महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, 17 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, जालना, वाशिम आणि वसई विरारमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 104 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 109 मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 371 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड धनसावंगी तालुक्यात रस्त्यावरील पुल जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाशिम जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतता पाणी साचले असून, पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंता वाढली आहे. लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून रात्री पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे काही भागातील नदी-ओढ्यांना पाणी आले आहे.
मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. ते मात्र या पावसामुळे दूर झाले आहे. पाऊस असाच काही काळ टिकूण राहिला तर उगवूण आलेल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे देखील म्हटले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंता वाढली आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा