हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी हे संकेत दिले असून, आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत. हवामान विभागानं पावासची शक्यता वर्तवल्यानं गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, मराठवाड्याच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली असून राज्यातील अनेक भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. आज संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अवकाळीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
गुरुवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १४ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. कोकणात किमान तापमानाचा पारा २२ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात १८.२ अंश सेल्सिअस, तर विदर्भात १६.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. राज्यातील मराठवाडा व विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात कोरड्या हवामानासह काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कमाल तापमानात काही प्रमाणात चढ-उतार असल्याचे दिसून येते. चंद्रपूर येथे कमाल तापमानाची ३९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात ३८.३ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाचा पारा गेला आहे. मध्य महाराष्ट्रात ३८.७ अंश सेल्सिअस, तर कोकणात ३५.६ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे.चक्रीय वाऱ्यांमुळे विदर्भ व छत्तीसगड परिसरांत असलेल्या भूपृष्ठावरील बाष्प ओढून घेतले आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. वाढत्या उकाड्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम राजस्थान, अरबी समुद्र, बंगालची खाडी या दरम्यान निर्माण झालेल्या हलक्या स्वरुपाच्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
कापणीला आलेल्या गहू पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान बदल होणार असल्याने वायरल आजार डोके वर काढू शकतात. त्यामुळे सामान्य जनतेनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी केलं आहे.
शुक्रवार व शनिवारी विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम व बुलढाणा या भागात पावसाचे दाट संकलेत आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये आज सकाळी वातावरणात अचानक बदल झाला. दिल्लीमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिल्लीतील कनॉट परिसरात, नोएडा आणि इतर ठिकाणी पाऊस झाला आहे. दिल्लीमध्ये आज दिवसभर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.