शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, तब्बल 15 दिवसापासून दडी मारून बदलेला मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडला तरच वाया जाणार्या खरीपाचे शेतकर्यांच्या डोक्यावरील संकट दूर होणार आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी सांगितल्या प्रमाणे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पावसाने दडी मारल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील खरीप पिके संकटात सापडली होती. त्यामुळे शेतकर्यांना चिंता लागून राहिलेली होती. गेल्यावर्षी चांगला भाव मिळाल्यामुळे यंदा राज्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला आहे. त्याबरोबरच आगातामध्ये मुग, उदीडाचे क्षेत्रही मोठे आहे. ऐन फुलोर्यात आलेल्या पिकांना पावसाची गरज असताना गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसा अभावी यंदाचे खरीप वाया जाते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना हवामान विभागाकडून येणार्या पावसाची आलेली ही बातमी शेतकर्यांना पुलकीत करणारी आहे.

होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश व सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मराठवाड्यातही पाऊस
हवामान विभागानं मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, जालना जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अॅलर्ट
सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अॅलर्ट
हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस
सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा