यावर्षी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. या विभागात अंत्यंत कमी पाऊस पडल्याने जानेवारी महिन्यापासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून उन्हाळ्यात फळबागा वाचवू शकतो.
१. आच्छादनाचा वापर : जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग जमिनीवर आच्छादन करून कमी करता येतो. ही सर्वात सोपी पद्धत आहे. यासाठी फळबागेतील प्रत्येक झाडाजवळ सेंद्रिय पद्धतीने ५ ते ६ सें.मी. जाडीचे उसाचे पाचट, पालापाचोळा, वाळलेले गवत, काडीकचऱ्याचे थर द्यावेत किंवा ८० ते १०० मायक्रोन जाडीची प्लॉस्टीक फिल्म आच्छादनासाठी वापरल्यास अतिशय फायद्याचे ठरते. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होऊन खताच्या खर्चात बचत होते. विशेषत: पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. जमिनीतील ओलावा टिकून राहातो. याशिवाय आच्छादनामुळे मृद संधारण, जमिनीचे तापमान संतुलित राखणे, क्षारांचे प्रमाण कमी करणे, तणांचा बंदोबस्त करणे व मितीची संरचना सुधारणे इत्यादी प्राकारचे विशेष परिणाम दिसून येतात.
आच्छादनाचे फायदेशीर प्रकार : आच्छादनाचे स्टबल आच्छादन, मातीचे आच्छादन, प्लास्टिक आच्छादन, उभे आच्छादन असे अनेक प्रकार आहेत. परंतु प्लास्टिक आच्छदन करण्यामागे अनेकांचा कल दिसून येतो.
स्टबल आच्छादन : वेगवेगळ्या पिकाच्या कापणीनंतर त्यांचे अवशेष त्या ठिकाणी टाकले जातात. त्यांचा उपयोग ‘स्टबलमल्च’ म्हणून होऊ शकतो. गहू किंवा कापूस या पिकांमध्ये अशा प्रकारच्या आच्छानाचा वापर केल्याने जमिनीची धूप कमी होऊन बाष्पीभवनही नियंत्रणात आणता येते.
माती आच्छादन : जर आपण शेतातील जमिनीच्या पृष्ठभाग नांगराच्या किंवा खुरप्याच्या साहय्याने थोडा सैल केला तर सैल झालेल्या मातीचा आच्छादन म्हणून उपयोग होऊ शकतो. उभ्या पिकामध्ये आपण जेव्हा विविध आंतरमशागतीची कामे करीत असतो त्याच वेळी माती आच्छादन म्हणून त्याचा पिकास फायदा होत असतो.
प्लास्टिक आच्छादन : याचा वापर आच्छादन म्हणून करण्याकडे अलिकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. विशेषत: भुईमूग, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, काकडी, कलिंगड, खरबूज अशा पिकांमध्ये ‘प्लास्टिक आच्छादना’चा वापर करून उत्पादन वाढ करणे शक्य झाल्याचे अनेक प्रयोगातून दिसून आले आहे.
उभे आच्छादन : काळ्या जमिनीमध्ये पाणी मुरण्याची शक्यताही कमी असते. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी वाहून जाते. जमिनीची पाणी मुरवण्याची व जमिनीतील पाणीसाठा वाढविण्याची क्षमता वाढविण्यासाठी उभ्या आच्छादनाचा चांगला उपयोग होतो. वरच्यावरी पाणी वाहून जाणाऱ्या जमिनीत लहान लहान चर ठरावीक अंतरावर उताराच्या विरुद्ध दिशेने काढले जातात. या चरामध्ये पेंढा किंवा पिकाचे आवशेष टकले जातात. त्यामुळे या चरामध्ये पाणीसाचून ते जमिनीत मुरते आणि जमिनीत सेंदियकर्ब तयार होऊन त्या जमिनीची पाणी मुरविण्याची क्षमता वाढविता येते.
भाजीपाला पिकात आच्छादनाचा वापर : भाजीपाला पिकात आच्छादनाचा वापर करून चांगले पीक घेता येऊ शकते. हल्ली ही पद्धत वापरली जाते. भाजीपाला पीक लागवडीपूर्वी नेहमीप्रमाणे नांगरणी, कोळपणी करून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. जमीन सपाट झाल्यानंतर वाफे पद्धतीने पारदर्शक पॉलिथिन आच्छादन पसरून घ्यावे. त्यामध्ये भाजीपाला लागवड करताना ठरावीक अंतरावर छिद्रे पाडावीत. त्यामध्ये रोपांची पुर्नलागवड करावी. भाजीपाला पिकासाठी वापरावयाचे पारदर्शक पॉलीथीन ७ मायक्रोन जाडीचे व सर्व साधारण ९० से. मी. रूंदीचे असावे.
आच्छादनाचे फायदे : पॉलिथिन आच्छादनामुळे वेगवेगळ्या पिकानुसार उत्पादनात दुप्पट ते तिप्पट वाढ होते. बाष्पीभवनाद्वारे जमिनीतून होणारा पाण्याचा र्हास कमी होतो व पिकास लागणाऱ्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भागवली जाते. तणांची वाढ रोखली जाते. तणांचीवाढ मर्यादित ठेवता येते. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मोठा उपयोग होतो. मृद व जलसंधारण होऊन पाणी जिरवण्याची क्षमता वाढते.
२. हलकी छाटणी करणे : झाडाच्या पानातील पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी झाडावरील पानांची संख्या कमी असणे गणजेचे असते. त्यासाठी फळ झाडाची हालकी छाटणी करावी.
३. बाष्परोधकांचा वापर : या पद्धतीमध्ये पानाचे पर्णरंध्रे बंद करणारे बाष्परोधक किंवा सूर्य किरणे परावर्तीत करणारे बाष्परोधक शेतकऱ्यांनी फळपिकामध्ये पर्णोत्सर्जन कमी करण्यासाठी वापरावे. त्यासाठी केओलीन पर्णरंधे बंद करणारे बाष्परोधकांचे सहाशे ते आठशे ग्रॅम १० लिटर पाण्यात द्रावण तयार करून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
४. वारारोधकाची उभारणी : वाऱ्यामुळे जमिनीतील बाष्पीभवन आणि झाडाच्या पानातील पाण्याचे उत्सर्जन जास्त होत असते. त्यामुळे बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशांना वारारोधक झाडांची लागवड करावी. उदा. शेवगा, सुरू, जांभुळ, करवंद इत्यादी झाडे लावावीत.
५. मडका सिंचन : पाण्याचे फारच दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग आपल्या बागा जिवंत ठेवण्यासाठी करावा. झाडाच्या वयानुसार मडकी वापरावीत. लहान फळझाडांच्या व कमी वयाच्या झाडांसाठी 5 लिटर क्षमतेची तर जास्त वय व मोठ्या झाडांसाठी 15 लिटर क्षमतेची मडकी वापरावीत. भर दुपारी झाडाखाली पडणाऱ्या सावलीवरून झाडाचे सावली क्षेत्र निश्चित करून दोन ते चार मडकी प्रति झाड ठेवावे. दर पंधरा दिवसाला मडक्यांची जागा बदलावी. निवडलेल्या मडक्याच्या तळाशी लहान छिद्रे पाडून त्यात कापडाची चिंधी बसवून सवली क्षेत्राच्या परिघावर ठेवावे व पाणी भरून झाकण ठेवावे.
६. सलाईन बाटल्यांचा वापर : सलाईनची बाटली पाण्याने भरून झाडाच्या फांदीला टांगावी व तिची नळी झाडाच्या थेट मुळाजवळ जमिनीत ठेवावी. सलाईनच्या नळीतील प्रवाह कमी जास्त करता येतो.
७. ठिबक सिंचन : फळबागांसाठी शक्यतो ठिबक सिंचन वापरावे. त्यामुळे ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये देता येतात. प्रत्येक झाडाखाली दोन ड्रीपर ठिबक नळीवर बसवावे. ड्रीपरमधून पडणारे पाणी झाडाच्या बुंध्यावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
थोडक्यात म्हणजे, मोजक्या पाण्यात जास्त उत्पादन, रासायनिक खतांची बचत, मजुरी खर्चात बचत, जमिनीचा कार्यक्षम वापर, तणनियंत्रण आदीमुळे दर्जेदार आणि उच्चत्तम उत्पादन मिळते. ठिबक सिंचनासाठी शासनाने अनुदन देऊ केले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, ही काळाची गरज आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी ठिबस सिंचनाचा फार मोठा हातभार लागणार आहे.
ठिबक सिंचनाचे फायदे : उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. ठिबकने ३० ते ८० टक्के पाण्याची बचत होते. पाणी साचून राहत नाही. चढ-उताराची जमीन सपाट न करता ठिबक सिंचनाद्वारे लागावडीखाली आणता येते. जमिनीची धूप थांबते. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन उपयुक्त आणि आवश्यक आहे. ठिबकद्वारे द्रवरुप खते देता येतात व ती पिकांना सम प्रमाणात मिळतात.
इतर उपाययोजना : फळ झाडासाठी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी अजून काही पूरक उपाययोजना आहेत. त्यामध्ये झाडाच्या बुंध्याला बोर्डोपेस्ट लावावी. प्रखर उन्हामुळे झाडाच्या खोडाना सौरजळीपासून वाचविण्यासाठी खोडावर गवत किंवा गोणपाट बांधावे. फळांची विरळणी केल्यासही कमी पाण्यात उत्तम दर्जाची फळे घेता येतात.
प्रा. संजय बाबासाहेब बडे, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. मोबा. ७७८८८२९७८५९