेर घट्ट दाबून द्यावी.
(टीप : मानवेलही बांबूची जात लांबधागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक्षम जात आहे. ही जात गर्द हिरव्या रंगाची असून, साधारण पणे ६ ते १८ मीटर उंच वाढते. दोन पेन्यांमधील अंतर २५ ते ४० सेंटिमीटर असून पेन्यांच्या जवळचा भाग थोडा फुगीर असतो. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी बांबू लागवडीची माहिती ही प्रामुख्याने मानवेल जाती विषयी देण्यात येत आहे.)
सविता अजिनाथ करचे सहाय्यक प्राध्यपिका, श्रीराम उद्यान विद्या महाविद्यालय, पाणीव (माळशिरस) जिल्हा – सोलापूर (मोबा. ८४०८९९८९८९)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा