भात हे उष्ण कटीबंधातील पीक आहे. भात पिकास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान 24 ते 32 अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता 65 टक्के लागते. या पिकास सरासरी 1000 मि. मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. पोयता व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) 5 ते 8 या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते.
महत्त्वाची माहिती : भात उत्पादनातील या आहेत 10 समस्या
खत मात्रा : भात लागवडीसाठी एकरी 40:20:20 किलो नत्र, स्फुरद व पालाश या प्रमाणात खतांच्या मात्रा द्यावी. ही खतमात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले 50 टक्के नत्र लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 40 टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 40 टक्के नत्र आणि 20 टक्के नत्र लागणीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे. संकरित जातींकरिता एकरी 48:20:20 किलो नत्र, स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी. ही खतमात्रा लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले 25 टक्के नत्र लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि उर्वरित 25 टक्के नत्र लागणीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे.
आंतर मशागत : लावणीनंतर 30 ते 45 दिवसांनी कोळपणी करून शेताची खुरपणी करावी. तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब्युटाक्लोर किंवा बेंथीओकार्ब 600 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून लावणीनंतर आठवड्याच्या आत फवारणी करावी.
महत्त्वाची माहिती : असे करा भातावरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन
पाणी व्यवस्थापन : रोपे चांगली मूळ धरेपर्यंत 2 ते 5 सेमी पाणी ठेवावे. लोंब्या येण्यापूर्वी 10 दिवस व लोंब्या आल्यानंतर 10 दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी 10 सेमी ठेवावी. पिकातील दाणे भरेपर्यंत पाण्याची पातळी 5 सेमी ठेवावी. त्यानंतर कापणीपूर्वी 8 ते 10 दिवस शेतातील पाणी काढावे.
पिक संरक्षण : करपा : नियंत्रणासाठी थायरम 3 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बियाणास पेरणीपूर्वी लावावे. शेतामध्ये प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल 7 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
कडा करपा (जीवाणूजन्य) : रोपवाटिकेमध्ये पेरणीपूर्वी स्ट्रेप्टोमायसीनची बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये प्रादुर्भाव दिसून आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक 0.2 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
तुडतुडे : एका चुडावर 4-5 तुडतुडे दिसताच, नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 14 मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड 2.2 मि.लि. किंवा फीप्रोनील 20 मि. लि. किंवा थायामेथोक्झाम 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन : भाताच्या लोंब्यामधील 80 ते 90 टक्के दाणे परिपक्व झालेले दिसताच वैभव विल्याच्या सहाय्याने जमिनीलगत कापणी करावी. कापलेला भात वाळण्यासाठी 1 ते 2 दिवस पसरून ठेवावा व नंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करावी. सुधारित वाणांपासून एकरी 12 ते 18 क्विंटल/ एकर तर संकरीत वाणांपासून 24-28 क्विंटल/ एकर उत्पादन मिळते.
डॉ. दादासाहेब खोगरे विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली (मो. : 9370006598)
फायद्याची गोष्ट : पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1