राज्यातील लातूर, सोलापूर, बार्शी, नाशिक, लासलगाव, जालना आणि औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी अधिक प्रमाणात चिंचेचे आवक सुरू असून, चिंचेचे दर यंदा वाधारले आहे. यंदा सरासरी 6 हजार रुपये दर मिळाला आहे.
चिंच हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कोरडवाहू फळपीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली जवळ-जवळ 14, 500 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापासून 2660 टन चिंच उत्पादन होते. एकूण निर्यात होणार्या मसाल्याच्या पिकापैकी चिंचेचा सहावा क्रमांक लागतो. चिंचेच्या फळाला उत्तम भाव मिळत असल्यामुळे हे कोरडवाहू क्षेत्रातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील चिंच विविध रूपाने, प्रामुख्याने कॅनडा, स्वित्झरलँड, ग्रेड ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स इत्यादी प्रगतशील देशांमध्ये पाठविली जाते. जवळपास 52 देशांमध्ये महाराष्ट्रातील चिंच निर्यात होते. चिंच विविध स्वरुपात निर्यात केली जाते. त्यामध्ये अखंड चिंच, फोडलेली चिंच, गाभा, गर, बियांची पावडर ओलिओरेझीन घटक यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे चिंचेला मोठी मागणी असते.
सध्या लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह विदर्भ व कर्नाटकामधून चिंचेची आवक होत आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये २३६ क्किंटल आवक झालेल्या चिंचेला ७ हजार ते १२ हजार ५०० तर सरासरी ९ हजार ५०० रुपये प्रतिक्किंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
लातूर बाजार समितीमध्ये जवळपास पंधरवड्यापासून चिंचेची आवक होत आहे. १३ फेब्रुवारीला ७३ क्किंटल, १४ फेब्रुवारीला ५५ क्किंटल १५ फेब्रुवारीला १०२ क्किंटल , तर १६ फेब्रुवारीला २१२ क्किंटल चिंचेची आवक झाली. या चिंचेला बाजार समितीत सरासरी ६ हजार ते १५ हजार दरम्यान प्रतिक्किंटलचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. तूर्त आवक कमी असली तरी येत्या काळात ही आवक वाढत जाईल, असेही बाजार समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये अजून चिंचेची आवक सुरू होणे बाकी आहे, तर जालना समितीमध्ये मंगळवारी केवळ एकवेळ चिंचेची ४ क्किंटल आवक झाली. या चिंचेला ६००० ते १० हजार रुपये प्रतिक्किंटल दरम्यान दर मिळाला चिंचेचा सरासरी दर ८ हजार रुपये प्रति क्किंटल राहिल्याची माहिती जालना बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, नाशिकमध्ये चिंचेची आवक कमी असल्याने येथे चिंचेला २१०० ते कमाल २५०० असा प्रतिक्किंटल दर मिळत आहे. तर सरासरी २३८० रुपये दर मिळत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक सध्या घटली असून अवघी ५ ते १०० किलो आवक होत आहे. त्यामुळे आवक नसल्याने सध्या चिंचेचे लिलाव होत नसल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले. तर चालू महिन्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत न फोडलेल्या चिंचेची आवक ५ क्किंटल आवक झाली. त्यास किमान २२०० ते कमाल २५०० दर राहिला. तर २३८० रुपये प्रतिक्किंटल सरासरी दर मिळाला. तर नांदेडमध्ये चिंचेला ८ हजार ते ८५०० रुपये दर मिळत असल्याची माहिती एका व्यापाऱ्यांनी दिली.