दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात 2015 – 2019 या काळातील महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना आता पुन्हा एकदा राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही आवडती योजना असून, राज्यातील सुमारे 5000 गावांचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही आवडती असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला महाविकास आघाडी सरकारकडून मुदतवाढ मिळाली नव्हती. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भूजलस्तर वाढवण्याच्या उद्देशाने या योजनेला पुन्हा गती देतानाच निर्णय घेण्यात आला आहे. आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात 2015 – 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी 22 हजार 523 गावांत अभियान राबविण्यात आले व यामध्ये सहा लाख 32 हजार 896 कामे पूर्ण झाली होती, तसेच 20 हजार 544 गावे जलपरिपूर्ण झाली होती. या कामांमुळे 27 लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली, त्यात 39 लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. तसेच कृषीचे विशेषत: रब्बीतील उत्पादनही वाढल्याचे सांगण्यात येते.

आता नव्याने सुरू होणाऱ्या या अभियानात येत्या तीन वर्षांत सुमारे 5 हजार गावे नव्याने समाविष्ट केली जाणार आहेत. तसेच प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये पहिला टप्पा राबविला गेला आहे; पण पाण्याची गरज आहे, तेथेही लोकसहभागातून कामे करण्यात येणार आहे. या अभियानासाठी जलयुक्त शिवारचा पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावे निवडण्यात येणार आहेत. गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहणार आहे. विशेषत: मराठवाड्यातील 800 गावांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे.
याच्या संनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली; तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असणार असून, कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी तीन लाखांपेक्षा जास्त किमतीचे काम ई-निविदेमार्फत करण्यात येणार आहे. सर्व मृद व जलसंधारण कामाचे मॅपिंग करून नकाशे अद्ययावत करून जिओ पोर्टलवर टाकण्यात येणार आहेत.
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇