जून महिना अर्ध्यावर आला तरी मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलास देणारी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शनिवारी (दि. 17) तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चिंताजनक : राज्यात केवळ 5.5 मिमी पावसाची नोंद
मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी उद्या वादळी वारा, मेघगर्जना व विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि. मी. राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
तसेच मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात तफावत जाणवणार नाही. मराठवाड्यात 16 ते 22 जून या कालावधी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची घाई करु नये, असा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिला आहे.
ब्रेकिंग न्यूज : मान्सून जैसे थे ; बिपरजॉयचा धिंगाणा
मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाला सुरुवात होते. मात्र यंदा जून महिना अर्ध्यावर आला तरी अवकाळी पाऊसही झाला नाही. त्यानंतर 7 जून उलटून देखील मान्सून आला नाही. यंदा लांबलेल्या मान्सूनची मराठवाड्यातील शेतकरी वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे पाऊस पडताच पेरण्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात काही भागात दोन दिवसांपूर्वी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. या अपुऱ्या पावसावरच काही शेतकऱ्यांनी पेरणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या अशी कोणतीही घाई करु नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहेत. सोबतच योग्य व पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात असे आवाहनही केले आहे.
ब्रेकिंग : यंदा खरीप पेरण्या लांबणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03