उन्हाळ्यात जनावराचे योग्य व्यवस्थापन करताना जनावरांचा गोठा, पाणी व चारा या बाबींची काळजी घेतल्यास तसेच उष्माघातावर योग्य तो प्रथमोपचार केल्यास उन्हाळ्यातील कडक उन्हाच्या दिवसातसुद्धा जनावराची उत्पादनक्षमता टिकून राहते व उत्पादन २० ते ३० टक्के वाढू शकते.
उन्हाळ्यात जनावरांची काळजी घेणे शेतकर्यांना कठीण जाते. उन्हाळ्यातील तापमान साधारणत: ४० सेंटिग्रेड पेक्षा जास्त असते. उन्हाळ्याच्या दिवसात जसजसे बाह्य वातावरणातील तापमान वाढते, त्यावेळी जनावरांची तापमान सहन करण्याची क्षमता कमी होते. जनावरांचे शारीरीक तापमान वाढल्यामुळे जनावरांचे श्वासोच्छवास व हृदयक्रिया जास्त तीव्र होतात, लघवी कमी प्रमाणात होते, रक्तदाब कमी होतो, भुक मंदावते तसेच उन्हाळ्यात पाण्याची व हिरव्या चार्याची समस्या निर्माण होत असल्यामुळे जनावरांना अशक्तपणा, तोंड कोरडे पडणे, दूध कमी होणे अशा प्रकारची लक्षणे जास्त प्रमाणात आढळतात.
गोठा : गोठा मुक्त हवेशीर असावा व जनावरांची संख्या कमी असावी. प्रखर सूर्यप्रकाशापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यास चांगले छत असावे. गोठ्याचे छत टिनाचे किंवा पत्र्याचे असेल तर ते गरम होऊ नये, म्हणून कडबा किंवा गवताच्या पेंडीने झाकून ठेवल्यास टिन गरम होणार नाहीत. जनावर शक्यतो थंड जागी बांधून ठेवावीत, तसेच गोठा हवेशीर असावा. तसेच उन्हापासून व उष्ण वार्यापासून संरक्षण व्हावे याकरीता गोठ्याच्या भोवताली झाडे लावावीत. गोठ्यातून शेणाचा व मूत्राचा निचरा नियमित होईल याची काळजी घ्यावी.
पाणी : जनावरांना शक्यतो पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे जनावरे तहानलेली राहतात. म्हणून जनावरांना दिवसातून पाच ते सहा वेळा मुबलक प्रमाणात पाणी पाजावे. तसेच तीन ते चार ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली असावी. रात्री व सकाळी दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर जनावरांना पाणी पाजावे. एक लिटर दुधासाठी साधारणत: तीन लिटर पाण्याची आवश्यकता असते. तसेच जनावरांना दिवसाला ९० ते १०० लिटर पाण्याची गरज असते. तसेच दूध काढण्यापूर्वी जनावर थंड व स्वच्छ पाण्याने धुवावे. जनावरांच्या अंगावरील केस कापावे. दुपारी १२ ते ४ या वेळेला तापमान जास्त असल्यामुळे यावेळी जनावरांना गोठ्यात किंवा झाडाच्या सावलीत बांधावे व दुपारच्या चार तासात दोन वेळा २० ते २५ मिनीटासाठी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. जेणेकरून जनावराला उन्हाचा त्रास होणार नाही.
चारा : उन्हाळ्याच्या दिवसात वाळलेला चारा कमी करून हिरवा चारा वाढवावा. हिरवा चारा नसेल तर आहारात खुराकाचे प्रमाण वाढवावे. चारा दिवसातून एक वेळा न टाकता दिवसातून विभागून तीन ते चार टाकावा. चार्यात वेगवेगळे मिश्रण असावे. रात्रीच्या वेळी चारा गव्हाणीत टाकून ठेवावा, जेणेकरून जनावर रात्रीच्या वेळी चारा खाऊ शकेल. जनावरांना उन्हाच्या वेळी चरण्यासाठी सोडू नये. क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी २० ते ३० ग्रॅम क्षार मिश्रण चार्यातून द्यावीत.
उष्माघातासाठी औषधोपचार : सनट्रोक, हिटस्ट्रोक यासाठी बर्याच वेळी घरगुती उपचार केल्यासही चांगला फायदा होतो. पाण्यात बर्फ टाकून, त्या थंड पाण्याने रोगी जनावर वारंवार धुवावे किंवा थंड पाण्याचा गोणपाट किंवा कापड भिजवून अंगावर ठेवावे. ज्यामुळे कातडीच्या खालील नसा आकुंचन पावतील व जनावराचे उष्माघातापासून संरक्षण होईल. पंख्यांची सोय असल्यास लावावे. रोगी जनावर थंड व मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी बांधावे. रोगी जनावराची कातडी चोळावी, जेणेकरून ताप कमी होईल व शरीराच्या वरच्या भागास थंड रक्त येईल. रोगी जनावरास खूप पाणी पिण्यास द्यावे. डोके, मान व पाठीचे मणके सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवावे. कांद्याचा रस ५० मिली अधिक १० ग्रॅम जिर्याची पूड अधिक ५० ग्रॅम खडीसाखर मिसळून पाजावे. हिरवे आंबे पाण्यात उकळून त्याचा गर व थोडे मीठ आणि साखर पाण्यात मिसळून पाजल्यास चांगला फायदा होतो.
डॉ. मिलींद नांदे, डॉ. मंगेश एस. मेंढे, डॉ. नरेंद्र खोडे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर.