सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जनावरे आजारी पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली तर जनावरांना होणारे आजार टाळता येतात. पावसाळ्यात जनावरांना जंतूसंसर्ग किंवा योग्य पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार होतात. या आजारावर वेळीच उपचार केल्यास होणारे नुकसान टाळता येते.
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत, पोटकृमी, विषबाधा, तिवा, अपचन गोचीड ताप अशा प्रकारच्या विविध आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जनावरांच्या मरतू कीचे प्रमाण वाढते. तसेच शेळी, मेंढींना फुटरॉट, आंत्रविषार, विषबाधा, हिमरेझीक सेप्टिसेमियाजंत प्रार्दुभाव यासारखे आजार होतात. जर जनावरांची व्यवस्थित प्रमाणे काळजी घेतली नाही दर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो. या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळं होणारे नुकसान पशुपालकांना टाळता येते.
नक्की वाचा : सर्पदंश : अशी घ्या काळजी
अतिपावसामुळे किंवा पूरस्थिती मुळे जागोजागी पाणी साचते व हे पाणी दूषित असते. असेच गढूळ पाणी दूषित पाणी जनावरे प्यायले तर जनावरांमध्ये रोगराई पसरू शकते. म्हणून मुख्यत्वेकरून विहिरीचे किंवा नळाचे पाणी जनावरांना प्यायला द्यावे. गोठ्याच्या अवतीभवती छोटे खड्डे असतील तर ते खड्डे मुरूम टाकून बुजवावेत. गोठ्यामध्ये खाचखळगे असल्यास त्यामध्ये जनावरांचे शेण व मूत्र साचून दलदल तयार होते. त्यामुळे जनावरांना कासदाह होण्याची शक्यता जास्त असते.
पावसाळ्यात कोवळा चारा फारच झपाट्याने वाढत असल्याने असा कोवळा चारा इतर चाऱ्याबरोबर अत्यंत कमी प्रमाणात खायला द्यावे. कारण अशा कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरांमध्ये अपचन, पोट फुगीचे आजार उद्धव शकतात. या काळामध्ये गवत सुद्धा दूषित झालेले असते. या साऱ्यावर जनावरे न बांधता शेतातील बांधाच्या उंचवट्यावरचे गवत आणि वाळलेला कोरडा चारा जनावरांना द्यावा.
महत्त्वाच्या टिप्स : शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !
कासदाह : पावसाळ्यात जनावरांना कासेचे आजार जास्त प्रमाणात होतात. या रोगामध्ये सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अति पातळ व रक्त व पू मिश्रित येते. जनावर कासेला हात लावू देत नाही. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कासेची स्वच्छता व्यवस्थित राखावी. साठी जनावरांचे दूध काढून झाल्यानंतरदिवसातून दोन वेळा जनावरांचे सर्व सड जंतूनाशक मध्ये बुडवून धरल्यास फायदा होतो. अधून-मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घेणे. त्याकरता उपलब्ध असणारे जंतुनाशकबाजारात विविध नावाने मिळतात. त्याचा उपयोग करावा.
घटसर्प : या आजारामध्ये जनावरांना अधिक प्रमाणात ताप येतो. श्वास घेण्यास त्रास होवून घशा भोवती सूज येवून जनावरे मृत्युमुखी देखील पडतात. जनावरांच्या शरीरामध्ये घटसर्पाचे जंतू असतात, परंतू वातावरणात झालेला बदल व उन्हाळ्यात पौष्टिक चारा न मिळाल्यामुळं शरीरावर ताण येऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे या आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. जनावरांना आजार होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी हिमरेझीक सेप्टिसेमिया या घटसर्प प्रतिबंधक लसीची मात्रा दिल्यास या आजारापासून जनावरांचे रक्षण होते.
फायद्याच्या टिप्स : पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा
फऱ्या : या आजारात जनावरांना ताप येतो व एक किंवा दोन्ही पायांना सूज येऊन जनावरे लंगडतात. कमी वयाची जनावरे या रोगास जास्त बळी पडतात. त्यामुळे जनावरांचे वेळीच लसीकरण करणे आवश्यक असते. यासाठी पावसाळ्यापूर्वी ब्लॉक क्वार्टर (बीक्यू) ही लस घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रामुख्याने दोन वर्षाच्या आतील वासरांचे शंभर टक्के लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
तिवा : या रोगामध्ये जनावरांना सडकून ताप येतो. जनावरांचे खाणे मंदावते तसेच जनावर थरथर कापायला लागते. एका पायाने लंगडते. मान, पाठ, डोळे व पायाचे स्नायू आकुंचन पावतात. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डासांचे निर्मूलन करावे.
पोटफुगी किंवा अपचन : पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होतो. परंतू अचानक चाऱ्यांमध्ये बदल केल्यास तर पोटफुगी होऊन जनावरे दगावतात. चाऱ्यात बदल करताना थोड्या-थोड्या प्रमाणात पूर्वीचा व नवीन चारा एकत्र करुन खाण्यासाठी द्यावा. हिरवा चाऱ्यांबरोबरच वाळलेला चाराही देण्यात यावा. पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यात यावे त्यामुळे अपचन थांबविता येते.
हगवण : या प्रकारात जनावरास एकसारखे साधे अगर रक्त आणि शेन मिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावरे मलूल होतात. अशुद्ध व घाणेरड्या चाऱ्यामुळे हा आजार उद्भवतो आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी व चांगले खाद्य द्यावे.
फायद्याची गोष्ट : या आहेत भारतातील टॉप 5 गायी
फुटरॉट : शेळी व मेंढीमध्ये पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे खुरामध्ये जंतुची वाढ होऊन पायांना व खुरांना सूज येते तसेच तापही येतो. शेळ्या चालतांना लंगडतात. खुरांची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पोटाशिअम परमॅगनेटच्या द्रावणामध्ये खुरे बुडवून स्वच्छ धुतल्यास हा आजार आटोक्यात येते.
आंत्रविषार : शेळी व मेंढी मध्ये या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते. जास्त प्रमाणात कोवळे गवत खाल्यास अपचन होते. यावेळी शेळ्या आजारी पडून चालतांना अडखळतात. तोल जावून श्वास घेण्यास त्रास होतो. पोट फुगी किंवा जुलाब होवून जनावरे दगावतात. पावसाळ्यापूर्वी लसीकरण केल्यास आजार नियंत्रणात येतो. जनावरांना योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. शेळी व मेंढ्यांना एंटरोटोक़्झेमिया (ईटी) लस 14 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस देण्यात यावी.
जंत प्रादुर्भाव : पावसाळ्यात विविध प्रकारचे जंत पाण्यात मिसळल्यामुळं पाणी दूषित होते. असे दूषित पाणी पिल्यामुळे लिव्हर फ्ल्यूक, गोलकृमी, पट्टकृमी या जंताचे शरीरात प्रमाण वाढून प्राणी दगावतात. हे जंत वाढण्यासाठी गोगलगायी कारणीभूत असतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी आपल्या सर्व जनावरांना जंतनाशक औषध पाजून घेतल्यास जंताचे प्रमाण कमी होते आणि प्राण्याची प्रतिकारशक्ती वाढून दगावण्याचे प्रमाण कमी होते.
पावसाळ्यामध्ये पशुधनांच्या आवश्कतेनुसार लसीकरण करणे, गोठ्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन केल्यास पशुधनांची उत्पादकता वाढवून संभाव्य मरतुकीपासून बचाव होवू शकतो. जनावरांमध्ये आजार आढळल्यास पशुपालकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा.
महत्त्वाच्या टिप्स : उस्मानाबादी शेळीची अशी घ्या काळजी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1