चिंच हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कोरडवाहू फळपीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली जवळ-जवळ 14, 500 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापासून 2660 टन चिंच उत्पादन झाले. एकूण निर्यात होणार्या मसाल्याच्या पिकापैकी चिंचेचा सहावा क्रमांक लागतो. चिंचेच्या फळाला उत्तम भाव मिळत असल्यामुळे हे कोरडवाहू क्षेत्रातील नगदी पीक म्हणून संबोधले जाते.
भारतातील चिंच विविध रूपाने, प्रामुख्याने कॅनडा, स्वित्झरलँड, ग्रेड ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स इत्यादी प्रगतशील देशांमध्ये पाठविली जाते. जवळपास 52 देशांमध्ये भारतातील चिंच निर्यात होत असल्याने निदर्शनास येते. चिंच विविध रूपाने निर्यात केली जाते. त्यामध्ये अखंड चिंच, फोडलेली चिंच, गाभा, गर, बियांची पावडर ओलिओरेझीन घटक यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
चिंचेला आपल्या आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचेचे फळ म्हणजे न उकरणारी शेंग, चिंचेचा वाकडा आकार, फुगीरपणा मध्ये आकसलेला भाग पिकल्यावर तांबूस रंगाचा होतो. चिंच गुळाची आमटी, चिंचेचा सार, चिंचेची चटणी, चिंचेच्या गराचे सरबत नित्योपयोगात आणतात. औषधी म्हणून जुना चिंचगर चांगला समजला जातो. औषधी गुणांमुळे चिंचेला अरब लोक भारतीय खजूर असे म्हणतात.
ग्रामीण भागात चिंचेच्या कोवळ्या फांद्या शेळ्यांना चारा म्हणून देतात. चिंचेचा गर काढून चिंचेच्या बियांचा उपयोग घोगड्यांना खळ करण्यासाठी होतो. चिंचेचे लाकुड बैलगाडीची चाके, तेल घाण्याच्या उखळी तयार करण्यासाठी करतात. दक्षिण भारतात आहारात चिंच दररोज वापरली जाते. प्रक्रिया उद्योगात आवळ्या इतकीच चिंच सुध्दा उपयुक्त आहे. पिकलेल्या चिंचा व त्यातील चिंचोके काढून चिंचेचा गर मीठ लावून सुकवून कित्येक महिने साठवून ठेवता येतो. म्हैसूर येथे सेंट्रल फुड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्सटिट्यूटने चिंचेच्या रसाचे घट्ट द्रावण टिकवून ठेवण्याची प्रक्रिया प्रमाणित केलेली आहे. त्यावर आधारित उद्योग निघालेले आहेत. चिंचोका पीठ बार्शीच्या मिल्समधून जगभर निर्यात होते. चिंचेचा सॉस हा कोपरगावचे अंजली फुड प्रॉडक्ट मधून कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व गुजरातमध्ये पाठवला जातो. अहमदनगरचे चिंचगर हा प्रक्रिया पदार्थ निर्यात होतो.
चिंचेच्या वाळलेल्या गरामध्ये 7.2 टक्के पोटॅसिक बाय टाटरिट, 9.1 टक्के चिंच अम्ल आणि 2.2 टक्के लिंब आम्ल तसेच अल्प प्रमाणात मॅलीक आम्ल असते. चिंचेच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पाणी 21, कर्बयुक्त पदार्थ 67.4 टक्के, प्रथिने 3.8 टक्के, मेद 0.1 टक्के खनिजे 3.0 टक्के, तंतूमय पदार्थ 5.6 टक्के, कॅल्शियम 0.2 टक्के, स्फुरद 0.1 टक्के निगडीत फलोत्पादन विकासाच्या अंतर्गत या पिकाची लागवड झालेली आहे आणि अजूनही लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.

हवामान व जमीन : चिंचेचे झाड हे कोणत्याही प्रकारच्या हवामानात चांगले वाढते. भरपूर पाऊस पडणार्या दुष्काळी भागात चिंचेची झाडे वाढतात. चिंचेच्या झाडाला ठराविक प्रकारच्या आवश्यकता नसते. अत्यंत हलक्या जमिनीत, माळरानामध्ये, डोंगर उतारावर, मध्यम काळ्या, भारी काळ्या आणि पोयट्याच्या जमिनीत चिंचेची झाडे चांगली वाढून भरपूर उत्पादन देतात.
अधिक सामू असलेल्या जमिनी व क्षारयुक्त जमिनीत सुद्धा चिंचेचे झाड चांगल्या प्रकारे येऊ शकते. परंतू अशा जमिनीत सुरूवातीच्या काळात झाडे जगविणे कठीण असते म्हणून अशा प्रकारच्या निकृष्ट जमिनीत एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदून ते माती मिश्रणाने व्यवस्थित भरावे व नंतरच रोपे किंवा कलमा लावाव्यात. एकदा झाडे जगली नंतरच्या काळात अशा जमिनीचा त्याच्या वाढीवर फरक पडत नाही म्हणून अशा प्रकारच्या निकृष्ट जमिनीत चिंच हे लागवडीयोग्य फळपिक आहे.
जाती : अकोला स्मृति, चिंच प्रतिष्ठान, नंबर-263, योगेश्वरी, जगदीश, उदीग्राम, धारवाड चिंच.
अभिवृद्धी : चिंचेची मृदकाष्ठ पद्धतीने अभिवृद्धी केल्यास यशस्वीतेचे प्रमाण अधिक आहे. या पद्धतीमध्ये पॉलिथीन पिशवीमध्ये रोपे तयार करून आठ ते दहा महिने वयाच्या रोपावर मार्चमध्ये मृदकाष्ठ कलम पद्धतीने कलमीकरण करावे. यामध्ये यशस्वीतेचे प्रमाण 80 ते 90 टक्के आहे.
लागवड व्यवस्थापन : चिंचेची लागवड करताना दोन झाडामधील अंतर 10 मीटर आणि दोन ओळीतील अंतर 10 मीटर ठेवावे. उन्हाळ्यात एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे तयार करून ठेवावेत. पावसाळ्याच्या आधी खड्डे भरताना तळाशी 10 ते 15 सेमी उंचीपर्यंत पालापाचोळा टाकावा. नंतर चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. मातीत 100 ग्रॅम लिंडेन पावडर मिसळावी. रोपांची अथवा कलमांची लागवड एक दोन पाऊस पडल्यावर करावी त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत-जास्त पावसाचे पाणी व पावसाळी दमट हवामानाचा झाडाच्या वाढीसाठी भरपूर फायदा होतो. झाडांची मर कमी होते आणि झाडांची वाढ जोमाने होते. जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात प्रत्येक झाडाभोवती आळ्यात लिंडेन पावडर टाकावी आणि त्यावर किमान 20 ते 30 सेमी जाडीचा वाळलेल्या गवताचा, पालापाचोळा, उसाच्या पाचटाचा, लाकडाच्या भुशाचा किंवा काडांच्या थर देऊन आच्छादन करावे.
वळण आणि छाटणी : चिंचेच्या झाडाला सुरूवातीला वळण देण्यासाठी झाड तीन फुट उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा मारावा आणि त्यानंतर चारही दिशांना विखुरलेल्या चार फांद्या राहतील अशा ठेवाव्यात. चिंचेचे झाड वाढत असताना त्याची हलकी छाटणी केल्यास झाडाची वाढ चांगली होते. चिंचेच्या झाडावर येणार्या आडव्या फांद्या आणि खुंटावरील फुटवे काढत राहावे. दरवर्षी चिंचेची फळे काढून झाल्यावर झाडाच्या वाळलेल्या फांद्या कापून काढाव्यात.
आंतरमशागत : चिंचेची लागवड 10 बाय 10 मीटर अंतरावर केली जाते, चिंच हे हळूहळू वाढणारे फळझाड असल्यामुळे चिंचेची लागवड केल्यानंतर त्यामध्ये इतर आंतरपिके घ्यावीत. सुरूवातीच्या काळात मूग, उडीद, भुईमूग, भाजीपाला पिके घ्यावीत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडांचे आळे कुदळीने खोदून घ्यावीत व झाडांना खते द्यावीत. झाडाच्या आळ्यातील गवत वरचेवर खुरपून आळे स्वच्छ व तणविरहीत ठेवावे.
खत व्यवस्थापन : चिंचेच्या झाडाची लागवडीनंतर जोमदार वाढ होऊन ती लवकरात-लवकर फळावर यावीत यासाठी त्यांना शेणखत व रासायनिक खते द्यावीत. रोपे किंवा कलमे एक वर्षाची झाल्यानंतर खते देण्यास सुरूवात करावी. पूर्ण शेणखत पावसाळ्याच्या सुरूवातीला तर पूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धा नत्र पाऊस पडताच व उरलेला अर्धा नत्र पावसाचा अंदाज पाहून ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये द्यावा.
पाणी व्यवस्थापन : पहिल्या दोन वर्षात उन्हाळ्यात झाडाभोवती आच्छादन करावे आणि प्रत्येक झाडाला दर दहा दिवसांनी 10 ते 15 लिटर पाणी द्यावे. झाडे मोठी झाल्यावर शक्य असल्यास झाडे फुलावर असताना आणि फळे लागल्यानंतर पाणी दिल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
काढणी आणि उत्पादन : चिंचेच्या झाडाची वाढ अतिशय सावकाश होते. बियांपासून रोपे तयार करून लागवड केल्यास झाडांना लागवडीनंतर 10 ते 12 वर्षांनी फळे येतात. मात्र कलमाद्वारे लागवडीपासून झाडांना सात ते आठ वर्षात फळधारणा होते झाडांना जून ते जुलै महिन्यात फुलोरा येतो आणि मार्च ते एप्रिल महिन्यात फळे काढणीला तयार होतात. चिंचा पिकण्यास सुरूवात झाल्यावर टरफलचा हिरवा रंग जाऊन तपकिरी रंग येतो. पिकलेल्या चिंचेची साल पूर्णपणे वाळून गरापासून वेगळी होते. चिंचेच्या पूर्णपणे वाढ झालेल्या झाडांपासून जातीपरत्त्वे कमी अधिक उत्पन्न मिळते. सरासरी प्रति झाड 1.5 ते 2.0 क्विंटल चिंचा मिळतात. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवावी.
डॉ. शंशाक भराड उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.