हुलगा हे कोरड्या, हलक्या जमिनीत येणारे व जास्त उत्पादन देणारे बहुगुणी शुष्क कडधान्य आहे. हे पीक कमी पाण्यावर व कमी व्यवस्थापनेत येत असल्याने याचा लागवड खर्चही कमी आहे. खाद्यान्न उद्योगात प्रामुख्याने याचा स्वस्त प्रथिनांचा स्त्रोत म्हणून वापर होतो. हुलगा या कडधान्यात प्रथिने, कर्बोदके, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व तंतुमय घटक हे भरपूर प्रमाणात आढळतात. जुलैमध्यावर याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
औषधी उपयोग : आयुर्वेदानुसार हुलगा हा बर्याच विकारावर फायदेशीर ठरू शकतो. आयुर्वेदानुसार हुलगा हा स्त्रियांच्या मासिक पाळीतील त्रास कमी करतो. पोटांचे विकार, ताप, सर्दी, खोकला इत्यादी विकार दूर करतो. हुलगा हा मुतखडा रोग बरा करू शकतो. काही प्रयोगात असे दिसून आले आहे की, हुलग्याच्या सेवनाने मुतखडे विरघळण्यास मदत होते. हुलग्याची पावडर पाण्यात मिसळून घेतल्यास गॅसेसचा त्रास तसेच मलबद्धता कमी होण्यासही मदत होते.
जमीन व हवामान : पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात विशेषत: नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली आणि जळगाव या जिल्ह्यातील डोंगर उताराच्या आणि माळरानांच्या हलक्या जमिनीवर खरीप हंगामात हे पीक घेतले जाते. तसेच कोकण आणि विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी भातानंतर भात खाचरात शिल्लक असलेल्या ओलाव्यावर रब्बी हंगामात हे पीक घेतले जाते.
पूर्वमशागत : खरीप हंगामात पावसाळा सुरू होताच जून महिन्यात दुचाडी पाभरीने पेरणी करावी. तथापि १५ ते २० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास जूनच्या तिसर्या आठवड्यात धुळ पेरणी करावी. कडधान्य प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे घेण्यात आलेल्या प्रयोगावरून असे दिसून आले की, जूनच्या तिसर्या आठवड्यात धुळ पेरणी केल्यास हेक्टरी सरासरी सहा क्विंटल उत्पादन मिळते. तर भरपूर पाऊस पडल्यानंतर जुलैच्या दुसर्या पंधरवाड्यात पेरणी केल्यास पाच क्विंटल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेरलेल्या पिकापासून चार क्विंटल उत्पादन मिळते. खरिपात दोन फळांतील ३० सें.मी. अंतर असलेल्या दुचाडी पाभरीने पेरणी करावी. रबी हंगामात आक्टोबर, नोव्हेंबरमध्ये विशेषत: मशागत न करता भात कापणीनंतर लागलीच नांगरामागे पेरणी करावी. म्हणजे जमिनीतील ओलाव्याचा पिकाच्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी उपयोग होईल. खरीपात हेक्टरी १५ किलो तर रबी हंगामात नांगराच्या तासामध्ये पेरणीसाठी हेक्टरी ३० किलो बियाणे पेरावे. खरीपात हे पीक बाजरीमध्ये २:१ या प्रमाणात आंतरपीक म्हणूनही पेरले जाते.
खते : हे पीक मुख्यत: हलक्या जमिनीत घेत असल्याने त्यास पेरणीच्या वेळी हेक्टरी १० ते १५ किलो नत्र आणि २० ते ३० किलो स्फुरद दिल्याने उत्पादन वाढण्यास मदत होते.
आंतरमशागत : पीक ३० दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. धुळ पेरणी केलेली असल्यास कोळपणी आणि खुरपणी आवश्यक आहे.
सुधारित वाण : कृषी संशोधन केंद्र, सोलापूर येथून सीना आणि माण हे दोन वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आले आहेत. सीना या वाणाचे पीक १२० ते १२५ दिवसात तयार होत असून, त्याच्या दाण्यांचा रंग भुरकट पांढरा आहे. त्यापासून हेक्टरी ७५० ते ८०० किलो उत्पादन मिळते. माण हा लाल दाण्याचा वाण १०० ते १०५ दिवसात तयार होतो. त्यापासून हेक्टरी ६५० ते ७०० किलो उत्पादन मिळते.
पीक संरक्षण : या पिकावर फुलकिडे, पाने खाणारी अळी व पीक फुलोर्यात असताना शेंगा पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव होतो. त्यासाठी हेक्टरी १० टक्के बी.एच्.सी. भुकटी १५ किलो अधिक कार्बारील भुकटी पाच किलो एकत्र मिसळून किंवा १.५ टक्के क्विनॉलफॉस भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणावर धुरळावी.
केवडा : केवडा किंवा मोझॅक हा रोग अतिसुक्ष्म विषाणूंपासून होतो. रोगग्रस्त पानावर वेगवेगळ्या आकाराचे पिवळे चट्टे पडतात. पानांचा आकार लहान होऊन पाने पूर्णपणे पिवळी पडतात व गळून जातात. पांढरी माशी या किटकाद्वारे रोगाचा फैलाव होतो. केवडाग्रस्त झाडे शेतात विखुरलेली दिसतात व सहज नजरेत भरतात. अन्नग्रहणार्या प्रक्रियेत बाधा आल्यामुळे फुलोरा, शेंगा तसेच पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या रोगापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची लागवड करणे फायदेशीर ठरते.
मर : रोपे लहान असताना अचानक कोमेजून जातात व मरतात. रोपांची मुळे कुजत नाहीत. पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यानंतर मर रोग दिसू लागतो. रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी.
सी. के. भोकरे, डॉ. ए. बी. रोडगे, बी. बी. जोशी, अखिल भारतीय शुष्क कडधान्य संशोधन प्रकल्प, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा