सोयाबीन (ग्लायसीन मॅक्स एल. मिरील) हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक म्हणून प्रसिद्धीस येत आहे. या पिकाने ग्रामीण अर्थव्यस्थेमध्ये क्रांती करून शेतकर्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तरात सुधारणा केली आहे. योग्य नियोजन केल्यास सोयाबिनचे चांगले उत्पादन काढता येते. त्यासाठी शेतकर्यांनी सोयाबीन लागवडीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
सोयाबीन हे ऊस, कापूस, तूर, ज्वारी व इतर फळबागेत अंतर पीक म्हणून तसेच फेरपालटीचे पीक व बेवड म्हणून ही महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास फारच मदत होते. सोयाबीन पेंडीचा वापर दुभत्या जनावरांना व कुक्कुटपालनासाठी पौष्टीक आहार म्हणून केला जातो. सोयाबीनचा वापर औषध निर्मितीसाठी तसेच पेनीसीलीन, स्ट्रेप्टोसायक्लीन, टेट्रासायक्लीन, एरिथ्रोमायसीन यासारखी प्रतिजैविक तयार करण्यासाठी करतात. सोयाबीन पासून निरनिराळे पदार्थ बनवता येतात. सध्या उत्पादीत होणार्या सोयाबीन पैकी जवळ जवळ ८० टक्के सोयाबीन तेल तयार करण्यासाठी कारखान्याकडे पाठविले जाते. दहा टक्के सोयाबीन बियाणे म्हणून साठविले जाते.
सोयाबीन अल्प उत्पादकतेची कारणे : सोयाबीन हे पीक खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणूनच घेतले जाते आणि पावसाच्या अनिश्चितेला बळी पडते. शेतकर्यामध्ये पीक, वाण आणि कृषी रसायनाच्या विविधकरणाचा असलेला अभाव. उत्तम दर्जाच्या व पुरेशा प्रमाणात बियाणांची आणि कृषि निविष्ठांची अनुपलब्धता. जैविक आणि अजैविक ताणास सहनशील अशा व्यवस्थापनाची आणि प्रतिरोधित वाणाची अनुपलब्धता. मार्यदित यांत्रिकीकरण आणि सीमांत लहान शेतकर्यांच्या शेतीमध्ये त्याचा अपर्याप्त वापर. तंत्रज्ञानाचे प्रभावहिन हस्तांतरण आणि लहान शेतकर्याद्वारे शिफारस केेलेल्या उत्पादन तंत्राचा कमी प्रमाणावर वापर. पशु खाद्य आणि खाद्य पदार्थात सोयाबीनचा उपयोग करण्याच्या प्रयत्नाचा अभाव. गैरपरंपरागत पण क्षमता असलेल्या क्षेत्रात सोयाबीन घेण्याचा अभाव. सायोबीन उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणात खाजगी क्षेत्राचा अतिशय नगण्य सहभाग. हवामान, विविध किडी व रोग आक्रमण आणि बाजार पुर्वानुमान तंत्रज्ञानाचा अभाव. शासनाद्वारे घोषीत होणारी आधारभूत किंमत आणि वाढता उत्पादन खर्च यामध्ये असलेले अंतर. जमिनीत सुक्ष्म अन्नदव्यांची दिवसेंदिवस होणारी कमतरता. अशा अनेक कारणांमुळे सोयाबीनचे अल्प उत्पादन येत आहे.
हवामान : समशोतोष्ण हवामान, निश्चित योग्य पर्यन्यमान (७०० ते १००० मि. मि.) आहे. अशा भागात पीक चांगले येते. हे पीक जास्त उष्ण व जास्त थंड हवामानास संवेदनशील असल्यामुळे या पिकाची लागवड कोकण विभाग सोडून सर्व भागात खरीप हंगामात करणे योग्य आहे.
जमीन : मध्यम ते भारी पण पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य आहे. अत्यंत हलक्या जमिनीत या पिकाचे उत्पादन कमी येते.
पूर्वमशागत : पूर्वीच्या पिकाच्या काढणीनंतर एक नांगरणी आणि दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी.
पेरणीची वेळ : मान्सुनचा चांगला पाऊस (७५ ते १०० मि. मि.) झाल्यानंतर वापसा येताच पेरणी करावी. उशिरा पेरणी १५ जूलैपर्यंत करण्यास हरकत नाही. यापेक्षा उशीर झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता असते. पाण्याची सोय असल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी.
बीज प्रक्रिया : ३.० ग्रॅम बाविस्टीन किंवा ४.५ ग्रॅम थायरम प्रति किलो ग्रॅम बियाण्यास व राझोबियम जिवाणु खत २५० ग्रॅम प्रति १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
बियाण्याचे प्रमाण : हेक्टरी ७० ते ७५ किलो बियाणे वापरून हेक्टरी झाडाची संख्या ४.४ ते ४.५ लाखांपर्यंत ठेवावी. (एकरी ३० किलो बियाणे वापरून झांडाची संख्या १.७ ते २.० लाख ठेवावी.)
सुधारीत वाण : मराठवाड्यासाठी एमएयुएस ७१, एमएयुएस ८१, एमएयुएस १५८, एमएयुएस ४७, एमएयुएस ६१, एमएयुएस ६१-२ आणि जेएस ३३५. विदर्भासाठी टिएएमएस ३७, टिएएमएस ९८-२१, एमएयुएस ८१ आणि जेएस ३३५ आणि पश्चीम महाराष्ट्रासाठी डिएस २२८ (फुले कल्याणी) एमएसीएस ५८, एमएसीएस ४५० आणि जेएस ३३५ जेएस ९३-०५ या वाणांचा वापर करावा.
ओळीतील अंतर व पद्धत : दोन ओळीतील अंतर ४५ सें. मी. आणि रोपातील अंतर सें. मी. ठेवून पेरणी पाभरीने २.५ ते ३.५ सें. मी. खोलीपर्यंतच करावी. जास्त खोल पेरणी करु नये. नसता उगवण कमी होवून रोपांची संख्या घटण्याची शक्यता असते.
शेणखाची मात्रा : शेवटच्या वखराच्या पाळीच्या पूर्वी २० गाड्या शेणखत जमिनीत पसरून द्यावे.
रासायनिक खते : ३० किलो नत्र व ६० किलो स्फुरद प्रति हेक्टरी (एकरी १२ किलो नत्र व २४ किलो स्फुरद) पेरणीच्या वेळेस द्यावे. स्फुरद हा सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून द्यावा, म्हणजे गंधकाची कमतरता भासणार नाही. ज्या जमिनीत पालाशचे प्रमाण कमी आहे, तेथे हेक्टरी ३० किलो (एकरी १२ किलो) पालाश देणे आवश्यक आहे.
आंतरमशागत : पेरणीनंतर २० ते २५ आणि ३० ते ४५ दिवसाचे पीक असतांना दोन कोळपण्या करून शेत तणविरहित ठेवावे. तसेच मजूरांची कमतरता असल्यास तणनाशकांचा वापर उपयोगी ठरतो. यामध्ये पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडामिथॅलीन ३० ई. सी. २.५ ते ३.३ लिटर प्रति हेक्टर एक हजार लिटर पाण्यातून फवारवे किंवा पेरणीनंतर १५ ते २० दिवसांच्या आतराने तणे दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना इमॅझिथापीर १० एस. एल. ७५० ते एक हजार मि.ली. प्रति हेक्टर ५०० ते ६०० लिटर पाण्यातून फवारवे.
संजीवकाचा वापर : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी सायकोसीन ५०० पी.पी.एम. ची फवारणी फुले लागण्याच्या अवस्थेत करावी.
आंतर पीक पद्धती : जिरायत संकरीत कापसात सोयाबीन १:१ किंवा २:१ या प्रमाणात द्यावे. सोयाबीन आणि तूर आंतरपीक पद्धतीमध्ये २:१ किंवा ४:२ हे प्रमाण फायदेशीर आहे. सोयाबीन आधारित दुबार पिक पद्धतीत रब्बी किंवा करडई ही पीक पद्धती ओलिताखाली फायदेशीर आढळून आलेली आहे.
पाण्याचे नियोजन : सोयाबीन पिकाची फुलोर्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत २० ते २५ दिवसाची पावसाची उघडीप झाल्यास पिकास पाणी देणे आवश्यक आहे. ओलीताची सोय उपलब्ध असल्यास पिक फुलोर्यावर असताना व दाणे भरत असताना पाणी दिल्यास उत्पादनात भर पडते.
उत्पादन वाढीसाठी : आपल्या भागासाठी शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. धुळ पेरणी करु नये. वेळेवर (१५ जुलै पर्यंत) पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम बिज प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणू संवर्धक लावावे. बियाणे चार सें. मी. पेक्षा खोल पेरु नये. उताराला आडवी पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती तपासून घ्यावी. सोयाबीनचे बियाणे स्वत:च्या शेतात तयार करावे. जेणे करून खर्चामध्ये बचत होते तसेच दर्जेदार बियाणे हमखास मिळते. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल (चोपण जमीनी) अशा जमिनीत जिप्सम पाच क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशामतीच्या वेळी मिसळून द्यावे. पीक फुलोरावस्थेत असतांना कोळपणी (डवरणी) मुळीच करू नये. पिकाची कापणी शारीरीक पक्वता आल्यावर वेळेवर करावी. मळणी करतांना मळणी यंत्राच्या ड्रमची गती ३०० ते ४०० फेरे (आरपीएम) प्रती मिनीट यापेक्षा जास्त नसावी.
डॉ. के.एस. बेग, एस. बी. बोरगावकर, अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्प, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा