घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. आपल्या घराभोवती, अंगणात, परसात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर, जागा असेल तिथे वृक्षलागवड करून, बाग फुलवून आपण पर्यावरण संवर्धनामध्ये आपले योगदान देऊ शकतो.
परसबागेचे उपयोग : पौष्टिक मूल्यांची भरपूर ताजी फळे आणि भाज्यांचा पुरवठा होतो. आरोग्यदायी आणि चवदार अशा विषारी रसायनांपासून मुक्त अन्नपदार्थांचा पुरवठा होतो. आवश्यक जीवनसत्व आणि खनिजे प्रदान करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. सगळ्याच ऋतूंमधील फळे आणि भाज्यांद्वारे आहारातील विविधतेची हमी देते. स्वयंपाकघरातील सांडपाणी आणि कचरा इत्यादी सामग्रीचा प्रभावी वापर होतो.
परसबागेसाठी हे लक्षात ठेवा : पाण्याचा श्रोत उपलब्ध असावा. पाण्याचा योग्य निचरा होणारी जागा निवडावी स्वंपाकघरातील टाकाऊ पाणी वापरले जाऊ शकते. या जागेला दिवसातून किमान ३ ते ४ तास सतत सूर्यप्रकाश मिळायला हवा. पूर्व पश्चिम दिशेने सारी आणि वरंबा बनवून जागा तयार करून घ्यावी. देशी आणि सरळ वाणाचे बियाणे निवडावे. चारही बाजूने सरळ कुंपण करावे.
परसबागेचे प्रकार : परसबागेचे प्रकार हे त्याच्या जागेवरून व माणसांच्या संख्यावर अवलबून असते.
मोठी परसबाग : 20 गुंठे ते 1 एकर या जागेमध्ये केलेली परसबाग. यामध्ये वड, पिंपळ, औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, वेली इत्यादी लागवड केली जाऊ शकतो.
मध्यम परसबाग : 5 गुंठे या जागेमध्ये केलेली परसबाग.
छोटी परसबाग : 1.5 ते 5 गुंठे या जागेमध्ये केलेली परसबाग.या मध्ये हंगामी भाजीपाला, फळभाज्या इत्यादी लागवड केली जाऊ शकतो.
गच्ची वरील परसबाग : पॉलिथीन पेपर अंथरून त्यवर माती टाकून तयार केलेली परसबाग.
बागकामासाठी लागणारी अवजारे :
खुरपे : तण काढण्यासाठी, माती खुरपण्यासाठी
कुदळ / टिकाव : जमीन खोदण्यासाठी, फळांचे रोप लावण्यासाठी, खड्डा करण्यासाठी
फावडे : खड्ड्यातील माती काढण्यासाठी किंवा खड्डा भरण्यासाठी, आळे करण्यासाठी, सरी- वरंबे
करण्यासाठी. तसेच छाटणीसाठी कटर (secateur), पाण्यासाठी झारी (water can), पाइप, कुंड्या, लटकणाऱ्या बास्केट्स (Hanging baskets), कोयता या सर्व बाबी आवश्यक आहेत.
हेही वाचा :
कशी आहे ? गांडूळ खत निर्मितीची आधुनिक पद्धती
भाजीपाल्यासाठी महत्त्वाच्या 4 टिप्स्
गॅलर्डिया (गलांडा) लागवडीचे असे करा नियोजन !
कुंड्या भरण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग : लाल माती ही अत्यंत उत्तम. कारण या मातीतून पाण्याचा योग्य निचरा होतो. काळी पोयट्याची मातीसुद्धा उत्तम. परसबागेसाठी शेणखतासारखे किंवा गांडूळखतासारखे उत्तम खत दुसरे कोणतेही नाही. नारळाच्या काथ्यापासून तयार केलेला भुसा हाही आजकाल कुंड्या भरण्यासाठी वापरला जातो. पण नैसर्गिक मातीमध्ये असलेली अन्नद्रव्ये कोकोपीटमध्ये नसतात, त्यामुळे खत व पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणे भाग पडते.
माध्यम कसे कराल ? : माती, खत व वाळू 3:2:1 या प्रमाणात मिश्रण करून कुंडी भरावी. मातीमध्ये कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत, व्यवस्थित वाळू मिसळून माध्यम तयार करावे.
कुंड्यांचे प्रकार व आकार : आजकाल बाजारात विविध रंगांच्या तसेच आकाराच्या लहान, मध्यम तसेच मोठ्या कुंड्या उपलब्ध आहेत. आपल्याकडे असलेल्या जागेत त्यांची व्यवस्थित मांडणी करून तसेच सूर्यप्रकाशाचा विचार करून आपल्याला हव्या त्या वृक्षांची लागवड करावी.
शुभदा पलघडमल सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषि महाविद्यालय, सोनई.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा