सध्या महाराष्ट्रात अहमदनगर, बीड, जालना, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओलिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमुग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
उन्हाळी हंगामात हे पीक घेण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे : उन्हाळ्यात दुभत्या जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न सोडविला जातो. भुईमुगाच्या तुलनेत बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते. उन्हाळ्यात पिकास भरपूर सुर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी व किड-रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य व चारा उत्पादन जास्त मिळते.
बाजरीचे आहारातील महत्व : आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्वाचे तृणधान्य आहे. बाजरीमध्ये असणारे पौष्टीक घटकांचा विचार करता प्रती 100 ग्रॅम धान्य यात 360 किलो कॅलरी एवढी ऊर्जा देणारे एकमेव धान्य आहे. बाजरी धान्यामध्ये प्रथीने 10.6% पिष्टमय पदार्थ 71.6% स्निग्ध पदार्थ 5% व तंतुमय पदार्थ 1.3% असतात. तसेच विविध प्रकारचे खनिज पदार्थ धान्यामध्ये आढळुन येतात उदा. लोह, जस्त, कॅल्शिअम इ. लहान मुले व गर्भवती महिलांसाठी या धान्याचे आहारात खुप महत्व आहे.
जमिनीची निवड व पेरणीची वेळ : उन्हाळी बाजरी पिकास जमीन ही भारी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. या पिकाची पेरणी ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत करावी. पेरणी 15 फेब्रुवारीनंतर केल्यास परागी भवणावर अतिउष्ण हवामानाचा अनिष्ट परिणाम होतो. तसेच दाणे हे कमी प्रमाणात भरुन उत्पादनात घट होते.
पेरणी पद्धत व पेरणीचे अंतर : पेरणीपूर्वी शेत ओलावून वापसा आल्यावर पेरणी करावी. जमीनीच्या उतारानुसार 5 ते 7 मीटर लांबीचे व 3 ते 4 मीटर रुंदीचे सपाट वाफे करावेत. पेरणीच्यावेळी खते व बियाणे एकाचवेळी पेरता येतात त्यासाठी दोन चाड्याची पाभर वापरावी. पेरणी 2 ते 3 से.मी. जास्त खोलीवर करु नये. दोन ओळीतील अंतर 30 से.मी. व 2 रोपातील अंतर हे 15 से.मी. ठेवावे.
बियाणे प्रमाण व बीज प्रक्रिया : उन्हाळी बाजरी पिकास हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. तसेच किड व रोग नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास 20 टक्के मिठाचे द्रावणाची बीज प्रक्रिया करावी. प्रमाण हे 10 लिटर पाण्यात 2 किलो मीठ विरघळावे, पाण्यावर तरंगणारे बुरशी युक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा. तळाला राहिलेले निरोगी वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करुन ते 2 ते 3 पाण्याचे स्वच्छ धुवून नंतर सावलीत वाळवावे. जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करताना 25 ग्रॅम ॲझोटो बॅक्टर अधिक पी.एस.बी. 25 ग्रॅम याप्रमाणे प्रक्रिया करावी यामुळे नत्र खतात 20 ते 25 टक्के बचत होते व उत्पादनात 10 टक्के वाढ होते.
आंतरमशागत / विरळणी : तणांचा बंदोबस्त करण्यासाठी 2 वेळा कोळपण्या आणि गरजेनूसार 1 ते 2 वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरुवातीचे 30 दिवस शेत तणविरहीत ठेवणे गरजेचे आहे. कारण या काळात तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये यात स्पर्धा होत असते. हेक्टरी रोपांची योग्य संख्या राखण्यासाठी पहिली विरळणी पेरणीनंतर 10 दिवसांनी करावी व दुसरी 20 दिवसांनी करुन 2 रोपातील अंतर 10 ते 15 से.मी. ठेवावे.
वाणांची निवड : कृषी विद्यापिठाने खालील सुधारीत/संकरित जाती प्रसारीत केलेले आहेत.
सुधारित वाण :
आयसीटी पी. 8203 : हा 85 ते 90 दिवसात येणारा वाण असून, याचे हेक्टरी 22 ते 25 क्विंटल उत्पन्न मिळते. याचे दाणे टपोरे असतात व याला दोन ते तीन फुटावे असतात.
धनशक्ती : हा 74 ते 78 दिवसात येणारा वाण असून, याचे हेक्टरी 19 ते 22 क्विंटल उत्पन्न मिळते. याचे दाणे टपोरे, कणीस घट्ट व गोसावी रोगास प्रतिकारक असा हा वाण आहे.
संकरीत वाण :
शांती : हा 85 ते 90 दिवसात येणारा वाण असून, याचे हेक्टरी 25 ते 26 क्विंटल धान्य उत्पन्न मिळते. तर हेक्टरी 40 ते 45 क्विंटल कडबा उत्पादन मिळते. याचे दाणे टपोरे, उंची 145 ते 190 सें.मी असून हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक असा आहे.
श्रद्धा : हा 75 ते 80 दिवसात येणारा वाण असून, याचे हेक्टरी 25 ते 30 क्विंटल धान्य उत्पन्न मिळते. तर हेक्टरी 40 ते 45 क्विंटल कडबा उत्पादन मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला दोन ते तीन फुटवे येतात. उंची 180 ते 190 सें.मी असून हा हलक्य ते मध्यम जमिनीत येणारा वाण आहे. विशेषत: याचे कणीस घट्ट असते.
सबुरी : हा 75 ते 90 दिवसात येणारा वाण असून, याचे हेक्टरी 30 ते 35 क्विंटल धान्य उत्पन्न मिळते. तर हेक्टरी 40 ते 50 क्विंटल कडबा उत्पादन मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे कणीस घट्ट असून हा मध्यम ते भारी जमिनीत येणारा वाण आहे.
एएचबी 1666 : हा 75 ते 80 दिवसात येणारा वाण असून, याचे हेक्टरी 30 ते 35 क्विंटल धान्य उत्पन्न मिळते. तर हेक्टरी 50 ते 60 क्विंटल कडबा उत्पादन मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक असा आहे.
आदिशक्ती : हा 80 ते 85 दिवसात येणारा वाण असून, याचे हेक्टरी 30 ते 32 क्विंटल धान्य उत्पन्न मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाण अधिक उत्पादनक्षम आहे.
पाणी व्यवस्थापन : उन्हाळी हंगामात बाजरी पिकास एकुण 35 ते 40 से.मी. पाण्याची गरज असते. पेरणी नंतर पिकास चौथ्या दिवशी हलके पाणी द्यावे. जमिनीच्या प्रकारानुसार 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 5 ते 6 पाणी देणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास पीक वाढीच्या अवस्थेत पाणी द्यावे. पहिले पाणी फुटवे वेळी, दुसरे पाणी पीक पोटरीत असताना व तिसरे पाणी दाणे भरण्याची अवस्था यावेळी द्यावे.
उत्पादन : उन्हाळी बाजरी पीक ओलीताखाली असल्यामुळे तसेच हवामान कोरडे यामुळे धान्याचे हेक्टरी 40 ते 45 क्विंटल आणि चाऱ्याचे 7 ते 8 टन उत्पादन मिळते.
प्रा. संजय बाबासाहेब बडे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर, जि. औरंगाबाद मो. नं. 7888297859