येत्या काळात हळुहळू वाढत जाणार्या तापमानाचे मोठे आणि धक्कादाय परिणाम सन २०५० पर्यंत शेती उत्पादनावर मोठ्या प्रमाणात दिसू लागतील. डॉ. राहूल तोडमल यांनी पर्यावरण संदर्भात केलेल्या एका अभ्यासानुसार ज्वारीच्या उत्पादनात १८ टक्के तर ऊसाच्या उत्पादनात २२ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर तांदूळ, कापूस आणि बाजारी उत्पादनातही वाढत्या तापमानामुळे घट होईल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.
ज्वारीचे उत्पादन घेणार्या उत्तर सोलापूर, पूर्व उस्मानाबाद, मुळशी, मावळ, राजगुरुनगर, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि मराठवाडा येथे तापमानवाढीने फटका बसून शकेल, असा अंदाज डॉ. तोडमल यांनी ‘स्पिंगर नेचर जर्नल’मधील आपल्या शोधनिबंधात वर्तवला आहे. आत्तापर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये तापमानवाढीचा पिकावर होणारा परिणाम समोर आला असून, त्या अभ्यासाच्या आधारे डॉ. तोडमल यांनी हा अंदाज नोंदवला आहे.

त्यांच्या अभ्यासानुसार सन २०५० पर्यंत १.५ ते २.५ अंशापर्यंत तापमान वाढ झाली तर १८ टक्के ज्वारीचे उत्पादन घटेल. ऊसासारख्या नगदी पिकाच्या बाबतीतही मोठा फटका बसू शकतो. उस्मानाबाद, मुळशी, राजगुरुनगर, सोलापूर, अहमदगनर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, परभणी, हिंगोली येथे १.१५ ते १.६० अंश सेल्सिअस तापमानवाढीने २२ टक्के ऊसाचे उत्पादन कमी होऊ शकते. याचा परिणाम ऊसापासून मिळणार्या पुढील उत्पादनांवर होऊ शकतो. तांदळाच्या पिकावरही १.५ ते २.५ अंश सेल्सिअस तापमानवाढीने उत्तर सातारा, रत्नागिरी, भोर, रायगड, मुळशी-मावळ, राजगुरुनगर येथे परिणाम होईल. १ ते ४ अंश तापमानवाढीने तांदळाचे उत्पादन सुमारे ४९ टक्क्यांपर्यंत खालावू शकते, असे समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कापसाच्या नगदी पिकावरही ०.९ ते १.१५ अंश सेल्सिअस तापमानवाढीने परिणाम होऊ शकतो. बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, औरंगाबाद, जळगाव, बीड, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये कापसाचे पीक घेतले जाते. या जिल्ह्यांमधील पिकावर परिणाम होऊ शकतो. ३.२ अंश सेल्सिअस तापमानवाढीनंतर प्रति हेक्टर 268 किलो कापसाचे उत्पादन घटल्याचे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.

ज्या ठिकाणी ३४ अंशापलीकडे तापमानवाढ नोंदली गेली आहे. तिथे बाजरीचे उत्पादन घटल्याचे स्पट झाले आहे. त्यामुळे सन २०५० पर्यंत १.१५ ते १.६० अंश सेल्सिअस तापमानवाढीने सातारा, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, परभणी, जालना, औरंगाबाद आणि वाशिम या जिल्ह्यांमधील बाजरीच्या पिकाला मोठा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नियंत्रणासाठी प्रयत्नांची गरज
या पार्श्वभूमीवर तापमानवाढ नियंत्रणासाठी शक्य ते प्रयत्न अधिक गांभीर्याने करणे आवश्यक आहेत. तसेच बदलत्या तापमानामध्ये टिकणार्या पीक उत्पादन पद्धतींचा विचार करणेही गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्त्रोत : मटा












Users Today : 17
Users Last 30 days : 770
Users This Month : 95
Users This Year : 807
Total Users : 236256