प्रत्येक ऋतुमानाचा कोंबड्यांच्या वाढीवर परिणाम होत असतो. शेतकऱ्यांना कोंबडीपालनातून अधिक नफा हवा असेल तर साहजिकच प्रत्येक ऋतुमानात व्यवस्थापनात देखील गरजेनुसार बदल अपेक्षित आहेत.
इतर ऋतूप्रमाणे पावसाळ्यामध्ये जरी अधिक प्रमाणात बदल करण्याची गरज पडत नसली तरी काही विशिष्ट बाबीकडे लक्ष दिले तर पक्षांच्या पिल्लांमधील तसेच मोठ्या पक्षांमधील मरतुकीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते व व्यवसायातील नफ्याचे प्रमाण वाढवणे शक्य आहे.
पिण्याचे पाणी : पावसाळ्यात पाण्याची गुणवत्ता खालावते आणि फक्त पशु, पक्षी नाहीतर मानवासाठी सुद्धाही बाब लागू होते. त्यामुळे पावसाळ्यात पक्षांना दिले जाणारे पिण्याचे पाणी अत्यंत महत्वाचा घटक आहे.
पाण्याचा सामू (pH) जाणून घेणे गरजेचे आहे. पक्षांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा सामू ६.६ ते ६. ८ असणे गरजेचे आहे. पाणी हे स्वच्छ असावे. बाजारात सामू मापक उपलब्ध आहे. त्याने पाण्याचा वेळोवेळी सामू मोजावा. पाणी स्वच्छ असावे कारण अनेक वेळी पाणी अस्वच्छ असते आणि रोगाला आमंत्रण देते. पाण्यामध्ये ब्लेचिंग पावडर (१ किलो / १०० लिटर या प्रमाणामध्ये) मिसळावे व असे पाणी अर्धातासानंतर पक्ष्यांना पिण्यासाठी द्यावे. बाजारात क्लोरिनच्या गोळ्या उपलब्ध आहेत साधारण दोन गोळ्या १००० लिटर पाण्यामध्ये मिसळावे व ३० मिनिटानंतर पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी द्यावे. बऱ्याच वेळी बाजारात उपलब्ध H2O2 हॅड्रोजन पेरॉक्सिडें ६० मी. ली. /१००० लिटर पाण्यामध्ये मिसळावे व ३० मिनिटानंतर पक्षांना पिण्यासाठी पाणी द्यावे. या व्यतिरिक्त बाजारात विविध कंपनीचे वॉटर सानिटीझर मिळतात उदा. सेफगार्ड, अक्वामॅक्स इत्यादी. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची तपासणी जरूर करून घ्यावी, जेणेकरून पाण्यामधील खनिज प्रमाण तसेच इतर घाण किती आहे याचा अंदाज येतो.
पाण्याची भांडी : अनेकवेळा कोंबड्या पाणी पित असताना त्यांची विष्टा भांड्यात पडते. शेतकरी पाण्याची भांडी धुण्यासाठी किंवा साफ करण्यासाठी अनेकदा कंटाळा करतात. परंतु दिवसातून कमीत कमी तीन वेळा पाण्याची भांडी तिथच्या तिथेच स्पंजने अथवा ओल्या कपड्याने पुसून, धुवून घ्यावी. पाण्यात पडलेली विष्टा ही पक्षांमध्ये रोग पसरविण्यासाठी कारणीभूत ठरते. पिण्याची भांडी हि बाजारात उपलब्ध चांगल्या डिटर्जेन्ट ने धुवून घ्यावी. पिण्याच्या पाण्याची भांडी ही पक्ष्यांच्या मानेच्या लगत उंचीवर ठेवावी जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिण्यास सोयीस्कर ठरेल. पिण्याच्या पाण्याची भांडी अशाप्रकारे लावावे की पक्ष्यांना साधारण ६ ते ७ फूट अंतरापेक्षा जास्त कुठल्याही दिशेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी चालावे लागणार नाही. पिण्याच्या भांड्याखालील जागा नेहमी ओली होती त्यामुळे त्याजागेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अगदी ओलावा निर्माण झाला असेल तर भांड्याची जागा बदलावी.
पक्ष्यांची गादी (लिटर) : पावसाळ्यात पक्ष्यांच्या गादीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे अंथरलेल्या लिटरची आद्रता शोषण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे अनेकवेळा कोंबड्याच्या शेडमधील लिटर आद्रता वाढते व रोगराईला आमंत्रण देते. पावसाळ्यात लिटर (धानाचा कोंडा) तीन इंच पर्यंत अंथरावे व अंथरलेल्या लिटरला वेळोवेळी गरजेनुसार खालीवर करून घ्यावे जेणेकरून लिटर मध्ये ओलसरपना जमा राहणार नाही. शेतकरी आपल्या स्तरावर युट्युब वर पाहून घरच्या घरी लिटर वर खाली करण्यासाठी लिटर रेकर साहित्य तयार करू शकतात. लिटर मधील आद्रता शोषून घेण्याकरिता त्यामध्ये दगडी चुना थोडा बारीक करून साधारण १ किलो चुना १००० sq.ft. जागेत मिसळून घ्यावा. पावसाळ्याचा जोर अधिक असतो त्यावेळी अनेकदा पावसाच्या सरी शेडमध्ये तिरपा मारा करतात व शेडमधील लिटर ओले होते अशावेळी जास्त ओले झालेले लिटर काढून त्या ठिकाणी नवीन लिटर टाकणे हे उत्तम. परंतु पुढच्या वेळी अशाप्रकारे शेडमध्ये पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पावसाळ्यात शेडमधील लिटर अमोनिया वाढण्याची शक्यता असल्याने वेळोवेळी स्वच्छ ताजी खेळती हवा शेडमध्ये आली पाहिजे याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात पक्षांमध्ये पोटाचे आजार वाढतात व त्याचा परिणाम पक्ष्यांच्या विष्टेवर होतो व पातळ विष्टा झाल्याने लिटरची गुणवत्ता ढासळते त्यामुळे पक्ष्यांचे आंतरिक आरोग्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. शेडमधील लिटर गुणवत्ता ओळखण्यासाठी पक्ष्यांच्या पायाचे पंजे तपासावे जर नखाच्या भोवती लिटर गाठी प्रमाणे जमा झाले असेल तर समजावे शेडमध्ये लिटर ओलावा अधिक आहे. अशा वेळी लिटर रेकींग वाढवावे व ते भुसभुशीत राहील याची काळजी घ्यावी. या प्रकारात लिटर हातात घ्यावे व मूठ बांधून बघावे जर लिटर चे एकत्रित गोळा होऊन बॉल तयार झाला तर लिटर गुणवत्ता कमी झाली असे समजावे .
नवीन पक्ष्यांची ब्रुडिंग : इतर ऋतूप्रमाणेच पावसाळ्यात देखील पक्ष्यांचे ब्रुडिंग करणे आवश्यक आहे. विशेष; बाब म्हणजे पावसाळ्यात विजेचा लपंडाव सुरु असतो त्यामुळे वीज ये-जा प्रमाण वाढते. नवीन आलेल्या बॅचला अखंडित विजेचा पुरवठा असणे गरजेचे आहे. अनेकवेळा पडदे अधिक काळ बंद असल्याने शेडमध्ये स्वच्छ ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते त्यामुळे योग्य वेळी काही कालावधी साठी पडदे वरून खालच्या बाजूला उघडावे जेणेकरून शेडमध्ये स्वछ हवा खेळती राहील. बाकी इतर वेळेस ब्रुडिंगसाठी जी काळजी घेतो तसेच ब्रुडिंग करावी.
पक्ष्यांचे आजार : पावसाळ्यामध्ये काही श्वसनाचे व लिटर मधील आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पक्ष्यांना पावसाळा सुरु होण्या आधी जंताचे औषध (अल्बेडाझोल १५ मी. ली. / १०० पक्षी) द्यावे व अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकाची मदत घ्यावी. एकदा का जंताचे औषध दिले की पक्ष्यांना रानीखेत आजाराची लस (लासोटा / बी १) देऊ करावी. या व्यतिरिक्त कोंबड्यांमधील इतर लसीकरण नियोजन काटेकोरपणे पाळावे.
लिटर मधून उध्दभवणारा आजार कॉक्सीडिओसिस हा नेहमी पावसाळ्यात प्रामुख्याने आढळून येतो. यासाठी कॉक्सीडिओसिस होऊ नये याकरिता लिटर व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. या उपरांत पक्ष्यांमध्ये रक्तिहागवणीची प्रमाण दिसले की समजावे कॉक्सीडिओसिस आजार पक्ष्यांना झाला. उपचार म्हणून पक्ष्यांना अँप्रोलिम १ ग्रॅम प्रति लिटर पिण्याच्या पाण्यामधून (२४ तास) व व्हिटॅमिन के पाच दिवसांकरिता द्यावे तसेच नजीकच्या पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. पक्षिसंख्या कमी असल्यास लिटर बदलून पक्ष्यांना जागा बदलून पाळावे.
खाद्य साठवणूक : अनेकदा वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे खाद्यला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर आवश्यक व कमीत कमी खाद्य साठवणूक करताना खाद्य बॅग जमिनीला चिटकवून न ठेवता स्टॅन्ड वर ठेवावे जेणेकरून जमिनीमधील ओलावा खांद्याला लागणार नाही. खाद्य बॅगला चोहोबाजूने हवा लागेल याची काळजी घ्यावी. शेतकरी खाद्य स्वतः तयार करत असेल तर खाद्यामध्ये अँटिऑक्सिडंट, टॉक्सिन बाईंडर तसेच कोक्सीडिओस्टेट आवश्यक त्या प्रमाणात मिसळावे जेणेकरून खाद्य गुणवत्ता वाढेल.
शेडची रचना : आपण पावसाळ्याआधी आपल्या घराची जशी डागडुगी करतो तसेच कोंबड्यांच्या शेडची डागडुगी करावी. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी गळण्याची शक्यता आहे तेथे योग्य ती उपाययोजना करावी. शेडमध्ये पावसाचे पाणी येऊ नये म्हणून ओव्हरहॅन्ग कमीतकमी पाच फूट ठेवावे. बाजूची भिंत कमीत कमी एक फूट व जास्तीतजास्त दोन फूट ठेवावी जेणेकरून पावसाचे पाणी शेडमध्ये येणार नाही. शेडची उंची जमिनीपासून कमीतकमी तीन फूट असावी शक्यतोवर शेड बांधताना नदी, नाला, तलाव, विहीर याच्या काठाला बंधू नये शेडच्या बाजूला पाणी साचणार नाही व त्याच योग्य प्रकारात निचरा होणे गरजेचे आहे.
माश्याचा प्रादुर्भाव : ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते. त्याचप्रमाणे ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते. व शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होउ लागतो. त्यामुळे शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी लिटरची काळजी घ्यावी. यासाठी लिंबाच्या लिंबूल्या बारीक करून त्याचा आर्क काढावा व २५ मी. ली. १००० लिटर पाण्यामध्ये मिसळून शेडच्या अवतीभोवती व शेडमध्ये फवारणी करावी.
अशा प्रकारे खाद्य, घर, पाणी, लिटर, भांडी, स्वच्छता ह्या सर्व बाबीचा विचार केला व पावसाळ्या आधी नियोजन केले तर नक्कीच पावसामुळे होणारा कुक्कुटपालनातील तोटा भरून काढता येईल.
डॉ. गजानन नागरे, डॉ. मुकुंद कदम, डॉ. अर्चना पाटील, डॉ. मयुरा गोळे व डॉ. किर्ती चित्रीव, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा