ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशा भावना सर्वच स्तरातून उमटल्या.
प्रकृती अस्वास्थामुळे अकरा जानेवारीपासून कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ. अशोक भूपाळी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी वयाच्या ब्यानव्या वर्षाही त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.
अॅपल सरस्वतीचे डॉक्टरांनी एनडी पाटील यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपाचार सुरु होता. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता. ११ जानेवारीला त्यांना बोलण्यात अडथळा येत होता. तेव्हा रुग्णालयात सिटी स्कॅन केल्यानंतर वैद्यकीय उपचार कऱण्याचा निर्णय घेतला. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती.
एनडी पाटील यांच्यावर उपचार सुरु असताना 14 तारखेला त्यांचा रक्तदाब कमी व्हायला लागला. त्यानंतर त्यांची शुद्धही हरपायला लागली. त्यांना पुढचे वैद्यकीय उपचार न करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना व्हेटिलेटर किंवा डायलिसिस करण्यात आलं नाही. आज सोमवारी सकाळी ते पूर्ण बेशुद्ध झाले आणि रक्तदाब कमी झाला. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सांगलीत एका सामान्य शेतकरी कुटुंबात 15 जुले रोजी एनडी पाटील यांचा जन्म झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. पुढे 1954 ते 1957 या कालावधीत त्यांना साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. तसंच कमवा व शिका योजनेचे प्रमुख आणि रेक्टर म्हणून ते कार्यरत होते.
1948 मध्ये त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1957 ला ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही कार्यरत होते. तसंच 1960 ते 1982 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. यात 1978 ते 1980 या कालावधीत सहकारमंत्रीही होते. 1985 ते 1990 या काळात ते कोल्हापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.
एनडी पाटील यांचे ‘रयत‘साठीचे योगदान कधीच पुसलं न जाणारं : शरद पवार
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. एनडी पाटील यांचे ‘रयत’साठीचे योगदान कधीच पुसलं न जाणारे आहे. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मिडीयाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
खालील स्टार क्लिक करून रेटींग करा