शेवग्याची छाटणी करून मिळवा भरपूर शेंगा

0
1108

शेवग्याची झाडे एका वर्षात 10 ते 12 मिटरपर्यंत सहज वाढते. चांगले खत आणि पाणी व्यवस्थापन असेल तर झाडांच्या वाढीचा वेग जास्त असतो. शेवग्याचे लाकूड ठिसूळ असल्याने त्यावर चढून शेंगा काढता येत नाहीत. उंच झाडे वाऱ्याने मोडू शकतात. उंच झाडावरील शेंगा काढणे त्रासदायक होते. शिवाय अशा उंच झाडांना शेंगाही कमी लागतात. त्यामुळे झाडांची उंची मर्यादीत असणे फायद्याचे ठरते. बुटक्या झाडांच्या शेंगा जमिनीवरुन तोडने सहज शक्य असते.

शेवगा लागवडीमध्ये झाडांची छाटणी (प्रुनिंग) हा महत्वाचा भाग आहे. ठरावीक उंची वरुन झाडांची शेंडे खुडल्यामुळे फांद्यांची संख्या वाढते. पर्यायाने शेंगाची संख्यापण वाढते. शेवगा झाडास जेवढ्या फांद्या जास्त तेवढ्या शेंगा जास्त लागतात. त्यामुळे शेवगा पिकाच्या छाटणीला जास्त महत्त्व आहे.

पहील्या बहाराची छाटणी (शेंडे खुडणे) : पहील्या वर्षी रोपांचे शेंडे खुडणे महत्वाचे आहे. बियाण्याद्वारे किंवा तयार रोपांद्वारे कोणत्याही पद्धतीने लागवडी केली तरीही त्या रोपांचे पहिल्या वर्षी तीनदा शेंडे खुडावेत. शेंडे खुडताना शेवगा रोपे लागवडीनंतर जमिनी पासून दीड फूट उंचीची झाल्यावर रोपांचा शेंडा खूडून घ्यावा. साधारण इंचभर शेंडा खुडावा किंवा रोपे दोन फुट उंच वाढवून नंतर अर्धा फुट शेंडा खुडला तरी चालेल. म्हणजे शेवग्याचे रोप एकरी न वाढता त्यांना बगलफुटी निघायला मदत होते.

दीड फुटावर शेंडा खुडल्यानंतर साधारणत: महिना ते दीड महिन्यात रोपे जमिनीपासून चार फूट उंचीपर्यंत वाढतात. त्यावेळी जेवढ्या फांद्या आहेत. त्यांचे शेंडे खुडून घ्यावेत. अशाच प्रकारे झाडांची उंची जमिनीपासून सहा फूट झाल्यावर  पुन्हा एकदा शेंडे खुडून घ्यावेत.

बर्‍याच ठिकाणी एक मिटर किंवा तीन फुटावर पहीला शेंडा खुडावा असे सांगितले जाते. काही शेतकरी त्यानुसार एक मिटरवर शेंडा खूडून घेतात. अशावेळी झाडांना एक मिटर उंचीवर उपफांद्या फुटतात व खोडवा पीक किंवा दुबार पीक घेताना झाडांची छाटणी त्याहून आधिक उंचावर होते. म्हणून पहिल्या वर्षी रोपांचे शेंडे दीड फुटावर खुडावेत म्हणजे उपफांद्या कमी उंचीवर तयार होतील व खोडवा पिके घेताना त्यांची उंची कमी राहील.

पहिल्या बहाराचा माल संपल्यानंतर दुसरा बहार धरण्यासाठी झाडांची छाटणी घेणे महत्वाचे असते. बरेच शेतकरी नवीन लागवड पद्धतीचा अवलंब करतात. यामध्ये पहीला बहार संपल्यानंतर शेवगा झाडे काढून टाकली जातात व पुन्हा नवीन लागवड केली जाते. घन लागवडीमध्ये अशी पद्धत वापरतात. ज्यावेळी लागवडीचे अंतर जास्त असते. किंवा शेवगा फळबागेमध्ये अंतरपीक म्हणून घेतला असेल तेंव्हा छाटणी घ्यावी लागते. झाडे छाटल्यापासून जातीपरत्वे चार ते पाच महिन्यात पुन्हा शेंगा तोडायला चालू होतात.

जर पहिल्या बहारामध्ये आपल्या झाडांची उंची जास्त झाली नसेल आणि बागेत झाडांची दाटी झाली नसेल तर झाडांची छाटणी न करताही आपण बहार धरु शकतो. या पद्धतीमध्ये झाडांना पाण्याचा ताण देऊन पानगळ करून घ्यावी व झाडांचे शेंडे वरुन एक ते दीड फुट छाटून घ्यावेत. झाडांच्या वयानुसार खते देऊन पाणी द्यावे पाणी दिल्यानंतर झाडे फुटताना झाडांना फुले सुटायला सुरुवात होते. व दोन महिन्यात शेंगाची तोंडणी चालू होते. झाडे न छाटता कमी दिवसामध्ये या प्रकारे आपण माल काढू शकतो. परंतु या प्रकारे येणार्‍या शेंगाची गुणवत्ता ही छाटणी घेतल्यानंतर येणार्‍या शेंगाच्या गुणवत्तेपेक्षा कमी असते. तसेच लागणार्‍या शेंगा जरा उंचीवर लागतात.

अशी करावी दुसऱ्यां बहाराची छाटणी : शेवगा लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यात पहिला बहार संपून जातो. त्यावेळी आपणाला दुसऱ्या बहाराची छाटणी घ्यावी लागते. जर पाण्याची उपलब्धता असेल तर पहीला बहार संपल्यानंतर लगेच आपण छाटणी घेऊ शकतो. पाणी पुरेसे नसेल जर पाण्याची उपलब्धता होईपर्यंत झाडे न छाटता तशीच ठेवावीत. दुसऱ्यां बहारासाठी आपण जमिनीलगत छाटणी व जमिनीपासून उंचीवर छाटणी अशा दोन प्रकारे छाटणी घेऊ शकतो.

अशी करा जमिनीलगत छाटणी : या प्रकारामध्ये झाडाचे मुख्य खोड जमिनीलगत सहा इंचावर छाटले जाते. या खोडावर येणाऱ्या फुटव्यांपैकी समोरासमोरचे दोन ते तीन फुटवे ठेवून बाकिचे काढून टाकावेत. या फूटव्यांचे शेंडे पुन्हा पहिल्या बहारासारखे दीड, चार व सहा फूट अंतरावर शेंडे खुडून घ्यावेत.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

येत्या 5 दिवसात या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

अशी बनवा परसबागेलाच न्युट्रीशनल गार्डन

लाला मिरचीला विक्रमी दर ; उत्पदकता मात्र ढासळली

कशी करावी जमिनीपासून उंचीवर छाटणी : या पद्धतीमध्ये झाडाच्या मुख्य फांद्या खोडापासून सहा इंचावर छाटून घेतात. पहिल्या वर्षी जर दीड फुटावर शेंडा खुडला असले तर तिथून ज्या फांद्या आल्या आहेत. त्या फक्त सहा इंच ठेवून छाटणी करुन घेतात. या छाटणीमध्ये झाडांना भरपूर फुटवे येतात. येणाऱ्या फुटव्यांची विरहणी न करता फक्त जमिनीलगतचे आडवे पसारणारे फुटवे काढून घ्यावेत या ठेवलेल्या फुटव्यांचे पुन्हा दीड, चार व सहा फूट अंतरावर शेंडे खुडून घ्यावेत.

पहील्या बहारापेक्षा नंतरच्या प्रत्येक छाटणीत झाडांच्या वाढीचा वेग जास्त असतो. त्यामुळे येणार्‍या फुटव्याचे ठरलेल्या अंतरावर शेंडे खुडून घ्यावेत, अन्यथा झाडे अवास्तव वाढतात. छाटणीनंतर झाडे नैसर्गिकरित्या वेगाने वाढत असल्याने झाडांना फुले लागेपर्यत खते व पाणी प्रमाणात द्यावे. अशा प्रकारे प्रत्येक बहार संपल्यानंतर छाटणी घेऊन सात ते दहा वर्षापर्यंत शेवगा पिकाचे उत्पादन घेता येते. शेवगा झाडाच्या वयानुसार उत्तरोत्तर फांद्याची संख्या व येणाऱ्या शेंगाचे उत्पादन वाढत जोते.

सदानंद बनसोडे गुळपोळी, ता. बार्शी, जि. सोलापूर (मोबा. 9503223005)

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 4]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here